गोव्याजवळ कारवारनजीकचा अरबी समुद्राचा प्रदेश. क्षितिजालाही कवेत घेणारा अथांग सागर, मंगळवारी रात्री कोलाहल संपल्यानंतरची साडेदहाची वेळ.. थोडय़ाशा कातरवेळीच नौदलाचे डॉर्नियर विमान आकाशात झेपावले. हे प्रशिक्षण उड्डाण होते, पण त्यात नौदलाच्या दोन उमद्या व कर्तबगार अधिकाऱ्यांचा बळी गेला. हे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन सागरात कोसळले. यातील एक महिला अधिकारी लेफ्टनंट किरण शेखावत, तर दुसरा पुरुष अधिकारी लेफ्टनंट अभिनव नागोरी अशा दोघांनाही कर्तव्य बजावताना मृत्यू आला.
 किरणला नौदलाचं जणू बाळकडू लाभलेलं, कारण तिचे वडील जहाजावर खलाशी होते. तिचा विवाह नौदल अधिकाऱ्याशी झालेला होता. दुसरीकडे अभिनव नागोरी हा नवखा तरुण होता. त्याच्या घरात यापूर्वी नौदलात कुणीच नव्हतं. एक महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्याला विमानातील संवेदक व एकूणच सागरी उड्डाणाची माहिती देत होती. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा.. या एका गाण्यातील ओळींप्रमाणे काय घडले माहीत नाही, पण विमानावरचे नियंत्रण सुटले अन् अवघा अनर्थ घडला. नौदलासाठी प्राणार्पण करणारी ती पहिली महिला नौदल अधिकारी ठरली. सतत हसतमुख असलेली किरण ही माहिती युद्धतंत्रही शिकत होती, तर गुप्तहेर युद्धतंत्रात प्रवीण होती. तिचे शिक्षण विशाखापट्टणमच्या केंद्रीय विद्यालयात झाले होते. बारावीनंतर बीएस्सीचे शिक्षण पूर्ण करून ती कुटुंबाचा विरोध पत्करून नौदलात गेली. जुलै २०१० मध्येच ती अधिकारी बनली. गेल्याच वर्षी तिची बदली गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी झाली होती. तिचे पती विवेक चोकर हे नौदलातच असून, केरळच्या राष्ट्रीय नौदल अकादमीत काम करतात. अभिनव नागोरी या उदयपूरच्या तरुणाने २०१२ मध्ये नौदलात प्रवेश केला. अभिनव हा त्याच्या मित्रांसाठी आनंदाचा ठेवा होता. अभिनवची आई शिक्षण संस्थेत प्राचार्य आहे. अभिनवला देशसेवेचे वेड होते, त्यातून तो नौदलात आला. त्याचे शिक्षण सेंट पॉल्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये व नंतरचे शिक्षण बंगळुरू येथे एसबीजी तंत्रज्ञान संस्थेत झाले. त्याने नौदलातील कारकीर्द गोव्यात दाबोलिमलाच सुरू केली होती. नौदलाचे अधिकारी वयाच्या पंचविशीपर्यंत विवाहाच्या रेशीमगाठीत अडकू शकत नाहीत, पण आता त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू असतानाच ही घटना घडली. कुणाच्याही मदतीविना तो गिटार शिकला होता. त्याने मित्रांना गोव्याला येण्याचा आग्रह धरला होता. एप्रिलमध्ये त्याच्याकडे सर्व जण जाणार होते, पण आता ही मैफल अध्र्यावरच संपली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lt kiran shekhawat and co pilot lt abhinav nagori were on board the dornier aircraft that crashed tuesday
First published on: 30-03-2015 at 12:52 IST