loksatta@expressindia.com

‘विनोदवीराचे गांभीर्य’ हे  संपादकीय (३ मे) वाचले. राज्यकर्ते आणि पत्रकार यांचे परस्परसंबंध ‘लव्ह अ‍ॅण्ड हेट’ या स्वरूपाचे असतात. बायरनने स्त्रियांविषयी ‘वुई कांट डू विदाऊट देम अ‍ॅण्ड वुई कांट लिव्ह विथ देम’ असे म्हटले आहे. राज्यकर्त्यांना पत्रकारांबद्दल कदाचित/ नेमके हेच वाटत असावे. विनोदवीराचे व्हाइट हाऊसमधील चौकार आणि षटकार पाहिले, वाचले. ‘लंकेत सोन्याच्या विटा’ ही म्हण आठवण्याऐवजी सर्वत्र उपलब्ध असलेल्या सोनपापडीचा तुकडा खाऊन स्वस्थ बसावे हे उत्तम! आपल्याला भाट, चारण, बंदी किंवा फारच झाले तर काहींना संस्कृत नाटकातील विदूषक, तमाशातील सोंगाडय़ा किंवा सर्कसमधील जोकर आठवेल पण हा विनोदवीर थेट आणीबाणीनंतर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच्या पु.लं.च्या ‘जाती’चा वाटला. राष्ट्राध्यक्षांसह श्रोते ज्या मोकळेपणाने त्याच्या अस्वली गुदगुल्यांना दाद देत होते ते प्रेक्षणीय होते. प्रतिभाशाली कलावंताची कला सर्व प्रकारे फुलते ती अशा निरोगी, केवळ निवडणुकीच्या मखरात ठेवलेली नव्हे तर लोकांच्या जीवनात रक्तासारखी सळसळणारी लोकशाही असलेल्या देशात!

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

धरणसाठय़ांची स्थिती दिलासादायक

‘राज्यात पाणीचिंता’ या बातमीत (३ मे) धरणातील पाणीसाठय़ांच्या उपलब्धतेची २ मे रोजीची जी टक्केवारी दिली आहे ती, मागच्या काही वर्षांचा आढावा, नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन, या मोसमातील अंदाज हे सगळे विचारात घेता ते दिलासादायक आहे असेच म्हणावे लागेल. कारण महाराष्ट्रातील धरणांतील पाण्याचे नियोजन हे नैर्ऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असते. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर भागातील महापुरामुळे पावसाळय़ात पाणी साठवणूक वाढावी म्हणून रिकामे करण्याची सूत्रे काही प्रमाणात बदलली आहेत, त्याचा परिणामही थोडाफार साठय़ांच्या टक्केवारीवर जाणवतो. एरवी धरणांमध्ये दीड महिन्यात नवीन पाणी येण्याची शक्यता, शेवटचे एखादे उन्हाळी पिकांसाठी आवर्तन आणि जलविद्युत केंद्रासाठी ठरलेला कोटा (कोयना वगळता इतरत्र विद्युतनिर्मितीनंतर वापर होतोच) याचा विचार करता विभागवार धरणसाठे, किमान ३८.३१ ते कमाल ५२.७४ टक्के निश्चितच दिलासादायक आहेत.

– सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)

ही तर्कटे बंद करून विकासाबद्दल बोला..

‘भाजप आता मुंबईच्या स्वातंत्र्यासाठी लढणार’ ही देवेंद्र फडणवीसांची गर्जना ऐकून हसावे की रडावे तेच कळेना? मुंबई पारतंत्र्यात गेल्याचा साक्षात्कार फडणवीसांना कधी झाला? आणि झालाच असेल तर एक मुंबईकर म्हणून सांगतो मुंबईचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी इथले मुंबईकर सक्षम आहेत त्यांना कोणा नागपूरकर किंवा कोल्हापूर- पुणेकरांची गरज नाही. बुलेट ट्रेनचा आर्थिक भार जबरदस्तीने मुंबईच्या माथी मारत मुंबईची बीकेसीची मूल्यवान जागा लुबाडणाऱ्यांच्या तोंडी तरी ही भाषा शोभत नाही. २५ वर्षे सेना महापालिकेत सत्तेत होती पण मग तेव्हा तुम्हीही तिथे होतात ना? मग आता तुम्ही ही जी काही पोल-खोल करीत आहात ती तेव्हाच का केली नाहीत की तेव्हा तुमची मिलीभगत होती म्हणून बोलती बंद होती? बाकी हल्ली फडणवीस काहीही बोलतात. बाबरी पडली तेव्हा म्हणे हे तिथे होते मग आज इतके दिवस गप्प का होते? की बाबरी खटला संपून सर्व निर्दोष सुटायची वाट पाहात होते आणि आता मैदान साफ झाल्यावर यांना कंठ फुटला? भाजप कारसेवकांच्या मागे लपत होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकटेच होते, ज्यांना बाबरी पाडणऱ्या शिवसैनिकांचा अभिमान होता आणि तो त्यांनी जाहीरपणे व्यक्तही केला. काश्मीरमधील मेहबूबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन करण्याबाबतीतही फडणवीस आता असेच काहीसे अजब तर्कट सांगताहेत. म्हणे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठीच मेहबूबांबरोबर घरोबा केला. ही बकवास इमरान खानच्या ‘माझे सरकार अमेरिकेने पाडले’ यापेक्षाही मोठी पुडी आहे. तेव्हा भाजपने आता पुडय़ा सोडणे बंद करून मुंबईच्या विकासाविषयी त्यांच्याकडे काही योजना असतील तर त्याविषयी बोलावे हे उत्तम.

– अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)

या गावात लावला जात नाही लाऊडस्पीकर..

ध्वनिप्रदूषणाचा त्रास धर्माना नव्हे तर आपल्याला होत असतो. सगळे धर्माभिमानी, धर्मगुरू आणि राजकारणी यांनी नांदेड जिल्ह्यातील बारड गावच्या गावकऱ्यांच्या उदाहरणातून काही बोध घेतला तर देशात शांती आणि सलोखा नांदायला मदत होईल. या गावात बुद्धविहार, जैन मंदिर, मशीद आणि बारा मंदिरे आहेत. या गावातील सगळय़ा जाती-धर्माचे लोक एकत्र जमले आणि ध्वनिप्रदूषणाला कारणीभूत असलेल्या सगळय़ाच गोष्टी बंद करण्यावर त्यांच्यात एकमत झाले. गेल्या सव्वाचार वर्षांपासून या गावात कोणत्याही प्रार्थनास्थळावर भोंगा लावला जात नाही. एवढेच नव्हे तर सण समारंभ, लग्न मिरवणुका, प्रचारसभा, भाषणे यासाठीसुद्धा लाऊडस्पीकर लावले जात नाहीत. अगदी काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या निवडणूक सभासुद्धा विनाभोंगा पार पडल्या. सलोख्याच्या वातावरणात राहणारे हे सगळे गावकरीच आदर्श समाजसुधारक आहेत. सगळय़ांनीच यांच्याकडून काहीतरी शिकावे.

– शरद बापट, पुणे

राज ठाकरे यांचा अण्णा हजारे केला जातोय ?

सध्या राज्यामध्ये सगळीकडे फक्त राज ठाकरे ठळकपणे दिसत आहेत. त्यांच्याबद्दलच चर्चा सुरू आहे. हे अचानक कसे काय घडतेय, असा प्रश्न पडला असेल तर ते अचानक घडत नाही तर तसे घडवले जात आहे. पूर्वीही लोकपाल बिलाच्या वेळी अण्णा हजारे भाग १ मध्ये एकदा असेच घडवले होते. भाजपचा अजेंडा, हाच आपला झेंडा म्हणून ज्यांनी खांद्यावर घेतला त्यांना ‘‘तू लढ बापू, आम्ही रसद पुरवू’’ असे सांगून डोक्यावर घेतले गेले.  राज ठाकरेंना लक्षातही येणार नाही, इतक्या बेमालूमपणे तरुण वयातच त्यांचा अण्णा हजारे केला जातोय. वापरायचे आणि फेकून द्यायचे हा त्यामागचा हेतू.

– किरण कुरणे, विक्रोळी, (मुंबई)

आपल्यालाही असे काही करता येईल का?

मशिदीवरील भोंग्यांसदर्भात अब्दुलकादर मुकादम यांचा लेख (१ मे) वाचला.  आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून मशिदींवरील भोंग्यांचे उद्दिष्ट हे भोंगे न लावता कसे साधता येईल याविषयी ते प्रयोग करीत आहेत याचा आनंद वाटला.

मला माझ्या हिंदु बांधवांना विनंती करायची आहे की आपल्या उत्सवांच्या बाबतीत, विशेषत: गणेशोत्सवाच्या बाबतीत असेच काही करता येईल का याचा विचार करावा. यात रस्ते अडवणारे मांडव, लाऊडस्पीकरचा आवाज, विसर्जनाच्या दिवशीच्या मिरवणुकीचा वेग वाढवणे या मुद्दय़ांचा विचार करता येईल. सर्वाच्या सहमतीने हे काम झाल्यास मिरवणुकीत भाग घेणे, नाचणे यांच्या आनंदाला न मुकताही हे काम होऊ शकेल. 

– स. सी. आपटे, पुणे

मी मारल्यासारखे करतो, हीच भूमिका..

‘पंतप्रधान कार्यालयात गोडसेभक्त’ (३ मे) असल्याचा गंभीर आरोप दिल्लीत गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे. समस्त भाजप पक्ष आणि मोदी स्वत:ला गांधीभक्त म्हणवत असले तरी गांधींवर टीका करणाऱ्या, गांधीजींची अवहेलना करणाऱ्या आणि गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या अनेक भाजप नेत्यांवर, कथित हिंदुत्ववादी संघटनांवर मोदींनी काहीही कारवाई केलेली दिसून येत नाही. मध्यंतरी तथाकथित साध्वी आणि मालेगाव बॉम्बस्फोट कटातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुरामला देशभक्त म्हटले. बराच गहजब झाल्यानंतर पंतप्रधानांनी, ‘आपण प्रज्ञासिंह ठाकूर यांना कधीच माफ करू शकणार नाही,’ अशी गुळमुळीत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या ‘नथुराम देशभक्त होता’ या विधानावर मोदी नाराजी व्यक्त करतात. पण नुकत्याच झालेल्या एका दूरचित्रवाणीवरील चर्चेत प्रसिद्ध गुजराती लेखक विष्णू पंडय़ा यांनी प्रज्ञासिंह ठाकूरला ‘संत’ उपाधी देऊन थांबले नाहीत तर त्यापुढे जात त्यांनी  ‘गोडसे देशभक्त होता, ज्याप्रमाणे गांधी देशभक्त होते’ असे विधान करून नथुरामनंतर गांधी देशभक्त होते, असे अप्रत्यक्षपणे सूचित करण्याचा प्रयत्न केला. पंडय़ा हे काही सामान्य संघ प्रचारक नसून पद्मश्री विजेते आणि गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्षदेखील आहेत.

२०१७ सालच्या सेवाग्राम आश्रमच्या वार्षिक कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांची सूत कातणारी छबी हटवून त्या जागी नरेंद्र मोदी यांची तशीच छबी बाराही महिन्यांवर चितारली होती. भाजपच्या एका नेत्याने भविष्यात महात्मा गांधी नोटांवरूनदेखील गायब होतील, असे विधान केले होते.

मध्यंतरी कर्नाटक राज्यातील भाजपचे एक संसद सदस्य अनंतकुमार हेगडे यांनी ‘महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्यलढा हे केवळ एक ढोंग- नाटक होते. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांच्या सोयीची भूमिका घेतली म्हणूनच महात्मा गांधी यांना कधी ब्रिटिशांच्या लाठय़ा खाव्या लागल्या नाहीत,’ अशा आशयाचे वक्तव्य केले. भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच प्रज्ञासिंह ठाकूर यांनादेखील भाजपने पक्षशिस्त या गोंडस नावाखाली नोटीस बजावली होती. त्याला आता बरेच महिने- वर्षे उलटून गेली आहेत. या नोटिशीचे पुढे काय झाले हे समजायला मार्ग नाही. नथुराम गोडसे याला शहीद, पंडित, देशभक्त समजणारा समूह आता मुख्य प्रवाहात आला आहे. या समूहाचे सदस्य फक्त भाजपचे, मोदींचे समर्थक नाहीत, तर भाजपचे खासदार आणि लोकप्रतिनिधीदेखील आहेत. या सर्व घटनाक्रमांवरून, ‘मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर’ अशीच एकंदरीत मोदींची भूमिका असल्याचे दिसून येते.

– बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे