म. वि. तथा मामासाहेब कौंडिण्य यांच्या निधनाने नगरच्या शैक्षणिक चळवळीतील एक गांधीवादी पर्व अस्तंगत झाले. महाराष्ट्र राज्याची स्थापना होतानाच जिल्ह्यातील संगमनेरसारख्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा त्यांनी स्वीकारली. अहमदनगर महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा देऊन सन १९६१ मध्ये ते संगमनेर महाविद्यायात प्राचार्य म्हणून रुजू झाले, याच पदावर १९९३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. प्रयोगशीलता हा मामासाहेबांचा स्थायिभाव होता. मुक्तांगणसारखे स्वायत्त विद्यापीठ असेल किंवा धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान, अथश्री ग्रामीण विकास केंद्र अशा संस्थांची उभारणी करून या कार्याला त्यांनी समाजकारणाची जोड दिली. विविध ग्रामीण विकास प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी महात्मा गांधींचा ग्रामविकासाचा वारसा मोठय़ा श्रद्धेने जोपासला. विशेषत: आदिवासी, पारधी, विडी कामगार, रामोशी अशा समाजातील उपेक्षित वर्गासाठी मामासाहेबांचे प्रकल्प कमालीचे यशदायी ठरले. या लोकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मदर तेरेसा यांच्यापासून ते बाबा आमटे, मधू दंडवते, ग. प्र. प्रधान पु. ल. देशपांडे ते अगदी थेट अण्णा हजारे अशा दिग्गजांनी मामासाहेबांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रकल्पांना भरीव सहकार्यही केले. केंद्रीय नियोजन आयोगावर उच्च शिक्षण अभ्यास गटाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शालान्त परीक्षा मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, विद्यापीठाच्या समाजशास्त्र विद्या शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी ठसा उमटवला. मामासाहेबांच्या शैक्षणिक कार्यावर कर्मवीर भाऊराव पाटलांचा प्रभाव होता. मुक्तांगण मुक्त विद्यापीठाची स्थापनाच मुळी कर्मवीरांच्या ‘कमवा व शिका’ संकल्पनेतून झाली होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदास नम्रपणे नकार देणाऱ्या या निस्सीम गांधीवादी सुधारकाने संगमनेरमध्ये जी काही मालमत्ता केली होती, ती विकून हे सर्व पैसे विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देऊन टाकले, संगमनेरहून शब्दश रिकाम्या हाताने पुण्याला गेले. ‘संघर्षांकडून सामंजस्याकडे’ आणि ‘ते हरतील आपण चालत राहू’ अशी दोन आत्मचरित्रे त्यांनी लिहिली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2013 रोजी प्रकाशित
म. वि. कौंडिण्य
म. वि. तथा मामासाहेब कौंडिण्य यांच्या निधनाने नगरच्या शैक्षणिक चळवळीतील एक गांधीवादी पर्व अस्तंगत झाले. महाराष्ट्र राज्याची स्थापना होतानाच जिल्ह्यातील संगमनेरसारख्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा त्यांनी स्वीकारली.
First published on: 31-01-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: M v koundinya