‘जेव्हा मी गणितात गढून जातो तेव्हा खरे तर ती मलाच विश्रांती असते. गणितात वेळ वाया घालवतो आहे असे मला अजिबात वाटत नाही व त्यातच आणखी काम करायचे आहे..’ यंदाचा गणितातील प्रतिष्ठेचा रामानुजन पुरस्कार मिळालेले टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील गणितज्ञ अमलेंदू कृष्णा यांचं हे सांगणं म्हणजे गणितात ते किती समर्पणाने चांगले काम करीत आहेत याचेच उदाहरण आहे. त्यांनी बीजगणितात ‘के ’सिद्धान्त शोधून काढला. त्याचे थेट उपयोग आताच दिसणार नाहीत; भविष्यात काही भौतिकशास्त्रीय सूत्रे सिद्ध करताना ते उपयोगी पडणार आहे, त्यामुळे संगणक व इंटरनेट वेगवान होणार आहे. जीवशास्त्रातही माहितीचे अचूकविश्लेषण करण्यासाठी त्यांच्या सिद्धान्ताचा उपयोग होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णा यांचा जन्म पाटणा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्या काळात शिक्षणाचा इतका गाजावाजा व बजबजपुरी माजलेली नव्हती. त्यामुळे कशात करिअर करायचे याबाबत त्यांना कुणी मार्गदर्शन करायला नव्हते. कदाचित तेच बरे झाले, नाही तर ते चुकीच्या दिशेनेही जाऊ शकले असते; कारण शेवटी आपला आतला आवाज जे सांगतो व जे क्षेत्र मनापासून आवडते तेच क्षेत्र माणसाने निवडावे असे म्हणतात. संशोधन हा काही त्यांचा पहिला पर्याय नव्हता. ते आयआयटी कानपूरमधून भ्रमनिरास होऊन बाहेर पडले, कारण तिथले शिक्षण नोकरी-व्यवसायास सक्षम बनवणारे होते. तिथला सगळा भर अभियांत्रिकीवर होता. त्यांचा हेतू केवळ नोकरी करण्याचा नव्हता, नंतर त्यांना सनदी अधिकारी व्हावेसे वाटले, पण तिथे फार भ्रष्टाचार असतो हे कळल्यानंतर त्यांनी तो बेतही बदलला. नंतर ते कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेत दाखल झाले व तेथे त्यांना गणिताची गोडी लागली. २००१ मध्ये त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून विद्यावाचस्पती ही पदवी घेतली. काही काळ ते अमेरिकेत कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधक म्हणून काम करत होते, पण नंतर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत परत आले. सध्या ते मुंबईत या संस्थेत काम करीत आहेत.
अमलेंदू यांच्या मते विज्ञानाचे अधिष्ठान गणित हे आहे. त्यांच्या मते गणितासारखे आव्हानात्मक काही नाही. गणित मला बांधून ठेवते. कोलकात्यात असतानापासून गणितातील संशोधनाच्या कष्टाची तयारी मी केलेली होती. गणितातील अनेक कूटप्रश्न इतके अवघड आहेत की, मी ते सोडवायचा प्रयत्न करतो, पण जमता जमत नाही; शेवटी गणितच मला जमिनीवर पाय ठेवून काम करायला शिकवते.. असे ते नम्रपणे सांगतात.

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matametician amlendu krushna
First published on: 06-08-2015 at 01:07 IST