फ्रान्समधील १४३ वैज्ञानिक संशोधन-संस्थांच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ने जगभरातील शास्त्रज्ञांसाठी ‘ग्रॅण्ड मेडल’ हा कारकीर्द-गौरव पुरस्कार ४५ वर्षांपूर्वी सुरू केला, त्याचे यंदाचे मानकरी जोएल लेबोविझ सांख्यिकी भौतिक शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या पुरस्काराला शास्त्रकाटय़ाच्या कसोटीइतकीच भावनेचीही जोड आहे..
लेबोविझ हे चेकोस्लोव्हाकियात (आता या नावाचा देश नाही.) जन्मले. अगदी १३ वर्षांचे होईस्तो बेने इस्रायली धर्मीयांच्या शाळेतच त्यांचे शिक्षण झाले आणि १४ वर्षांचे असताना, १९४४ साली हिटलरी फौजांनी त्यांच्या कुटुंबाला छळछावणीत टाकले. तेथे वडिलांसोबतच राहायला मिळावे म्हणून ‘वय १५’ सांगणारे अजाण जोएल, काही आठवडय़ांतच वडिलांची ‘निवड’ (गॅस चेम्बरसाठी!) झाल्यावर कुप्रसिद्ध ऑश्विट्झ छावणीत आपल्याही ‘निवडी’ची वाट पाहू लागले. तोच युद्ध संपले. जोएलना हॉलंडकडे धाडण्यात आले, परंतु तेथून अमेरिकेस पोहोचून त्यांनी विज्ञान शिक्षणाची कास धरली. या प्रवासाच्या काळाबद्दल किंवा त्याही आधीच्या हालांबद्दल जोएल अगदी कमी बोलतात. त्यांना त्यापेक्षा ‘आज’ महत्त्वाचा वाटतो. या काळजीतूनच, शास्त्रज्ञांना दडपू पाहण्याच्या प्रकारांविरुद्ध जागरूक असणाऱ्या संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्तेही बनले आहेत. ‘या संघटनेचे काम शीतयुद्ध काळात, रशियन शास्त्रज्ञांना पाठिंबा देण्यासाठी सुरू झाले खरे, पण आजची स्थिती अशी की, रशियाइतकाच अमेरिकेचाही कडवेपणा शाबूत आहे- त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या शास्त्रज्ञांना सह-संशोधन करू देण्यास कोलदांडे घालतातच’ ही परिस्थिती लेबोविझ खुलेपणाने मांडतात. अर्थात इजिप्तच्या खालिद अल-कुझाझ या अभियांत्रिकी प्राध्यापकास केवळ ते पदच्युत अध्यक्षांचे सल्लागार होते म्हणून कैदेत ठेवणे यासारखी दडपणूक अधिक मोठी आहे, असे त्यांना वाटते.  
सांख्यिकी भौतिकशास्त्र या शाखेस सामान्यजन ‘सूक्ष्मदर्शकाखालच्या गणनांवर आधारित आकडेशास्त्र’ समजत असले तरी त्याचा आवाका प्रचंड आहे, हे सांगताना मात्र प्रा. लेबोविझ रमतात. ‘पाण्याचा उत्कलनबिंदू उंच पर्वतराजींत वेगळा असतो,’ हे भौतिकशास्त्र सांगतेच.. पण तो कोठे किती असेल याचा अचूक अंदाज संख्याभौतिकी देते आणि येथपासून ते ताऱ्यांच्या पृष्ठभागांवरील हालचाली कसकशा पद्धतीने होताहेत याची निरीक्षण-गणने उपलब्ध होताच पुढील हालचाली कोणत्या याचाही वेध हे शास्त्र घेऊ शकते, याची आठवण ते देतात. त्यांनी १९५६ साली पीएच.डी. केल्यानंतर लिहिलेले ५८६ शोधनिबंध, दोन पुस्तकांचे संपादन, बिगरशास्त्रीय लेखनातही रस.. हे सारे तपशील मागे पडून उरतो एक माणूस.. नुसता ‘वाचलेला’ नव्हे.. ‘जिवंत’ राहिलेला!