म्हातारी पृथ्वी आणि पोरांची लेंढारे

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी असेल, जी १२५ कोटी झालेली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी असेल, जी १२५ कोटी झालेली आहे. आपल्या अनेक समस्यांचे मूळ ही वाढणारी लोकसंख्या हेच आहे आणि तरी काही नेते याविषयी वाट्टेल ते बडबडत आहेत..

चालू वर्षांत ५ जानेवारीला सुरू झालेल्या ‘मानव-विजय’ या माझ्या लेखमालेत आतापर्यंत ४८ लेख येऊन गेल्यावर यापुढे डिसेंबरअखेपर्यंत आजचा हा लेख धरून फक्त तीन सोमवारांचे तीन लेख उरले आहेत. आतापर्यंत या लेखमालेत आपण असे पाहिले की, अतिप्रचंड विश्वातील पृथ्वी या आपल्या लहानशा ग्रहावर सजीवतेला पोषक अशी रासायनिक द्रव्ये निसर्गत: बनून, त्यातून अब्जावधी वर्षांनी आधी काही सूक्ष्म सजीव बनले. त्यातून आणखी अब्जावधी वर्षांनी पृथ्वीवर वनस्पती व प्राणी असे दोन वर्गजातींचे सजीव निर्माण होऊन त्यांची उत्क्रांती घडत राहून, एक दुसऱ्याच्या साहाय्याने ते जीवन जगू लागले. त्यातील प्राणिजातींतून पुढे एक मर्कटसदृश प्राणी निर्माण होऊन त्याने मागच्या दोन पायांवर चालण्याची व पुढच्या दोन पायांचा हातांसारखा उपयोग करण्याची आणि आपली स्वत:ची बुद्धिमत्ता स्वत:च वाढविण्याची अशा युक्त्या शोधून काढून तो एक वेगळाच कुशल मानव-प्राणी म्हणून उत्क्रांत झाला. पुढे त्याने गुरे पाळणे, शेती करणे, घरे बांधणे, वस्त्रे बनविणे, प्रवास करणे अशा कला विकसित करून मूलत: उत्तरपूर्व आफ्रिकेत उत्क्रांत झालेल्या या माणूसप्राण्याने, त्याच्या आकाराच्या मानाने प्रचंड असलेली सबंध पृथ्वी अनेक अडचणी सोसून व्यापली. अन्नासाठी भटकत भटकत आणि कौशल्ये मिळवीत पृथ्वी व्यापणे, ही मानव-विजयाची पहिली पायरी होती.
त्यानंतर शेतीत अन्न उत्पादन, अन्नसंग्रह, शांत व स्थिर जीवन आणि त्यातून विविध मानवी संस्कृतींची निर्मिती व संवर्धन ही मानव-विजयाची दुसरी पायरी होती. त्यानंतरची मानव-विजयाची तिसरी पायरी ही की, त्याने ‘विज्ञान’ शोधून काढले. वनस्पतींचे, रसायनांचे, भौतिकीचे गुणधर्म व नियम शोधून शरीररचना समजून घेऊन आरोग्यासाठी योग, व्यायाम, अन्न व औषधे निश्चित केली. तसेच निसर्गाचे भौतिक नियम समजून घेऊन यंत्रे बनवून आणि विद्युतशक्तीच्या व विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी जीवन सुखमय बनविण्याचा प्रयत्न केला. पंख नसूनही अलीकडे तो आकाशमार्गाने प्रवास करू लागला. ‘अगदी अब्जावधी माणसे या पृथ्वीवर शांत व सुखी जीवन जगू शकतील’ अशी परिस्थिती, विज्ञान या मुख्यत्वे अवघ्या दोनचारशे वर्षांपूर्वी त्यानेच शोधून काढलेल्या साधनांच्या वापराने त्याने निर्माण केली. म्हणून एकूणच ‘विज्ञान’ ही मानव-विजयाची तिसरी पायरी होय. आता पुढे चौथी पायरी कुठली आणि केव्हा?
मानव-विजयाचे पहिले तीन टप्पे पार करीत असताना अलीकडे मात्र, काही बाबतीत मानवाने असे काही ‘विनाशकारी अतिरेक’ केले आहेत की, त्याच्या विजयाचा चौथा टप्पा गाठण्याकरिता, त्याची मानव-जातच पृथ्वीवर शिल्लक राहील की नाही, अशी भीती त्यामुळे निर्माण झाली आहे. प्रस्तुत लेखमालेच्या या शेवटच्या तीन लेखांमध्ये त्याच तीन अतिरेकांचा (घोडचुकांचा) आढावा आपण घेणार आहोत. त्यातील पहिला अतिरेक आहे ‘लोकसंख्यावाढीचा’. ‘पोरांची लेंढारे’ हा ग्रामीण शब्द मी शीर्षकात वापरला आहे तो जगाच्या अतिरेकी लोकसंख्यावाढीलाच होय. आज असे दिसते की, जगाची जनसंख्या ७ अब्जांच्या (७०० कोटींच्या) वर गेलेली आहे. त्यातील अध्र्याहून अधिक लोक एकटय़ा आशिया खंडात दाटीवाटीने राहात आहेत. त्यापैकी चीन, भारत व उर्वरित आशिया खंडात प्रत्येकी सव्वाशे कोटी किंवा अधिक लोकसंख्या आहे. जगात मानव-जात सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी फक्त आफ्रिका खंडाच्या उत्तरपूर्व भागात उत्क्रांत झाली तेव्हा या ‘होमो सॅपियन’ची एकूण लोकसंख्या फक्त दहा हजार असावी. त्यानंतर जगभर पसरल्यावर त्यांची संख्या वाढत राहून हजारातून लाखात, कोटीत आणि मागील सहस्रकाच्या अखेरीस ती अब्जात पोचली. गेल्या काही दशकांत ही जनसंख्या भरमसाट वाढून आता ती सात अब्जांवर पोहोचली आहे. म्हणजे या माणूस जातीचा आजच ‘भूमीला भार’ झालेला असावा असे वाटते. आणखी एक शतक सरण्याच्या आतच या सात अब्जांचे १४ किंवा २८ अब्जसुद्धा होऊ शकतील. साथीच्या व इतर रोगांवर औषधोपचार उपलब्ध होऊन आणि प्रत्येक माणसाला आपल्या वंशवृद्धीसाठी मुले हवी असल्यामुळे व ज्याचा त्याचा देव (प्रयत्न) त्याला ती देत असल्यामुळे जगात अनेक ठिकाणी भयंकर लोकसंख्यावाढ होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशाची लोकसंख्या ३५ कोटी असेल जी आज अडुसष्ट वर्षांनी सव्वाशे कोटी झालेली आहे. या प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढत राहिली तर चालू शतक संपण्यापूर्वीच ती किती होईल? चारशे कोटी? साडेचारशे कोटी? खरे तर भारताच्या आजच्या अनेक समस्यांचे मूळ ही अफाट वाढणारी लोकसंख्या हेच आहे आणि तरीही आमचे काही मूर्ख नेते, प्रत्येक (हिंदू)स्त्रीने चार किंवा अधिक मुलगे जन्माला घालावे (व आपआपले कुटुंब दरिद्री बनवावे!) असे सांगत आहेत.
अन्नोत्पादन वाढविण्यासाठी आपण काही उपाय योजीत असलो तरी, ‘सर्वाना खायला पुरेसे अन्न नाही’ अशी स्थिती भारतात लवकरच येऊ शकेल! आणि पाठोपाठ सबंध जगातसुद्धा तशी स्थिती लवकरच येणे सहज शक्य आहे. कारण अखेरीस तेवढीच मर्यादित जमीन, किती जणांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवू शकेल, याला काही तरी नैसर्गिक मर्यादा आहेतच व फारशी आकडेमोड न करता आपण त्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाणार असे स्पष्ट दिसत आहे. जे अन्नाचे तेच पाण्याचे! आजच जगभर पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पुढील काळात जगभर पाण्यासाठी नडलेल्या जनतेचे उठाव आणि युद्धेसुद्धा होतील, असे जाणकार म्हणतात.
खरेच जगभर अन्नपाणी व पोषणाची टंचाई निर्माण झाली तर काय होईल? आजच भारतातील गरिबांची मुले कुपोषित आहेत. तसेच मराठवाडा-विदर्भासारख्या काही प्रदेशांत काही गरीब व दुर्दैवी शेतकरी, दरवर्षी शेकडय़ांनी नव्हे, तर काही हजार जण आत्महत्या करीत आहेत. पुढे केव्हा तरी शहरी नोकरदाराला ‘त्याच्या मासिक पगारातून कुटुंबाला महिनाभर पुरेल एवढे अन्नपाणी घेता येत नाही’ अशी स्थिती निर्माण झाली, तर जगभर अनेक माणसांची उपासमार होणे किंवा अनेक जणांना जीव द्यावासा वाटणे, या घटना वरकरणी वाटतात तेवढय़ा अशक्य किंवा फार दूरच्या नक्कीच नाहीत. खरोखर जगाची स्थिती ‘म्हातारी पृथ्वी आणि उपाशी पोरांची लेंढारे’ अशी झाली आहे. निदान त्या दिशेला आपली वाटचाल चालू आहे.
तसा आपला सूर्य ५ अब्ज व पृथ्वी ४.६ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेली असून, शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की, सूर्य आणि पृथ्वी यांचे अजून प्रत्येकी सुमारे पाच अब्ज वर्षांचे आयुष्य बाकी आहे. म्हणजे त्या अर्थाने पृथ्वी आज काही म्हातारी झालेली नाही. ती कुठल्या अर्थाने व किती म्हातारी झालेली आहे ते आपण या लेखमालेच्या ‘शेवट’च्या लेखात पाहणार आहोत. प्रस्तुत लेखात फक्त ‘पोरांची लेंढारे’ आणि त्यांच्या वाढीची घोडचूक एवढेच घेऊ, कारण पृथ्वी एरव्ही जरी नीट असली तरी माणसाच्या अतिरेकी घोडचुकांमुळे, जर मनुष्यजातच पृथ्वीवरून नष्ट झाली आणि पृथ्वी पुढील पाच अब्ज वर्षे सूर्याभोवती व स्वत:भोवती गरगर फिरत राहिली आणि तिच्यावर दिवसरात्रसुद्धा होत राहिले तरी त्या पृथ्वीवर कुणीही माणूस किंवा इतर कुणी सजीव असणार नाहीत. असे फार भयंकर घडणे अशक्य मात्र मुळीच नाही. हेच या शेवटच्या तीन लेखांत आपण पाहणार आहोत. ‘म्हणजे सुरुवातीला विजयाकडे निघालेला मानव आता विनाशाकडे जात आहे’, असे वाटते! मृतवत झालेल्या पृथ्वीवर पुन्हा केव्हा आणि कसले सजीव निर्माण होतील की नाही हे कुणीच सांगू शकणार नाही आणि ते झाले किंवा न झाले तरी त्याचा आपल्याला उपयोग तरी काय?
विज्ञानाबद्दल काही लोकांना असे वाटते की, ‘विज्ञान नियम व सिद्धांत शोधून काढते व हे असे असे असते’ असे म्हणते व तिथेच विज्ञानाची उत्तरे संपतात. ‘‘ते नियम व सिद्धांत ‘बनविणारा’ कुणी तरी गॉड, अल्ला, ब्रह्म असतो हे सत्य विज्ञानवादी लोकांना कळत नाही,’’ असे ईश्वर अस्तित्व मानणारे काही लोक म्हणतात; परंतु आम्ही म्हणतो की, विश्व व त्याचे नियम बनवायला जर कुणी गॉड, अल्ला असावा लागतो, तर त्या गॉड, अल्लाला बनवायला त्याचाही कुणी तरी बाप असायला हवा. तो कोण? बरे देवाच्या त्या कुणा बापाने कोणत्या हेतूने या सर्वसमर्थ गॉडला जन्म दिला? माणसांप्रमाणे स्वत:ची वंशवृद्धी करण्यासाठी का? बरे तो गॉड, अल्ला आला व त्याने पृथ्वीवर अब्जावधी माणसे निर्मिली ती कशासाठी? खेळ (माया) म्हणून का? बरे नंतर त्याने माणसांना ‘अनेक वेगवेगळे धर्मपंथ’ सांगितले ते कशाला? सबंध मानवजातीला एकच धर्म व सर्व प्रेषितांना सारखी व सुसंगत माहिती तो देऊ शकत नव्हता का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न असूनही, जर कुणाला काहीही कारणाने, कुणी गॉड, अल्ला मानायचाच असेल, तर आम्ही म्हणू ‘हवे ते माना’, पण अशा केवळ कल्पित ईश्वरावर निदान विसंबून तरी राहू नका, कारण जर मानवजातीसाठी ‘कठीण समय आला’ व ती- तुमच्या नसेल तरी तुमच्या मुलानातवंडांच्या- संपूर्ण विध्वंसाकडे वाटचाल करू लागली तर कुणी ईश्वर किंवा अवतार तिला वाचवायला येणार नाही. त्यासाठी कितीही चर्चेस, देवळे, मशिदी बांधून कितीही नमाज, प्रार्थना, भक्ती, तपश्चर्या केल्या तरीही त्याचा काही उपयोग नाही. कदाचित मानवाची बुद्धी मात्र मानवजातीला आगामी विनाशापासून वाचवू शकेल. योग्य उपाय योग्य वेळी अमलात आणले गेले तरच.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मानव-विजय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Population in india before and after independent

ताज्या बातम्या