आर्थिक सुधारणा करावयाच्या तर वाईटपणा घेण्याची तयारी असावी लागते. आपली ती आहे, हे मोदी यांनी अद्याप कृतीतून दाखवून दिलेले नाही. या पाश्र्वभूमीवर न्यूयॉर्क, सिडनी येथील परदेशी प्रवचनांची उपयुक्तता आणि परिणामकारकता वरवरचीच ठरते. बोलघेवडा प्राध्यापक काही दिवसांनंतर घरच्यांसाठी कंटाळवाणा ठरू लागतो; तसे मोदी यांचे होऊ नये..  

बाबा रामदेवसारख्या भुक्कड व्यक्तीला सरकारी खर्चाने सुरक्षा द्यायची, परदेशी भाषा शिक्षण शाळांतून हद्दपार करून त्या जागी संस्कृत शिक्षण अनिवार्य करायचे आणि परदेशात जाऊन सुधारणावादी चेहऱ्याची भाषा करायची हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे व्यवच्छेदक लक्षण राहिलेले आहे. पोलिसी कारवाई टाळण्यासाठी हा बोगस बाबा साडी नेसून पळाला होता. आता त्यास तसे करावे लागणार नाही. कारण एके काळी त्यास पकडू पाहणाऱ्या पोलिसांनाच त्याचे संरक्षण करावे लागणार आहे. मोदी हे स्वत:स विज्ञान, तंत्रज्ञानप्रेमी आणि आधुनिक मानतात. हे त्यांचे विज्ञानप्रेम आणि ही त्यांची आधुनिकता. महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेही त्यांना एकाच वेळी जसे प्रेरणादायी वाटतात तसेच हे. परदेशात जावे, तेथील सुखवस्तू जगण्यातून इंडियाकडे पाहणाऱ्या भारतीयांचा मेळावा भरवावा, वैष्णव जन तो तेणे वगैरे ऐकवून त्यांचे स्मरणरंजन करावे आणि या भारलेल्या वातावरणात दणक्यात राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत वगैरे भरलेले भाषण ठोकून दोनपाच दिवस माध्यमांतील उपस्थितीची निश्चिंती करून घ्यावी ही त्यांची कार्यशैली बनून गेली आहे. बोलघेवडा प्राध्यापक काही दिवसांनंतर घरच्यांसाठी कंटाळवाणा ठरू लागतो. कारण तो काय आणि कसे बोलणार हे घरच्यांना कळून चुकलेले असते. त्याच वेळी बाहेर मात्र त्यास व्याख्यानादी पोपटपंचीसाठी निमंत्रणे येतच असतात. तसे आता नरेंद्र मोदी यांचे होते की काय असा प्रश्न पडावा इतका त्यांचा भाषणावेग उतू जाऊ लागला आहे. याआधी त्याचे दर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्याचीच पुनरावृत्ती ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे घडली. एखादे गरबा नृत्य कमी-जास्त इतकेच. एखाद्या पॉपस्टारच्या थाटात मोदी यांची भाषणे होत असतात. त्यात गैर असे काही नाही. कोणी कोणत्या शैलीत स्वत:स सादर करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु पंतप्रधानच असा जल्लोषोत्सवात आनंद मानू लागले तर त्यांचे अनुकरण तळापर्यंत केले जाते. साधेपणाचा अतिरेक झाला की साधेपणाही कंटाळवाणा ठरू लागतो तसेच उत्साहास अति विशेषण लागल्यास त्याचाही उबग येऊ लागतो. मोदी हे याच्या सीमारेषेवर आहेत. याआधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जीभ जड होती. त्यामुळे ते कोठेही गेले तरी फारसे काही बोलत नसत. पण म्हणून ती उणीव भरून काढण्यासाठी मोदी यांनी आपली जीभ इतकी सैल सोडायचे काहीच कारण नाही.     
याचे कारण असे की हा असा परदेशस्थ भारतीय समाज प्रतीकात्मकतेत समाधान मानत असतो. संपत्ती आणि कीर्ती मिळवण्याच्या आशेने परदेशात जावे लागले तरी तेथील उद्दिष्टे पार पडल्यावर मातृभूमीनेही आपले कोडकौतुक करीत राहावे, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे भारतात येताना येणाऱ्या सरकारी अडचणी दूर करणे, भारतात येण्याचा व्हिसा सहजसोपेपणाने मिळेल अशी व्यवस्था करणे, भारतात उतरल्यानंतर विमानतळाच्या आसपासचा परिसर स्वच्छ दिसणे आदी छाछु बदलांमुळे हा वर्ग भारून जाऊ शकतो. मोदी सध्या त्याच प्रयत्नात आहेत. त्यामागील राजकीय कारणास आर्थिक परिमाणदेखील आहे. ते असे की विश्व हिंदू परिषद वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परदेशातील संघटनांनी मोदी यांचे सरकार यावे यासाठी जिवापाड मेहनत घेतली. या परदेशी संघटनांनी भाजपसाठी पक्षीय पातळीवर निधी संकलनदेखील मोठय़ा प्रमाणावर केले. तेव्हा ईप्सित साध्य झाल्यानंतर त्यांचे आभार मानणे हे मोदी यांचे कर्तव्य ठरते आणि त्यात काही गैर आहे, असेही नाही. प्रश्न आहे तो या परदेशस्थ भारतीयांचे लांगुलचालन करताना घरच्या आघाडीवर कधी लक्ष देणार हा.    
तसा तो देण्याची वेळ आली आहे. याचे कारण असे की वैयक्तिक पातळीवर मोदी यांचे मित्र असलेले जपानचे पंतप्रधान शिंझो आबे हे गंभीर आर्थिक संकटात सापडले असून संपूर्ण युरोप खंड अजूनही मंदीच्या कराल सावलीतून बाहेर आलेला नाही. जपान पुन्हा एकदा मंदीच्या फेऱ्यात अडकल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. युरोप संपूर्णपणे संकटातून कधी बाहेर पडेल हे स्पष्ट झालेले नाही. त्याच वेळी अमेरिकेचे बराक ओबामा आणि चीनचे क्षी जिनपिंग यांनी आपापसात करार करून ऊर्जा बाजारपेठेवर आपले आपलेच नियंत्रण राहील अशी व्यवस्था केली आहे. हे होत असताना रशियास एकटे कसे पाडता येईल यासाठी ओबामा आणि अमेरिकाधार्जिणे देश नवनवीन क्लृप्त्या शोधत आहेतच. आणि त्याच वेळी रशिया आणि चीन हे एकमेकांच्या हितसंबंधांचे रक्षण कसे करता येईल या प्रयत्नात आहेत. या सगळ्यामुळे जग कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे. अशा वेळी भारत मात्र घसरत्या खनिज तेलदरांमुळे अच्छे दिन आल्याचे दिवास्वप्न पाहू लागला आहे. या स्वप्ननिर्मितीचा भाग म्हणूनच रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कमी करावेत असे तुणतुणे थेट अर्थमंत्र्यांच्याच पातळीवर वाजवले जाऊ लागले असून उद्योगादी क्षेत्राकडूनही अशी मागणी येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु ही परिस्थिती फसवी आहे आणि तीत कधीही बदल होऊ शकतो, असे सांगण्याइतका प्रामाणिकपणा सरकारने दाखवायला हवा. तो अजूनही दिसत नाही. या प्रामाणिकपणाची गरज आहे. याचे कारण असे की हे अजूनही ज्यास आर्थिक सुधारणा म्हणाव्यात असे काही आपल्याकडे सुरू झालेले नाही. या सुधारणा करावयाच्या तर वाईटपणा घेण्याची तयारी असावी लागते. आपली ती आहे, हे मोदी यांनी अद्याप दाखवलेले नाही. तेव्हा या पाश्र्वभूमीवर या असल्या परदेशी प्रवचनांची उपयुक्तता आणि परिणामकारकता वरवरचीच ठरते.
याचा विचार करावयास हवा कारण पायाभूत क्षेत्रात आपल्याकडे अद्याप कामाला हात घातला गेलेला नाही. अशा वेळी परदेशस्थ भारतीयांना स्मरणरंजनाचा आनंद देत असताना त्यांनी भारतात गुंतवणूक करावी यासाठी अत्यावश्यक धोरणबदल करणे हे अधिक गरजेचे आहे. भारतीयांप्रमाणे जगभरात चिनी नागरिक पसरले आहेत. तेदेखील देश सोडून गेले ते स्थानिक परिस्थितीला कंटाळून. आपलेही देशबांधव परदेशात गेले ते संधिशून्य वातावरणात कोंडमारा झाला म्हणून. परंतु माओ यांनी याच परदेशस्थ चिनींना हाताशी धरले आणि नवा चीन उभारण्यास सुरुवात केली. पण तसे करण्याआधी चीनमधील परिस्थिती त्यांनी आमूलाग्र बदलली. भारतात याची गरज आहे. त्यासाठी व्हिसा पद्धत सोपी सरळ करणे यापेक्षा अधिक काही मूलगामी सुधारणा करणे आवश्यक आहे. तसे काही करावयाचे तर प्रथम वातावरणनिर्मिती करावी लागते. पण किती काळ वातावरणनिर्मितीतच आनंद मानायचा हेही एकदा निश्चित करावे लागते. बदलासाठी आवश्यक ती वातावरणनिर्मिती मोदी यांनी केली आहे, यात तिळमात्रही शंका नाही. परंतु रंगमच सज्ज झाला, पडदा उघडला, नांदी होऊन बराच काळ झाला तरी अद्याप नाटकातील प्रमुख पात्रे विंगेतच बसून आहेत. तेव्हा मोदी सरकारचा खरा खेळ सुरू तरी कधी होणार हा जनतेच्या मनातील रास्त प्रश्न आहे.    
तो भेडसावत आहे देशांतर्गत जनतेला. परंतु मोदींचा भर मात्र दिसतो तो परदेशस्थ भारतीयांना कसे जिंकून घेता येईल यावर. त्यात गैर जरी काही नसले तरी हे असे सतत होत राहिले तर देशांतर्गत वातावरणात एक प्रकारचे कंटाळवाणेपण भरून जाण्याची भीती आहे. कुंपणापलीकडच्या रुक्मिणीला वश करण्याच्या प्रयत्नात घरच्या सत्यभामेस फुले का पडती शेजारी.. हा प्रश्न सतत पडू देणे अंतर्गत शांततेसाठी धोक्याचे ठरते.