शोक (भूतकाळ), दु:ख (वर्तमानकाळ) आणि चिंता (भविष्यकाळ) या तिन्हीच्या दडपणाखालीच भवभयग्रस्त माणूस जगत असतो. या तिन्हीचा उगम देहबुद्धीतूनच होतो. मनोबोधाच्या बाराव्या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत या शोक, दु:ख आणि चिंतेचा उल्लेख आहे तर शेवटच्या दोन चरणांत चार महत्त्वाचे शब्द आहेत. त्यातला पहिला शब्द आहे देहबुद्धी, ज्यातून या शोक, दु:ख, चिंतेचा उगम होतो. उरलेले तीन शब्द म्हणजे विवेक, विदेहीपणा आणि मुक्ती! हे चारही शब्द व्यापक अर्थसंकेत करतात. प्रथम देहबुद्धीकडे म्हणजे काय आणि ती कमी करण्यासाठी शोक, दु:ख आणि चिंतेकडे कसं पाहावं, त्यांना कसं हाताळावं, याचा थोडा विचार करू. आता ही देहबुद्धी म्हणजे काय? श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘वासनेचे परिणत रूप म्हणजे देहबुद्धी!’’ थोडक्यात अंतरंगातील सूक्ष्म वासना तरंगांनुरूप निर्णय घेणारी आणि कृतीची प्रेरणा देणारी जी बुद्धी ती देहबु्द्धी. या वासनेचीच श्रीगोंदवलेकर महाराज यांनी अवघ्या दोन शब्दांत व्याख्या केली आहे. ते म्हणतात, ‘‘वासना म्हणजे हवेपणा आणि नकोपणा!’’ हे जे ‘हवं’ आणि ‘नको’ आहे, त्याचा पाया तरी काय? तर, ‘मी’ आणि ‘माझे’चीच अखंड जाणीव आणि जपणूक. म्हणजेच अंतरंगात हवेपणा आणि नकोपणाचे जे तरंग उमटतात त्यानुसार देहाला कृतीत तत्पर करणाही ही देहबुद्धी आहे. ‘मी’ आणि ‘माझे’च्या पायावर हे हवं-नकोपण आणि त्यायोगे देहबुद्धी टिकून आहे. पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांच्याद्वारे या देहबुद्धीच्याच जोरावर मी प्रपंचात रूतून आहे. ‘दासबोधा’त समर्थानी देहबुद्धीनं बद्ध असलेल्या जिवाची अनंत लक्षणं सांगितली आहेत. त्यातल्या दोन ओव्या या चर्चेच्या अनुषंगानं फार महत्त्वाच्या आहेत. त्या अशा : ‘‘वेर्थ जाऊं नेदी काळ। संसारचिंता सर्वकाळ। कथा वार्ता ते चि सकळ। या नाव बद्ध।। जागृति स्वप्न रात्रि दिवस। ऐसा लागला विषेयध्यास। नाहीं क्षणाचा अवकाश। या नाव बद्ध।।’’ (दशक ५, समास ७, ओव्या ४४ व ४८). हा बद्ध कसा असतो? तो काळ जराही व्यर्थ जाऊ देत नाही. सदासर्वकाळ तो प्रपंचाचीच काळजी करीत राहातो. त्याचं सर्व चिंतन, मनन, स्मरण प्रपंचाचंच असतं आणि म्हणून तो प्रपंचाच्याच गप्पांमध्ये अहोरात्र रममाण असतो. ‘मी’ आणि ‘माझे’च्या सुखाचा अर्थात विषयाचा त्याला जागेपणी, स्वप्नात, रात्री आणि दिवसाही ध्यास लागतो. त्यापासून क्षणभराचीही फुरसद त्याला मिळत नाही. आता लोक सत्पुरुषांना काय काय विचारतात! ‘‘महाराज झोपेतही नाम चालू राहील का?’’ जणू जागेपणातला एक क्षणही यांचा नामाशिवाय जात नाही! ‘‘महाराज तुमचं दर्शन स्वप्नात कधी होईल?’’ अरे! जर जगण्याचा प्रत्येक क्षण ‘मी’ आणि ‘माझे’पणाच्याच मिठीत जगत आहोत आणि ती मिठी सोडवतही नाही, तर ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या उक्तीप्रमाणे स्वप्नातही प्रपंचच येणार ना? पण ज्याला अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करायची आहे, त्याला या प्रपंचाच्या आसक्तीतून अर्थात देहबुद्धीच्या प्रभावातून सुटण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. कारण ही देहबुद्धी दृढ होत गेली तर परमार्थ साधणारच नाही. ‘मनोबोधा’च्या १९१व्या श्लोकातही समर्थ सावधगिरीचा इशारा देतात की, ‘‘देहेबुद्धीचा निश्चयो ज्या ढळेना। तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना।।’’ काय शब्द आहे पहा, देहबुद्धीचा निश्चय! जर मनात देहबुद्धीचाच निश्चय असेल तर मग ज्ञान कितीही ऐकलं, वाचलं, सांगितलं तरी ते कळणार नाही! जे कळतं ते आचरणात वळलंच पाहिजे ना? तेव्हा ही देहबुद्धी कमी करीत नेलीच पाहिजे आणि ती कमी करण्याचा अभ्यास म्हणजे हवेपणा आणि नकोपणाच्या प्रभावातून सुटण्याचा प्रयत्न करणे!

– चैतन्य प्रेम

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार