यशोशिखर गाठण्यासाठी चौकटबद्ध वाट चोखाळण्याची आवश्यकता नाही हे नेमबाज जितू रायच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील एअर पिस्तूल प्रकारातील सुवर्णपदकाने सिद्ध झाले आहे. अगदी आतापर्यंत जितू राय हे नाव नेमबाजी वर्तुळालाही नवीन होते. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या नेमबाजी विश्वचषकात त्याने सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली, जागतिक क्रमवारीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आणि तो चर्चेत आला. जितू मूळचा नेपाळचा. वडील शेतकरी आणि आई गृहिणी आणि सहा भावंडं. नेमबाजीसारख्या खेळासाठी एकदमच प्रतिकूल वातावरण. २००६ मध्ये जितूच्या वडिलांचे निधन झाले आणि उदरनिर्वाहासाठी त्याने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. काटक शरीराच्या बळावर त्याने भारतीय लष्करात शिपाई म्हणून प्रवेश केला. ११ गोरखा रेजिमेंट ही त्याची कर्मभूमी. नेमबाजी त्याच्या कामाचा भाग. हे तंत्र अधिक घोटीव करण्यासाठी मध्य प्रदेशातील आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये पाठवण्यात आले. विशेष म्हणजे सर्वसाधारण प्रदर्शनामुळे त्याला चक्क पुन्हा त्याच्या रेजिमेंटमध्ये परत पाठवण्यात आले. हे एकदा नव्हे दोनदा घडले. मात्र त्याने हार मानली नाही. प्रशिक्षक गर्वराज राय यांनी त्याच्या तंत्रावर मेहनत घेतली. दैनंदिन कामकाज सांभाळून जितू रायने नेमबाजीचा ध्यास जपला आणि त्याचे फळ त्याला मिळाले. आर्मीच्या मार्क्समनशिप युनिटने त्याची निवड केली. ही संधी अंतिम याची जाणीव असलेल्या जितूने जीवापाड मेहनत घेतली. त्याच्या अविरत प्रयत्नांची परिणती म्हणजे गेल्या महिन्यात मारिबोर येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकातले सुवर्णपदक, जागतिक क्रमवारीतले अव्वल स्थान आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेतले सुवर्णपदक. गेल्या वर्षी राष्ट्रीय पदकाने त्याला हवालदार म्हणून बढती मिळाली. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकाने त्याला नाईक सुभेदार हा हुद्दा मिळाला. पिस्तूल प्रकारातल्या सातत्यपूर्ण यशाने त्याला ‘पिस्तूल किंग’ अशी बिरुदावली मिळाली आहे. हे सातत्य जपण्याची जबाबदारी जितूच्या खांद्यावर आहे. जितू जन्मला, वाढला नेपाळमध्ये; परंतु रोजीरोटीसाठी काम आणि पैसा-प्रसिद्धी आणि सन्मान मिळवून देणारे पदक त्याला भारताने मिळवून दिले आहे. त्यामुळे थोडे उशिराने भारताचा सुपुत्र झालेल्या या युवकाची ही कहाणी देशवासीयांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. मी नेपाळचा म्हणून भलत्या सहानुभूतीची अपेक्षाही त्याने कधी केली नाही. नेपाळ म्हणजे गुरखा किंवा थापा हा समज आणि सोशल मीडियावरून त्यावरून पसरणारे विनोद, कोटय़ा, उपहास या सगळ्यालाही जितूच्या यशाने चपराक लगावली आहे. ‘आपले-परके’ या वादात अडकण्यापेक्षा जितूने आपलेसे केलेल्या भारतासाठी पदक जिंकून देत आपल्यातल्या परक्यांवर अचूक नेम साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitu rai
First published on: 30-07-2014 at 01:03 IST