समर्थ रामदास यांच्या मनोबोधाच्या २५व्या श्लोकाकडे आता आपण वळत आहोत. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू आणि मग त्याच्या मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:
मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा?।
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांहीं न राहे।। २५।।
प्रचलित अर्थ : हे मना! माझ्या बोलण्याचा कंटाळा मानू नकोस, उबग मानून रामनाम घेण्याचा आळस करशील, तर पुढे राम कसा बरे जोडेल? सुखात काळ चालला आहे यावर विश्वासून राहू नकोस. ही सुखसाधने व आयुष्य अखेपर्यंत टिकणारी नाहीत.
काही जणांना या श्लोकाचा तिसरा चरण ‘‘सुखाची घडी लोटतां दु:ख आहे। ’’ असा असला पाहिजे, असं वाटतं. मात्र ‘‘सुखाची घडी लोटतां सूख आहे।’’ असाच चरण बरोबर आहे आणि त्याचं कारण गूढार्थात उकलणार आहे.
तर गेल्या भागातील चिंतनाचं जे सूत्र होतं तेच पकडून पहिला चरण पुन्हा पाहू. आपण काय पाहिलं? की अंत:करणात जगाच्याच विचारांचं चिंतन सुरू असताना मुखानं जेव्हा नुसता नामोच्चार होत असतो तेव्हा ते नाम अंत:करणापासून होत नसतंच. आपल्याला नाम ‘करावं’ लागतं, आपल्याकडून नाम ‘होत’ नाही, यातच सर्व आलं! श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की, ‘‘नावडते काम जबरदस्तीने करावे लागते, आवडते काम सहज होते..’’ त्यामुळे नाम किंवा सद्गुरूप्रदत्त साधन सुरुवातीला आपल्याला जबरदस्तीनंच करावं लागतं, याचाच अर्थ ते मनापासून आवडत नसतं! ते करीत असतानाही कधी एकदा ठरलेली साधना संपते आणि जगाच्या कामांकडे पुन्हा वळतो, अशीही सुप्त तळमळ मनात हिंदकळत असते. त्यामुळे जे नाम संतांना अमृताहून गोड वाटतं, तेच नाम आपल्याला शाब्दिक वाटतं. तेच तेच शब्द आपण उच्चारत आहोत, असं वाटत असतं. श्रीगोंदवलेकर महाराजच म्हणतात की, ‘‘तुम्ही सर्वजण नाम घेता खरं, पण कसं? तर एखाद्या बाईनं कृत्रिम मूल घेऊन नाचावं तसं! संत सांगतात म्हणून आपण नाम घेतो इतकंच. पण आस्थेनं किती घेतो? एखादीला खूप दिवसांनंतर एकुलतं एक मूल झालं तर त्या मुलाच्या बाबतीत तिची जशी स्थिती होते तशी आपली नामाच्या बाबतीत होते का?’’ तेव्हा नाम हेच आपल्याला तारून नेणार आहे, नाम हाच एकमेव आधार आहे, हे सारं आपण ऐकतो, पण त्याच्यावर खरा विश्वास असतो का? तो असेल तर नामाशिवाय दुसऱ्या कशात मन गुंतेलच कसं? मनाचं जगातलं गुंतणं, जगातल्या घडामोडींनी कष्टी होणं जर कमी झालेलं नसेल तर मन नामात नव्हे, जगातच गुंतून आहे, जगालाच सत्यत्व देत आहे, हे उघड आहे. ही परिस्थिती पालटण्याचा आधारही नाम हाच आहे! आता नामात जर एवढं सामथ्र्य आहे, नाम जर अमृताहून गोड आहे तर त्याची ती गोडी आपल्याला कळत का नाही? याचं कारण जसं ताप आला की जिभेची चव जाते आणि मग पदार्थाची चव समजेनाशी होते, तसं भवरोगानं नामाची गोडीच आपल्याला उमगत नाही. यावरही औषध एकच.. नाम! नामरूपी औषध जितकं आणि जसजसं अंत:करणापर्यंत पोहोचेल तितकं ते आंतरिक पालट घडवू लागेल. मग तोवर ‘औषध’ असलेलं तेच नाम अमृताहून गोड लागू लागेल, असं संत सांगतात. म्हणून समर्थ सांगतात की, बाबा रे, नाम नुसतं मुखानं उच्चारायचा वीट मानू नकोस. कारण यातूनच राम जोडला जाणार आहे! हा वीट मानशील तर राम कसा जोडला जाईल? मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा?। रामाचं हे जे जोडणं आहे तेदेखील सामान्य नाही, बरं का!
-चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 29-06-2016 at 01:47 IST