मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या योगदानावर सर्वत्र कृतज्ञता व्यक्त झाली पण त्यांच्या एका अनुवादाचा उल्लेख झाला नाही. जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘एज्युकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाइफ’ या पुस्तकाचा पाडगावकरांनी ‘शिक्षण जीवन रहस्य’ या नावाने खूप पूर्वी – १९५० च्या दशकात अनुवाद केला व मराठी शिक्षण विश्वाला जे. कृष्णमूर्तीच्या क्रांतिकारक शिक्षण विचारांचा परिचय करून दिला. महाराष्ट्रात विकसित झालेल्या आजच्या शैक्षणिक चच्रेला सुरुवात करून दिली.
१९४८ साली जे कृष्णमूर्ती यांच्यासोबत महाराष्ट्रातील बुद्धिवादी, सामाजिक राजकीय कार्यकत्रे यांचे पुण्यात विठ्ठलवाडीत येथे तीन दिवस गंभीरपणे विचार मंथन झाले होते. त्यानंतर अच्युतराव पटवर्धन पूर्णत कृष्णमूर्तीसोबत गेले. त्यानंतरच्या काळात अनेक प्रतिभावंतांवर कृष्णमूर्तीचा प्रभाव पडला त्यात मंगेश पाडगावकरही होते. पुढे मला त्या पुस्तकातूनच कृष्णमूर्तीच्या शिक्षण-विचाराची ओळख झाली.
आचार्य रजनीश यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. रजनीश यांच्याबद्दल पाडगावकरांनी दिलेले व्याख्यान बुद्धिवादी वर्गाला रजनीश वेगळ्या नजरेने समाजवून सांगणारे होते.
– हेरंब कुलकर्णी,
अकोले (जि. अहमदनगर)

दोघेही ‘लाडके’!
‘मंगेश पाडगावकर गेले..’ मोजून तीन शब्द .. अनेकांसाठी, पु.ल. गेल्याच्या बातमी नंतर, या तीन शब्दांनी टचकन डोळ्यात पाणी येण्याची ही वेळ आहे. िवदा, बापट, पाडगावकर या त्रयीत लोकप्रियतेच्या बाबतीत पाडगावकर वरचढ होते. पुण्यात टिळक स्मारकात ‘पु.लं’च्या एका स्मृतिदिनी पाडगावकर यांनी पुलंच्या आठवणी सांगून सगळ्यांना खिळवून ठेवले होते.
– मनोहर निफाडकर,
निगडी (पुणे)

८७ वर्षांच्या ‘तरुण कवी’ची भेट..
” My body is 87 years old . i am young . my age zero , so take drink and lets enjoy life ”  हे शब्द आहेत पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे . त्यांच्या या वाक्यावर विनोद म्हणून हसावं की त्यांच्या विनोदातून जगण्यासाठीचा अर्थ शोधावा? खरे तर हसण्यासारखा विनोद झालाच पण जगण्यासाठीचा मार्ग सुद्धा सापडला . प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा कसा हे पाडगांवकरांमुळे कळलं . मन कधीच झिजत नाही . ते नेहमीच तरुण राहतं..
अशा या ‘तरुणा’ला भेटण्याचा योग १५ जानेवारी २०१४ रोजी आला. भेटीची वेळ (सायंकाळी ७.३०) ठरवून पाडगावकरांच्या घरी पोहोचलो.. आणि लहानपणी पुस्तकातून त्यांच्या कविता वाचणारा, अभ्यास करणारा मी आज प्रत्यक्ष त्या कवी सोबत दीड तास कवितांच्या रंगलेल्या मफलीत बसलो आहे . पाडगांवकर मला त्यांच्या कविता ऐकवत आहेत, यावर पुढला दीड तास माझा विश्वासच बसत नव्हता! त्या भेटीच्या छायाचित्रासह पाडगावकरांचे चैतन्यही आज आठवते आहे.
– निलेश पांडुरंग मोरे

जगायला शिकवणारा ‘मित्र’ हरपला..
सहज ,सोप्या भाषेतून वाचकाला जगण्याचे अर्थ सांगणारे संवेदनशील कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांच्या निधनाने रसिकांना जगण्यास बळ देणारा एक जिंदादिल साथी हरपला. प्रेमाची प्रेमळ भाषा, आपुलकीची मधुर भाषा त्यांच्या काव्यात होतीच आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकवण्याचे सामथ्र्यही होते.
असा जगायला शिकवणारा कवी आपल्यातून हरपल्याने मन सुन्न झाले, रसिकमन पोरके झाले आहे. दर्जेदार मराठी कवितेचा वारसा समृध्दपणे पुढे नेणारे अभिजात व्यक्तिमत्व हरपले, मराठी साहित्यातील एक तारा निखळला, अशा प्रतिक्रिया त्यांच्या जाण्यानंतर उमटल्या आहेत. परंतु भविष्यातही त्यांची कविता नव्या पिढीला कायम ऊर्जा देत राहतील. महाराष्ट्राचे लाडके कवी मंगेश पाडगावकर कवी व त्यांच्या कविता अजरामर राहतील त्यात शंका नाही.
मात्र एका प्रतिभावान , तरीही सरळ आणि साधेपणानेच – अगदी मित्राप्रमाणेच- रसिकांशी वागणाऱ्या एका दुर्मीळ व्यक्तिमत्वाला आपण सारेच पारखे झालो आहोत.
– विवेक तवटे, कळवा (ठाणे)

आशा अनेक; पण नेतृत्व अर्धवेळ!
‘आशा उद्याच्या..’ हा योगेंद्र यादव यांच्या ‘देशकाल’ या सदरातील लेख (३० डिसें.) वाचला आणि येणाऱ्या वर्षांत भारतीय राजकारणात होऊ घातलेल्या बदलाचे विचार मनात संशयाचे ढग गडद करून गेले. पण परत वाटले की आपापल्या राज्यात वर्चस्व असणारे आणि एकमेकांशी राजकारणात हाड वैर बाळगून असलेले हे राजकीय पक्ष फक्त मोदी विरोध म्हणून एकत्र येतील? जरी ते एकत्र आलेच तर त्यांना वैचारिक आधार काय असेल? ‘धर्मनिरपेक्षता’? योगेंद्र यादव संरानी त्यावरही उत्तर दिले आहे की, ज्याचे राजकारण एका विशिष्ट धर्माच्या मतपेटीवर चालते ते काय धर्मनिरपेक्षतेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेणार? पण या सर्व विवेचनात एक प्रश्न अनुत्तरित राहतो जो सध्याच्या ‘स्पर्धात्मक संघराज्याच्या’ जमान्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे वेगवेगळ्या राज्यात गुंतवणूक आण्याची चाललेली टोकाची स्पर्धा करत असल्याने या ‘संभाव्य’ महाआघाडीच्या घटक पक्षांचे असणारे वेगवेगळे हितसंबंध. या सर्वाना सुसंगत धोरणामध्ये बांधण्यात काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या ‘अर्धवेळ राजकारणात’ असणाऱ्या नेतृत्वाला कितपत यश येईल? या प्रादेशिक पक्षांच्या भाऊबंदकीला कसे तोंड देता येईल? आणि जर समजा झालीही एकजूट आणि आली महाआघाडी सत्तेत तर मग पुन्हा राष्ट्रहितापेक्षा प्रादेशिक हितसंबंध वरचढ ठरणार नाहीत याची काय शाश्वती? म्हणून पुन्हा वाटते की भाजप (मोदी) जिंकण्यात २०१४ मध्ये जसे काँग्रेसचा जो मोलाचा वाटा होता, तोच वाटा आपल्या ‘अर्धवेळ राजकीय नेतृत्वा’ला पंतप्रधान पदाचा ‘अघोषित’ उमेदवार म्हणून समोर करून काँग्रेस उचलेल.. आणि आमचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न परत विफल ठरेल.
– ज्ञानेश्वर गोरखनाथ जाधव रांजणगाव, औरंगाबाद.

उपाय ‘आहे’; पण तो करणार कोण?
‘मानव विजय’ या लेखमालेच्या अखेरच्या लेखांकातून (२८ डिसेंबर, २०१५) शरद बेडेकर यांनी, आजचे वास्तव योग्य पद्धतीने वाचकासमोर ठेवले आहे. या शतकाच्या शेवटी येणारया गंभीर परिणामांची कल्पना दिली आहे . त्यांनी याच लेखात गरीश राउत यांच्या लेखाचाही संदर्भ दिला आहे.
प्रश्न असा आहे की यावर काय उपाय करण्याची गरज आहे? या प्रश्नाचे उत्तर याच लेखाच्या शेवटच्या परिच्छेदा मध्ये दिलेले आहे.
मात्र, हव्यास व लोभ कसा कमी करणार ? या प्रश्नाचा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने आणि आपल्या राज्यकर्त्यांनी करण्याची वेळ आता हळू हळू निघून जात आहे. मोटरकार निर्माण करणाऱ्या कंपन्यांची संख्या , गाडय़ांच्या किमती व रस्त्यावरील खड्डय़ांची संख्यादेखील वाढतच आहे. हा विकास केवळ श्रीमंत वर्गा साठीच आहे.
सर्वानी सध्याच्या जीवन पद्धती विषयी शांतपणे विचार करणे ही खरोखरच काळाची गरज आहे. या संदर्भात दिलीप कुलकर्णी यांच्या ‘ऊर्जा संयम’ या पुस्तकात, आहे त्याच जीवनपद्धतीत पर्यायी मार्ग अवलंबण्याच्या दिशा सापडू शकतात. शेती व उद्योग सोडून विजेची गरज जेवढी कमी करता येईल तेवढी कमी करणे ही काळाची गरज आहे. नाही तर विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची पाळी येईल.
सध्या चच्रेत असलेला बुलेट ट्रेन चा ९८००० कोटींचा प्रकल्पदेखील अनावश्यकच आहे. देशाला याची प्राथमिकता अजिबात नाही. त्या ऐवजी शेतकऱ्यांच्या गरजा कडे लक्ष देणे व त्या पूर्ण करणे देशहिताचे आहे. सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता तो रद्द केल्यास लोकांना समाधान मिळेल .
– पुरुषोत्तम कऱ्हाडे जोगेश्वरी.

‘प्रलय’ ही शक्यता धर्मशास्त्रांतही आहे!
‘प्रदूषणातिरेकातून विनाशाकडे’ या लेखांकाने शरद बेडेकर यांची लेखमाला समाप्त झाली. या लेखमालेने वर्षभर वैचारिक खाद्य पुरवले. बेडेकरांचे विचार कधी पटले तर कधी पटले नाहीत; पण सोमवारची वाटमात्र पाहिली जात होती. ज्या ‘मानवधर्मा’तून आजमितीला असलेले यच्चयावत धर्म व त्यांचे पंथोपपंथ निर्माण झाले त्याच्या पुनस्र्थापनेची गरज आहे हे निर्वविाद. तसे होईल की नाही? .. न होण्याचीचीच शक्यता जास्त!
बेडेकरांनी निष्कर्ष काढला आहे तो मात्र पारंपरिक आहे. अनेक धर्मशास्त्रांत जगाची वाटचाल प्रलयाकडे चालली असल्याचे प्रतिपादले आहे. पॅरिस येथे अलीकडेच पार पडलेल्या पर्यावरण विषयक परिषदेने यावर नकळत शिक्कामोर्तब केले आहे. आजपर्यंत आíथक संपन्नतेच्या नावाखाली त्यांनी विकसनशील व मागासलेल्या देशांशी जे पर्यावरणीय दुर्वर्तन केले, अती कार्बन उत्सर्जनाने व मतलबी धोरणांनी जी वाट लावली त्याचे उत्तर दायित्व स्वीकारायला ते तयार नाहीत. पर्यावरण ऱ्हासाच्या व त्यातील सुधारणेच्या गप्पा मारून, त्याचे परिमार्जन दुर्बळांकडूनच करवून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे फळ बोडेकर म्हणतात त्या प्रमाणे विनाश आहे आणि तो अटळ आहे. ऋतुचक्र आपला बदल-मानस प्रकट करतेच आहे.
– रामचंद्र महाडिक, सातारा

मुलांना शाळा हव्यात, तुरुंग नको
बालगुन्हेगारांचे वय १८ वरून १६ करण्याचा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत, कोणताही सांगोपांग विचार न करता संमत करण्यात आलेला आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील बालगुन्हेगार आरोपीला शिक्षा होणे आवश्यकच होते. केवळ तीव्र लोकभावनेच्या आहारी जाऊन कायदा बदलणे सुदृढ शासनव्यवस्थेचे लक्षण नव्हे. संयुक्त राष्ट्रांच्या बालहक्क जाहीरनाम्यात १८ वयापर्यंत बालगुन्हेगार, हा संकेत आहेच.
मुळात लहान मुले गुन्हा का करतात हे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना व्हायला हव्यात. बऱ्याच वेळा अशी मुले समाजाच्या अत्यंत खालच्या थरातून आलेली असतात. पालकांच्या गरिबीमुळे जर ते शिक्षण घेऊ शकत नसतील तर हा दोष त्यांचा झाला का? अशा वेळी ही मुले जर गुन्हेगारीकडे वळली तर तोही दोष त्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार नाकारणाऱ्या शासनव्यवस्थेचा आणि समाज म्हणून आपला आहे. मग आपल्या दोषाचे निवारण करण्याचे सोडून त्यांना शिक्षा करणे म्हणजे जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रकार झाला. अशा मुलांना शाळा हव्या आहेत, तुरुंग नको. तुरुंगांमध्ये सराईत गुन्हेगारांच्या संगतीत राहून, सुटून आल्यावर ते अधिक गंभीर गुन्हे करण्याचीच शक्यता जास्त आहे.
– विनोद थोरात, जुन्नर

परीक्षा म्हणजे फक्त लेखीच,
या गैरसमजामुळे पास-नापासाचे शिक्के
पाचवी ते आठवी परीक्षा सुरू कराव्यात ही बातमी वाचली. आता परीक्षाच नाहीत का? – तसा सरसकट गरसमज समाजमनात शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यापासून सुरूच आहे. मुळात या कायद्यान्वये विद्यार्थाचे ‘सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन’ ही नवी परीक्षा पद्धतीच सुरू झाली. यातील आकारिक मूल्यमापनातून मुलांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा व सोबतच एक लेखी चाचणीतून त्याचे खऱ्या अर्थाने सर्वागीण मूल्यमापन व्हावे, ही अपेक्षा आहे. सत्राच्या शेवटी संकलित मूल्यमापनातून मुलांची तोंडी/ प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा प्रत्येक शाळेत आजही घेतलीच जाते. मग ही परीक्षा नाही तर काय आहे हे शिक्षण तज्ञांनी तरी समजावून सांगावे. यातून मुले व्यक्त होण्यासाठी त्यांना हे साधन लाभले, सोबतच अध्ययन-अक्षम मुलांच्या अध्ययनातील अडचणी शिक्षकांना समजून घेणे सोपे झाले.
निव्वळ लेखी गुणांच्या आधारावर मुलांचे मूल्यमापन करून त्यावर पास-नापास शिक्का देणे हे मुळात अयोग्यच. काही मुले लेखी प्रश्न पत्रिकेतील उत्तरे बरोबर लिहीत नाहीत. याचा अर्थ ती नापास असा काढणे म्हणजे एकीकडे ज्ञानरचनावाद राबवायचा व मूल्यमापन वर्तनवादानुसार करायचे हे न पटणारे आहे. अनेकदा जी मुले लेखी परीक्षेत मागे असतात तीच मुले स्वलेखन छान करतात. संवाद छान साधतात. नापासाचा शिक्का मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करेल. शिक्षण संक्रमणावर देखील परिणाम होईल.
– संतोष मुसळे,  जालना

आठवले यांचा मुद्दा
‘आठवले तसे(च)’ हे पत्र (लोकमानस, २४ डिसें.) खासदार रामदास आठवले यांच्यावर पूर्वग्रहदूषित टीका करणारे आहे. बाल न्याय सुधारणा विधेयकावरील चच्रेत खा. रामदास आठवले यांनी भाग घेतला. विधेयकाला पाठिंबा देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. स्त्रियांचा विनयभंग, बलात्कार करणाऱ्यांस शिवशाहीत हातपाय तोडण्याची शिक्षा होती. अशा कायद्याचाही तेव्हा धाक होता. आजच्या शासनकर्त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा असे आवाहन राज्यसभेत करणे, ही अभिमानाची बाब आहे. यात पत्रलेखकांस कसला बालीशपणा दिसला? मुद्दा शिक्षा कठोर असाव्यात, हा होता. तो आठवले यांनी योग्यरीत्या मांडला आहे.
– हेमंत रणपिसे,
(जनसंपर्क प्रमुख, रिपाइं- आठवले गट)

विसरा अखण्ड भारताचे दिवास्वप्न
रा. स्व. संघाचे स्वयंसेवक व भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांनी अल् जझीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा असे मत मांडले की ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश पुन्हा युद्धाने नव्हे तर लोकेच्छेने एकत्र येतील व लवकरच अखंड भारताची निर्मिती होईल’. त्यांच्या या कथनावर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या व त्यांना सारवासारव करावी लागली. त्यांनी व्यक्त केलेले विचार आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणारे आहेत.
मोहम्मद अली जिनांचे भाचे मेहमूदाबादचे राजा यांनी १९४०साली पाकिस्तान-निर्मितीसंबंधात काय म्हटले होते यावर या निमित्ताने दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. त्यांचे म्हणणे हाते की, ‘आमचा आदर्श मुस्लीम राष्ट्र निर्माण करणे नसून इस्लामिक राष्ट्र निर्माण करणे हा आहे. पहिले इस्लामिक राष्ट्र महम्मद पगंबरांच्या हयातीत १३०० वर्षांपूर्वी मदिनेत अस्तित्वात आले, तर पाकिस्तान हे असे दुसरे इस्लामिक राष्ट्र असेल. (संदर्भ- क्रिएटिंग न्यू मदिना, पृ.- २१०,ले-वेंकट धुपिपाला) गेल्या ६८ वषार्र्त अशा कट्टर धार्मिक विचारांचा भडिमार झालेले राष्ट्र सम्मीलित करून आपण या देशाचा विनाश ओढवून घेणार नाही का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे विभाजन झाल्यावर १९५५ साली मांडलेले विचार या ठिकाणी उद्धृत करणे उचित ठरेल. ते म्हणाले,‘ मी पाकिस्तानचा तात्त्विकदृष्टय़ा समर्थक होतो. मी पाकिस्तानची यासाठी वकालत केली की, मला वाटत होते की फाळणीमुळेच हिंदू नुसते स्वतंत्र होणार नाहीत तर मुक्तही होतील. जर भारत आणि पाकिस्तान देश म्हणून एकत्र राहिले असते तर हिंदू स्वतंत्र होऊनदेखील मुस्लिमांच्या दयेवर राहिले असते. हिंदूच्या दृष्टीने स्वतंत्र भारत मुक्त भारत म्हणून राहिला नसता. फाळणी झाली नसती तर दोन देशांचे मिळून एक सरकार राहिले असते. अशा स्थितीत मुस्लीम हीच राज्यकर्ती जमात राहिली असती.’
फाळणीसंबंधीच्या या वादास निश्चित स्वरूप देऊन त्याची चिकित्सा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या १९४१ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाद्वारे केली. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती १९४५ साली आली, तेव्हा ग्रंथाचे बदललेले नाव होते-‘पाकिस्तान ऑर दि पार्टशिन ऑफ इंडिया’. डॉ. आंबेडकरांनी हा ग्रंथ नेहमीच्या अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिला होता. फाळणीचा विचार करताना वस्तुस्थितीचे विश्लेषण शास्त्रीय भूमिकेतून केले होते. फाळणीनंतर दोन्ही देशांची आíथक व संरक्षणविषयक स्थिती कशी असेल हे आकडेवारीसह स्पष्ट केले होते. काँग्रेस व लीगच्या वाटाघाटींतून देश एक ठेवण्याच्या भावनेपायी आíथक व संरक्षण बाबतीत गोंधळ माजेल असा इशारा दिला होता. देश एक ठेवण्याच्या भावनात्मकतेमुळे लष्कराबाबत विश्वास राहणार नाही असा धोका त्यांना वाटत होता. हा संभाव्य धोका टळल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
सद्यस्थितीत देशाची आíथक व संरक्षणविषयक भरभराट कशी होईल याचीच फक्त चिंता करणे ही काळाची गरज आहे.
– सतीश भा. मराठे, नागपूर.