या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिर्यारोहक एखादा दुर्गम कडा सर करतो तेव्हा त्या कडय़ावरून जग कसं दिसलं, याचं तो वर्णन करतो. त्या कडय़ावरचे अनुभव सांगतो. त्या मोहिमेच्या टप्प्यांवरचे अनुभव सांगतो. जे दिसत आहे त्याची छायाचित्रं एका मर्यादेपर्यंत काढता येतीलही, पण अनुभवाचं छायाचित्र नाही काढता येत! समजा मी एखाद्या दृश्यातलं मला जे भावत आहे त्याचं छायाचित्र काढलं, तरी ते पाहत असताना तुम्हालाही जे मला भावलं तेच भिडेल, याची खात्री नाही. त्यामुळे ऐकीव वा सांगीव ज्ञान हे अनुभवाची जागा नाही घेऊ  शकत.. आणि हेदेखील खरं की अनुभव येऊनही त्याचं यथायोग्य आकलन होतंच असं नाही! जावेद अख्म्तर एका भाषणात म्हणाले होते- काश्मीरची सफर करून आलेल्याला एकानं विचारलं की काश्मीरचं सौंदर्य कसं वाटलं? तर तो म्हणाला, ‘ती चिनाराची उंचच उंच झाडं आणि त्या हिमपर्वत रांगांमध्ये आल्यानं मी ते सौंदर्य नीटसं न्याहाळूच शकलो नाही!’ तसं व्हायचं.. तेव्हा अनुभवाचंही नीट आकलन होण्यासाठी अनुभवानं शहाणा झालेल्याचं मार्गदर्शन लागतं तसं अध्यात्माच्या मार्गावर खरे अनुभव कोणते आणि भ्रामक चकवे कोणते, याचं आकलन व्हायलाही सज्जनाची संगत लागते! एका ज्येष्ठ साधकाला एक जण म्हणाले, ‘अहो अमुक एकाला सतत अनाहद नाद ऐकू येतो. त्यांना तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे.’ त्यावर हे ज्येष्ठ साधक म्हणाले, ‘सतत अनाहद नाद ऐकू येत असूनही काही इच्छा उरत असेल, तर तो अनाहद नादच नव्हे!’ आणि खरंच हो, माझी कुंडलिनी जागृत झाली आहे, मला सतत अनाहद नाद ऐकू येतो, माझा अजपाजप सुरू असतो, मी अनेकदा कित्येक तास ध्यानातच असतो; अशा गोष्टी दुसऱ्याला सांगाव्याशा वाटत असतील, तर तोही भ्रमचकवा आहे, खरा अनुभव नव्हे! हे उमगायला आणि त्या भ्रमांपलीकडे जायलाही जाणत्याचा संगच लागतो. जर तुम्ही चिखलानं माखले आहात, तर जो स्वच्छ आहे तोच तुम्हाला स्वच्छ करू शकतो. जो तुमच्या भ्रममोहजन्य इच्छांच्या चिखलाचं कौतुक करीत तुमच्या इच्छा अर्थात चिखल वाढवतो त्याच्या सहवासात दुर्वृत्ती पालटणार नाही! उलट अधिक बळकट होईल. तेव्हा दुर्वृत्ती पालटून सद्वृत्ती अंगी बाणवायची तर संगतही खऱ्या सज्जनाचीच हवी. तोच त्यानं अध्यात्माच्या मार्गावरील वाटचालीत त्यानं जे अनुभवलं ते सांगतोही, पण तो माझाही अनुभव व्हावा यासाठीही साहाय्य करतो. हे साहाय्य समर्थाच्या शब्दांत सांगायचं म्हणजे,‘‘बळें भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे!’’ त्या संगतीनं शुद्ध भाव जागा होतो आणि बळावतो, सद्बुद्धी जागी होते आणि विकसित होऊ  लागते आणि खऱ्या सन्मार्गाला साधक लागतो! आता कुणी म्हणेल, अध्यात्माच्या मार्गावर काही पावलं चाललेल्या साधकालाच हे मार्गदर्शन सुरू आहे. मग अध्यात्माच्या मार्गापेक्षा सन्मार्ग काही वेगळा आहे का? तर मार्ग तोच आहे, पण चालण्याचा हेतू एका सत्याशीच एकनिष्ठ राहिला तरच तो सन्मार्ग ठरतो. पण जपजाप्य, ध्यानधारणा, तपश्चर्या, योग या मार्गानं वाटचाल करायची आणि लोकेषणा, वित्तेषणेत अडकायचं.. म्हणजे लोकप्रियता, प्रसिद्धी, मानसन्मान यात अडकायचं.. पैशाचा मोह आणि कामनापूर्तीच्या मोहात अडकायचं.. हेच घडणार असेल आणि पुढे तर आध्यात्मिक मार्गाचाही वापर याच हेतूसाठी करायचा असेल, तर तो मार्ग सन्मार्ग नव्हे! ज्या रस्त्यानं सैन्याची वाहतूक होत असेल त्याच रस्त्यानं शत्रूसैन्य घुसण्याची शक्यता निर्माण झाली तर ते रस्ते उद्ध्वस्त केले जातात, त्याप्रमाणे ज्या मार्गानं भावशुद्धी घडली पाहिजे त्याच मार्गानं विकारवृद्धी होणार असेल तर त्या सन्मार्गाचा आपणच कुमार्ग केला आहे हे ओळखावं आणि तो कुमार्ग मोडूनतोडून टाकावा. अर्थात यासाठीही सज्जनाची संगतच लागते!

Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 24-10-2017 at 01:44 IST