आपण जन्मापासून ज्या जगाला आपलं मानलं त्या जगाच्या प्रभावाचे सूक्ष्म संस्कार आपल्या चित्तावर आहेत. त्यामुळे अगदी जगापासून दूर जंगलात जरी गेलो आणि एकांतात राहू लागलो तरी मनातलं जग जसंच्या तसं सोबतीला येतं! या मनाला भूतकाळात जे घडून गेलं त्याच्या सुखद आणि दुखद स्मृतींचं आणि अज्ञात अशा भविष्यकाळात काय घडेल, याबाबतच्या चिंतेचं अस्तर कायमचं चिकटलं असतं. बरं ‘सुख’ आणि ‘दुखा’ची त्याची व्याख्याही देहबुद्धीनुसारच असते. या देहबुद्धीला म्हणजेच ‘मी’ला अनुकूल जे जे भासतं तेच सुखाचं वाटत असतं आणि जे जे माझ्या स्वार्थपूर्तीच्या आड येतं ते सारं दुखाचं वाटत असतं. त्यामुळे अगदी जंगलातल्या ‘एकांता’तही या जगाची पकड सुटत नाही. जोवर एका भ्रामक ‘मी’चा अंत होत नाही तोवर खरा शुद्ध एकांत कुठला? तेव्हा या भ्रामक ‘मी’च्या जोखडातून मुक्त करणारी मुक्ती हीच खरी आहे आणि ती जिवंतपणीच शक्य आहे, आवश्यक आहे, जीवन कृतार्थ करणारी आहे. ‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा,’ हा त्या मुक्तीचा अनुभव आहे. मग अशा मुक्तीच्या दिशेनं पाऊल टाकायचं असेल तर प्रथम काय केलं पाहिजे? तर.. ‘मना कोपआरोपणा ते नसावी!’ हे मना तू कोप धारण करू नकोस, असा या चरणाचा प्रचलित अर्थ आहे. पण, तू क्रोधाच्या आहारी जाऊन दुसऱ्या व्यक्तींवर, परिस्थितीवर किंवा दैवावर आणि देवावर आरोप करू नकोस, असा अधिक सूक्ष्म अर्थ आहे. आता क्रोध कधी उत्पन्न होतो? तर मनातल्या कामनांची पूर्ती झाली नाही तर! थोडक्यात ‘मी’पणातून ज्या ज्या कामना मनात उद्भवत असतात त्यांची पूर्तता झाली नाही तर किंवा त्यांच्या पूर्ततेत अडथळा आला तर क्रोध उत्पन्न होतो. आता कामना बरेचदा केवळ स्वसुखापुरत्याच असतात आणि त्यांची पूर्तता न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिली गोष्ट यातील बहुतांश कामना अवास्तव असू शकतात. माझ्या आसक्तीतून त्या उत्पन्न झालेल्या असतात. त्यामुळे त्या पूर्ण होत नाहीत. पण त्या पूर्ण न होऊ शकण्यामागे दुसऱ्या माणसाचा हात आहे, या भावनेनं माझ्यातला क्रोध उफाळून येऊ शकतो. काम म्हणजे कामना पूर्ण न झाल्यानं क्रोध उत्पन्न होतो. कामना पूर्ण झालीच तर जे प्राप्त झालं ते आणखी मिळावं, असा लोभ पक्का होत जातो. अधिकाधिक कामना पूर्ण व्हाव्यात असा मोह उत्पन्न होतो. जे आहे त्याचा मद असतोच, पण जे माझ्याकडे नाही आणि दुसऱ्याकडे आहे त्यानं मत्सर निर्माण होतो. या सर्व गोष्टी आध्यात्मिक मार्गावरून सोडाच, पण भौतिक जगण्यातही माझी घसरण करणाऱ्या आहेत. या कामनापूर्तीच्या भ्रामक ओढीनंच सर्व विकारांच्या मी सहज ताब्यात गेलो आहे. या परिस्थितीनं मी साधक म्हणून सोडाच, पण माणूस म्हणूनही अपात्र ठरत आहे. त्यामुळे या काम-क्रोधादिकांचा संग मी त्यागलाच पाहिजे, असं समर्थ सांगत आहेत. त्यांचं ओझं सोबत घेऊन मी मुक्तपणे जगूच शकणार नाही. पण माझ्या अंतरंगात उत्पन्न होणाऱ्या आणि क्रोधादी विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या या कामना अवास्तव आहेत, आसक्तीजन्य आहेत, पुन्हा जगातच गुरफटवून टाकणाऱ्या आहेत, हे मला कुठं उमगतं? ते उमगलं तरीही त्या कामना मनात येऊच न देणं, हे काय आपल्याच बळावर आपल्याला शक्य आहे का? तर अर्थातच नाही! त्यासाठीच समर्थ सांगत आहेत, ‘मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी!’ हे मना अनंत नश्वर कामनांच्या आहारी गेलेल्या माणसांच्या सहवासात राहूनही हे साधणार नाही. या कामनांचं अवास्तव आणि संकुचित रूप आकळणार नाही. कळलं तरी त्या कामनांच्या पकडीतून सुटणं साधणार नाही. त्यासाठी साधूंच्या सहवासातच जायला हवं. बुद्धीनं त्या साधुसंगातच वास करावा. ‘मनोबोधा’च्या पुढील श्लोकाची सुरुवातच या साधुसंगानं जे साधतं ते मांडणारी आहे.. ‘मना सर्वदा सज्जनाचेनि योगें, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैतन्य प्रेम

Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 21-06-2017 at 02:22 IST