सुखाची घडी लोटता सूख आहे! आणि या चरणातला दुसरा सुख शब्द ‘सूख’ असा दीर्घ आहे पाहा! आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण फार थोडे आणि दु:खाचे अनंत असतात. पण तरी त्या भौतिक, दैहिक सुखाचाही प्रभाव किती मोठा असतो पाहा की, अनंत दु:खं भोगत असतानाही जीव त्या सुखाच्या आशेनंच जगत असतो! पण देह हाच मुळी अशाश्वत असल्यानं त्या देहाच्या आधारावर प्राप्त केलं जाणारं भौतिकही अशाश्वतच असतं. त्यातही सुखाच्या कल्पनेप्रमाणे सुख मिळालं नाही, तरीही दु:खच वाटतं ना? मुलगा झाला की सुख मिळेल, ही कल्पना आहे. तोच मुलगा मोठेपणी आपल्या मनाविरुद्ध वागू लागला की मुलगा झालाच नसता तर बरं झालं असतं, असंही वाटू शकतं ना? अमुक नोकरी मिळाली, अमुक पदोन्नती मिळाली तर सुखी होईन, ही कल्पना. प्रत्यक्षात त्यातून जाच होऊ लागला तर ‘वरच्या पदावरचा साहेब बदलला तर मी सुखी होईन’, अशी सुखाची नवी कल्पना उदय पावते! मग बदललेला साहेबही छळू लागला तर? एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘‘आपल्याच जातीचा अधिकारी वरच्या पदावर आला तर बरं होईल, असं मला एकदा वाटलं. देवाची कृपा म्हणजे दुसऱ्याच दिवशी बदल्या झाल्या आणि माझ्याच जातीचा साहेब मला मिळाला. पण त्याच अधिकाऱ्यानं वर्षभर मला इतका त्रास दिला की सांगता सोय नाही!’’ तेव्हा आपली गत कशी असते? ‘करुणाष्टका’त समर्थानी म्हटलं आहे ना? ‘‘सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकून आले!’’  सुख-सुख म्हणून उराशी कवटाळावं तर त्याचं दु:खात कधी रूपांतर होतं, ते कळतही नाही. सुखाचा मार्ग सापडल्याच्या कल्पनेनं निश्चिंत व्हावं, तर अचानक दु:खाचा घाट कधी लागतो ते समजतही नाही. सद्गुरूंच्या स्मरणात जेव्हा जगणं सुरू होतं, त्यांच्या बोधानुरूप जगायचा अभ्यास जेव्हा सुरू होतो, तेव्हाच जगाचं, जगण्याचं खरं स्वरूप उकलत जातं.  जोवर आपण आपल्या देहबुद्धीजन्य विचारांनुसार, कल्पनेनुसार, इच्छांनुसार जगत असतो तोवर जगाचं खरं रूप मनाला उमगणं हे अशक्यच आहे.  अनेकवार थपडा खाऊनही आपण मनाच्या ओढीनं जगाकडेच नवनव्या आशेनं घरंगळत राहातो आणि निराशेच्या गर्तेत पडत राहातो. श्रीसद्गुरूंनी एका गुरूबंधूला एकदा एका ओळीचं पत्र लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं की, ‘‘पिंजरे में बंद पंछी उडम्ने की कितनी भी कल्पना करे, व्यर्थ है!’’ आपणही कल्पनेच्याच पिंजऱ्यात अडकून बंदिस्त होऊन उत्तुंग भराऱ्या मारण्याची स्वप्न पहात असतो. कल्पनेचा तो पिंजरा न सोडताच आपल्याला भराऱ्या मारायच्या असतात. त्या पिंजऱ्याचं दार उघडलं गेलं तरी तो सोडवत नाही! मग उत्तुंग भरारी कशी शक्य आहे? तेव्हा हा कल्पनेचा पिंजरा तुटला पाहिजे आणि तो आपल्या विचारांनुरूप होणाऱ्या  प्रयत्नांनी तुटणार नाही. सद्गुरूंशी अखंड आंतरिक ऐक्य साधलं आणि स्थिर झालं तरच ते शक्य आहे. सद्गुरूंशी आंतरिक ऐक्य म्हणजे नुसतं त्यांच्या देहरूपाच्या स्मरणानं डोळे भरून येणं नव्हे! त्यांचा विचार तोच माझा विचार होणं, त्यांची इच्छा तीच माझी इच्छा होणं, त्यांची आवड तीच माझी आवड होणं; हे आंतरिक ऐक्य आहे.. ही आंतरिक अभिन्नता आहे!  जेव्हा ती साधेल तेव्हाच त्यांच्या विचारांनुरूप, त्यांच्या इच्छेनुरूप, त्यांच्या आवडीनुरूप माझं जगणं सुरू होईल. नि:शंक, निर्भय, निरासक्त, निराभिमानी, निरहंकारी आणि निरागस वृत्तीनं जगणं सुरू होईल आणि मग सुखाची घडी लोटल्यावरही ‘सूख’ अर्थात दीर्घ, अखंड सुखच सुख लाभेल! आणि मग एक फार मोठा अनुभव अशा साधकाला पदोपदी येत राहील.. या अनुभवाचंच सूचन मनोबोधाच्या २५व्या श्लोकाच्या अखेरच्या चरणात आहे.. पुढे सर्व जाईल काही न राहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 – चैतन्य प्रेम

Web Title: Samarth ramdas philosophy
First published on: 04-07-2016 at 02:55 IST