हा तर केवळ प्रसिद्धीच्या झुल्यावरचा झोका

गांधीजींचे ऐकत असते तर इंग्रज ‘चले जाव’ आंदोलनावेळीच चालते झाले असते.

‘कंगनाचे विक्रम’ हा अग्रलेख (१६ नोव्हे) वाचला. कंगना आणि गोखले दोघे चित्रपट सृष्टीमधले! पैसा आणि प्रसिद्धी हा त्यांचा धर्मच ! पण प्रसिद्धी ओसरू लागली की ती मिळविण्यासाठी किंवा अतिप्रसिद्ध होण्यासाठी हे कलाकार बेताल वक्तव्ये करतात. यापूर्वी सिनेसृष्टीतील अनेकांनी हा जुगार खेळून पाहिला आहे. कंगनाने गांधीजींवर भगतसिंग यांना न वाचविण्याचा ठपका ठेवला आहे. आज सत्तेमुळे मतिमंद झालेल्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की भगतसिंग व साथीदारांवर सँढर्स या अधिकाऱ्याच्या खुनाचा आरोप होता. तो त्यांनी कबूलसुद्धा केला होता. ‘माझे बलिदान हे असंख्य तरुणांना जागे करेल’ हे भगतसिंग यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. यावरून त्यांनी फासावर जाण्याची मानसिक तयारी केली होती हे यावरून स्पष्ट होते. गांधीजी हे केवळ एक आंदोलनकर्ते होते, त्यांना कोणतेही प्रशासकीय अधिकार नव्हते. तरीसुद्धा गांधीजींनी मध्यस्थी केली, पण भगतसिंग यांचा गुन्हा गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गांधीजी सरकारी कामात हस्तक्षेप करू शकत नव्हते. गांधीजींचे ऐकत असते तर इंग्रज ‘चले जाव’ आंदोलनावेळीच चालते झाले असते. कोणताही अभ्यास न करता केवळ प्रसिद्धीच्या झोक्यावर झुलत राहण्यासाठी केलेल्या या वक्तव्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच!

चंद्रशेखर चांदणे, पुणे

काल्पनिक इतिहास पसरवण्याचा धोका

गतसप्ताहात उधळलेले पद्मश्री कंगना राणावत यांचे मुक्त विचार, त्याला विक्रम गोखले यांनी दिलेला प्रतिसाद व त्यावरील संपादकीय ‘कंगनाचे विक्रम!’ वाचले. मुळात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षांंत या मंडळींना या गोष्टीचा साक्षात्कार का व्हावा? ‘स्क्रिप्ट’ येण्यास उशीर झाला की आणखी काही हे कळण्यास मार्ग नाही. गेल्या काही वर्षांंपासून राजकीय नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सार्वजनिक जीवनात कसे वागू नये याचा जणू वस्तुपाठच घालून दिला जात आहे. अशा व्यक्तींमार्फत हवा तो काल्पनिक इतिहास या आभासी माध्यमांतून पसरवला जाण्याचा धोका आहे. त्याला आवर कसा घालायचा हा मोठा प्रश्न आहे.

शैलेश न. पुरोहित, मुलुंड पूर्व, (मुंबई)

आता नोटेवर त्यांचे छायाचित्र छापून गौरव करा..

पद्मश्री पुरस्कारात पद्म (कमळ) असल्यामुळे स्वातंत्र्यदेवता, प्रकांडविदुषी श्रीश्री कंगना राणावत यांना भारत २०१४ साली स्वतंत्र झाल्याचा साक्षात्कार होणे अतिशय स्वाभाविक आहे. लहान नातवंडाबरोबर बोबडे बोलण्यात कौतुक असते, पण तसेच समाजामध्ये बोलणाऱ्याला बोबडकांदा म्हणतात. कांद्याच्या केलेल्या कमळाचा किती उपयोग होतो हे राजमान्य राजश्री गोखले जाणून असावेत. संवाद म्हणताना गोखले पॉझ घेतात तेव्हा ऐकणाऱ्याला / बघणाऱ्याला असे वाटते की ते काही विचार करून पुढचे वाक्य म्हणतात, पण आता त्यांच्या स्मरणशक्तीवर संशय घेतल्यास वावगे ठरणार नाही. ‘बॅरिस्टर’ गोखल्यांनी इतिहासाची पाने उलटून नीट अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की क्रांतिकारकांना न्यायालयात वाचवण्याचा प्रयत्न करणारे राजकीय नेते हे ‘बॅरिस्टर’ होते. १९४७ ते २०१४ पर्यंत पारतंत्र्यात राहून गोखल्यांनी केलेली एकूण प्रगती पाहता आणि श्रीश्री राणावत बाईंनी पडद्यावर आणि पडद्याबाहेर केलेली स्वातंत्र्य क्रांती बघता नोटेवर दोघांचे फोटो छापून त्यांचा गौरव भारत सरकारने लौकर करावा.

सुधीर गोडबोले, दादर पश्चिम (मुंबई)

केवळ एका राजकीय पक्षाला खूश करण्यासाठी..

‘कंगनाचे विक्रम’ हा संपादकीय लेख वाचला. मुळातच कंगना राणावत आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते आणि तिच्या वक्तव्याला मोठं करण्याचं काम करतात आजकालची प्रसार माध्यम आणि काही विक्रम गोखलेंसारखे समर्थक. राज्यघटनेत आपल्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याचा व आपले मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीही बोलावे. त्यासाठी काही मर्यादा आहेत. केवळ एका राजकीय पक्षाला खूश करण्यासाठी ते अशी वक्तव्य करत असतील तर हे चुकीचे आहे.

राजू केशवराव सावके, तोरणाळा (वाशिम)

फुकाचा गवगवा नको, सक्षमीकरण हवे

‘जनजातीय गौरव – बिरसा मुंडा’ हा एल. मुरुगन यांचा लेख (१६ नोव्हेंबर) वाचला. एकीकडे आदिवासींच्या सन्मानासाठी बंड करणाऱ्या बिरसा मुंडा यांना ‘भगवान’ संबोधून, ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा केला जातो व दुसरीकडे ‘जय भीम’सारख्या चित्रपटातून, आदिवासी जमाती वर होणारे अन्याय मनाला चटका लावून जातात. आदिवासींच्या हक्कांसाठी अनेक कायदे व संविधानात प्रयोजन असले तरी, त्यांची सर्रास पायमल्ली होते. फॉरेस्ट राइट्स अ‍ॅक्ट २०१९, मध्ये अधिकारी वर्गाला अतिरिक्त अधिकार दिल्याने ग्रामसभा व आदिवासी जमातीच्या अधिकारांवर व मिळकतीवर परिणाम झाला आहे. या कायद्यानुसार, त्यांच्यावर दाखल केल्या जामाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये त्यांनाच स्वत:ला निर्दोष सिद्ध करावे लागते. आजच्या घडीला जयंती साजरी करून गवगवा करण्यापेक्षा, त्यांच्या सक्षमीकरणावर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. यासाठी अ‍ॅडव्होकेट चंद्रूसारख्या अनेकांची गरज आहे.

अंकिता विलास भोईर, कल्याण

असे उल्लेख बदलणे निवडणुकीत कामी येईल..

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मौर्यकालीन इतिहासातील चुकीच्या नोंदी काढून टाकण्यात येत असल्याचे समजले. (उलटा चष्मा, लोकसत्ता १७ डिसेंबर) या संदर्भातील आणखी काही चुका दुरुस्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीर (अरेच्चा, एक अभिनेत्री-विदुषींच्या बहुचर्चित विधानामुळे स्वातंत्र्यप्राप्तीचे वर्ष ६७ वर्षे पुढे गेल्याने ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी आता कालविपर्यास नव्हे ना?) सावरकरांच्या ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ पुस्तकामधेही योग्य ती काटछाट करावी लागेल. ‘वैदिक, यज्ञीय नि आर्य अशा पोरस राजाला अवैदिक अलेक्झांडरने जिंकले. त्याचा विजय इतका असाधारण की एखाद्याचे ‘दैवच शिकंदर’ अशी म्हण रूढ झाली.’ हे त्या पुस्तकातील उल्लेखही गाळावे लागतील.

भाजपशासित गुजराथ राज्यातील चार नागरी आस्थापनांनी अंडी व सामिष अन्नपदार्थांची विक्री एकतर थांबवावी किंवा या पदार्थांवर आच्छादन घालून ती विकावी असा आदेश काढला आहे. या पदार्थांच्या उघड देखाव्याने धार्मिक भावना दुखावतात असे आदेशात म्हटले आहे. न्यायालयात धार्मिक भावना दुखविल्या जाण्यासंबंधीचा हा दावा टिकवण्यासाठी धर्म ग्रंथांतील चुकीचे संदर्भही गाळावेत असे आम्ही सुचवू इच्छितो. उदा. कोवळ्या वासराचे गोमांस रुचीने खाणाऱ्या ऋषीमुनींचा उल्लेख वेदांमध्ये सापडतो. महाभारतातील शांतिपर्वात गोमांसावर ताव मारणाऱ्या ब्रह्मवृंदाचा उल्लेख आहे. तेव्हा अशा तऱ्हेचे उल्लेख नजरचुकीने आल्याचे जाहीर करून प्रस्तुत ग्रंथातून काढून टाकण्यात यावेत. कुपोषित बालके व गर्भवती महिलांना ग्रामीण स्वास्थ्यकेंद्रातून देण्यात येणारा अंडय़ाचा खुराक बंद करून त्याऐवजी पतंजलीचे एखादे आयुर्वेदिक चाटण देण्यात यावे. विविध ग्रंथातील कालविपर्यास काढणे, सामिष आहार नियंत्रित करणे वा रेलस्थानकाना धार्मिक नांवे देणे हे उपक्रम उत्तरेतील निवडणुकांमध्ये कामी येतील.

प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

देशाने उज्ज्वल भवितव्याची संधी दिली असूनही.. 

‘चकमक झाली, विकास कधी?’ या लेखामध्ये (१७ नोव्हेंबर) लेखकाने ‘नक्षल्यांवर हिंसक कारवाई हे स्थायी समाधान नसून सरकारने नक्षलीं समस्या उद्भवणारच नाही या दिशेने विकासाभिमुख धोरणे आखावीत’ अशा आशयाचे मत मांडले! आणि मग आपसुकच प्रश्न पडला की सरकारने आजतागायत नक्षली समस्यांशी दोन हात करण्यासाठी काहीच दूरगामी योजना राबवल्या नाहीत का? राबवल्या तर त्या निष्फळ होण्याची कारणे काय? नक्षलवादी आत्मसमर्पण व पुनर्वसन यासारख्या अनेक सरकारच्या विकासाभिमुख योजनांतून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हताश अथवा अज्ञानातून नक्षली झालेल्या लोकांना फायदा होईल खरा, मात्र अविवेकी बुद्धीने व स्वेछेने या क्षेत्रात गेलेल्या नक्षलींसाठीसुद्धा सरकारला कसे जबाबदार धरणार? नुकत्याच झालेल्या नक्षलीं चकमकीत ठार झालेल्या मिलिंद तेलतुंबडेने आयटीआयचा कोर्स पूर्ण केला होता. वेस्टर्न कोलफील्ड या शासकीय कंपनीत तो तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. देशाने त्याला उज्ज्वल भवितव्याची एक संधी दिलेली असताना त्याने आपल्या अविवेकी बुद्धीमुळे नक्षली होणेच श्रेयस्कर मानले याचे खापर सरकारच्या माथी फोडता येणार नाही. सरकार सामाजिक विकासासाठी कितीही कटिबद्ध असले तरीही शून्य गुन्हेगारी असलेल्या समाजाची रचना करणे अशक्य आहे. कारण अविकसित समाजाचा विकास शक्य आहे, मात्र अविवेकी मानसिकतेबाबत तसे म्हणता येत नाही.

सौरभ जोशी, बुलढाणा

त्यांना दहशतमुक्त जगण्याची संधी द्यायला हवी

‘चकमक झाली, विकास कधी?’ हा लेख विचार करायला लावणारा आहे. नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत नक्षली आणि पोलीस दोन्ही मारले जात आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलींच्या जवळचे कुटुंबीय पुन्हा शस्त्रांनिशी उभे राहात आहेत (शस्त्रे आणतात कुठून हा गहन प्रश्न आहेच). गेल्या ५० वर्षांत अनेक नक्षलीं वयस्कर झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या तरुण मुलांना त्या विभागातून (मग ते कोणत्याही पक्षांचे असोत) हेरून रोजगार व शिक्षणासाठी बाहेर काढले पाहिजे. ्नरक्षरता व गरिबी ही दोन कारणे माणसांना हिंसक होण्यास भाग पाडतात, हे आपण काश्मीरमध्येही अनुभवले आहे. अशा समस्या राजकीय एकजुटीनेच सुटू शकतात, हे लक्षात घ्यावे. गडचिरोलीतील सगळेच आदिवासी हे नक्षली, माओवादी नाहीत. त्यांना दहशतमुक्त जीवन जगण्याची शाश्वती द्यायला हवी.

श्रीनिवास स. डोंगरे, दादर (मुंबई)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta readers opinion loksatta readers mail loksatta readers reaction zws

Next Story
सीमारेषा पुसणारे सूरक्षेत्र
ताज्या बातम्या