म्यानमारमधील लष्करशाहीला विरोध करणारा एक पत्रकार तब्बल १९ वर्षे तुरुंगात खितपत पडतो, पण तेथेही पत्रकारितेची धग टिकते आणि या तुरुंगात राजकीय कैद्यांच्या मानवाधिकारांची पायमल्लीच कशी होते आहे याचा विस्तृत वृत्तान्त हाच पत्रकार संयुक्त राष्ट्रांकडे पाठवतो.. पुढे जगाने या दु:स्थितीची दखल घेतल्यामुळेच म्यानमारवर पुरेसा आंतरराष्ट्रीय दबाव येतो.
एवढय़ा कमी शब्दांत सांगता येणारी गोष्ट, म्यानमारमधील पत्रकार ऊ विन तान यांच्या गेल्या तीन दशकांतील संघर्षांची. पण हा संघर्ष प्रत्यक्ष जगलेल्या तान यांचे निधन सोमवारी (२१ रोजी) झाले आणि या निधनवार्तेसोबत, त्यांच्या संघर्षांतील अनेक तपशीलही पुढे आले. पत्रकार दमनशाहीशी झगडू शकतो तो कसा आणि किती, याचे हे तपशील.  एका वृत्तपत्राचे संपादक म्हणून तान यांनी या देशातील १९६४ पासूनच्या लष्करी राजवटीविरुद्ध भूमिका घेतली. १९८८ मध्ये उठाव झाला, तो मोडून काढताना सरकारने ‘देशविरोधी’ लिखाण केल्याचा ठपका तान यांच्यावर ठेवला. चाळिशीत असताना- ४ जुलै १९८९ रोजी तान यांची रवानगी इनसेइन् कारागृहात झाली. तेथील छळामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागली. कागद-पेन बाळगले, ‘टाइम’ वा ‘न्यूजवीक’चे अंक मिळाले अशा कारणांवरून कुत्र्यांसाठी बांधलेल्या कोठडीत त्यांची रवानगी झाली. काही काळ लेखणी नव्हती म्हणून, बांबूच्या बोरूने- विटांच्या पावडरीची ‘शाई’ बनवून ते लिहीत राहिले! अन्य कैद्यांशी आठवडय़ातून एकदा बोलण्याची परवानगी होती. मूळचे लेखक-समीक्षक प्रकृतीचे पत्रकार तान कैद्यांपुढे भाषणे करीत.. ‘राजकारण्यांनी स्वत: लावलेल्या झाडांची फळे स्वत: खाण्याची इच्छाही धरू नये. उलट, ज्यांची फळे पुढल्या पिढय़ांना चाखायला मिळतील अशाच झाडांचे संगोपन करतात, ते उत्तम राजकारणी’ अशी त्यांची वाक्ये काही कैद्यांना आजही लक्षात आहेत. अशा ११५ कैद्यांची स्थिती मांडणारा, ८३ पानी वृत्तान्त त्यांनी या कैद्यांच्या स्वाक्षऱ्यांनिशी संयुक्त राष्ट्रांकडे १९९५ मध्ये पाठवला. याची बक्षिसी म्हणून १९९६ साली, त्यांची कैद आणखी सात वर्षांनी वाढवण्यात आली. हृदयविकाराचे दोन झटके, अधू होत जाणारी दृष्टी, मूत्राशयाचा व मूळव्याधीचा त्रास आदी व्याधींशीही तान झुंजत होतेच; कारण डॉक्टर आणि नातेवाईक हे फक्त १५ दिवसांतून एकदाच भेटू शकत. अखेर आंतरराष्ट्रीय दबावामुळेच, २००८ मध्ये तान (तेव्हाचे वय ७९) यांना सरकारने तुरुंगाऐवजी घरी ठेवले. स्वत:च्या घरातही, ब्रह्मी राजबंद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तुरुंगातील निळा गणवेश तान घालत, तो अखेपर्यंत.  ‘काय करतील? दबाव आणत राहतील.. सत्तेपुढे किती झुकायचे हे माणसांनी ठरवायचे’ हा संदेशही अखेपर्यंत ते जगले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist opposes myanmar military rule euvin tan
First published on: 25-04-2014 at 01:02 IST