काही माणसांना मानमरातब, प्रसिद्धी, कौतुकसोहळे यांच्याशी काडीमात्र देणंघेणं नसतं. असिधाराव्रतासारखं ते आपलं काम करत असतात. मराठीतील ज्येष्ठ लेखक जया दडकर हे अशा कलंदर वल्लींपैकीच एक नाव.
‘एक लेखक आणि एक खेडे’, ‘चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात’, ‘वि. स. खांडेकर सचित्र चरित्रपट’ ही महत्त्वपूर्ण पुस्तकं आणि ‘प्रकाशक रा. ज. देशमुख’, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’ (खंड १, सहसंपादक), ‘श्री. दा. पानवलकर’, ‘निवडक पत्रे – नरहर कुरुंदकर’ ही संपादनं दडकर यांच्या वेगळेपणाची, व्यासंगाची आणि परिश्रमाची उत्तम म्हणावीत अशी उदाहरणं आहेत. अस्सल मुंबईकराची जिद्द आणि संशोधकीय बाणा दडकर यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला आहे. रूढ चरित्रलेखन वा ललितरम्यतेऐवजी वेगळ्या तऱ्हेने माणसाचा तळठाव शोधत, त्याचा गाभा आणि आवाका उलगडण्याची दडकर यांची हातोटी विलक्षण आहे. खांडेकरांचा चरित्रपट काय किंवा खानोलकरांचा शोध, यातून दडकर यांची कसोशी आणि असोशी दृग्गोचर होते. श्री. पु. भागवतांचा सहवास आणि लघुनियतकालिकांची सोबत या दोन्ही गोष्टींचे धनी होण्याची संधी दडकर यांना मिळाली. म्हणूनच ‘ललित’ या ग्रंथप्रसारासाठी वाहिलेल्या मासिकाचा सुवर्णमहोत्सव आणि केशवराव कोठावळे पारितोषिकाचं तिसावं वर्ष यांचं औचित्य साधून या वर्षी दिलं जाणारं केशवराव कोठावळे पारितोषिक दडकर यांच्या ‘दादासाहेब फाळके- काळ आणि कर्तृत्व’ या ग्रंथाला मिळावं, ही जणू औचित्याची परमावधीच. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची मराठीमध्ये तत्पूर्वी तीन चरित्रं लिहिली गेली होती. पण त्यातून फाळके यांना न्याय मिळत नाही, हे लक्षात आल्यावर दडकर यांनी फाळके नावाच्या महत्त्वाकांक्षी, प्रचंड हुन्नर असलेल्या जिगरी माणसाचं कालातीत कर्तृत्व त्यांना साजेलशा विस्तृत कॅनव्हासवर मांडण्याचा प्रयत्न केला. दडकर यांनी ज्या जागतिक परिप्रेक्ष्यात फाळके यांचं कर्तृत्व पाहिलं, त्यातून फाळके यांची भव्यता नेमकेपणाने अधोरेखित होते. फाळके भारतीय चित्रपटाचा श्रीगणेशा करत असताना जागतिक चित्रपटसृष्टीची वाटचाल कशा पद्धतीने होत होती याचा त्यांनी घेतलेला सविस्तर आढावा स्तिमित करतो. मराठीमध्ये अशा प्रकारच्या चरित्रलेखनाची पद्धत फारशी रूढ नाही, त्यामुळे २०११ साली प्रकाशित झालेल्या या चरित्राकडे कसं पाहावं, ते कसं वाचावं हे मराठी समीक्षक-वाचकांना ठरवता आलं नाही. त्यामुळे या चरित्राची व्हावी तशी चर्चा झाली नाही. ‘देखल्या देवा दंडवत’ या न्यायाने का असेना, आता तरी वाचक या चरित्राकडे वळतील अशी आशा करू या.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2014 रोजी प्रकाशित
जया दडकर
काही माणसांना मानमरातब, प्रसिद्धी, कौतुकसोहळे यांच्याशी काडीमात्र देणंघेणं नसतं. असिधाराव्रतासारखं ते आपलं काम करत असतात. मराठीतील ज्येष्ठ लेखक जया दडकर हे अशा कलंदर वल्लींपैकीच एक नाव.
First published on: 26-04-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi writer jaya dadkar