टूर-डी-फ्रान्स शर्यतीस आंतरराष्ट्रीय सायकलिंग क्षेत्रात जसे महत्त्व आहे, तद्वत भारतात मुंबई-पुणे सायकल शर्यतीस प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या शर्यतीच्या मार्गात असलेला बोरघाट हाच स्पर्धकांसाठी आव्हानात्मक असतो. परदेशी बनावटीच्या सायकलिंगचा वापर सुरू झाल्यानंतर या शर्यतीत महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंनीही चांगली चमक दाखविण्यास सुरुवात केली. विशेषत: रेल्वे व सेनादलाच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या खेळाडूंपुढे आव्हान उभे केले. नुकत्याच झालेल्या या शर्यतीत मुंबईच्या ओंकार जाधव याने या खेळाडूंना मागे टाकत ही शर्यत जिंकण्याचे स्वप्न साकार केले. गत वेळी या शर्यतीत त्याला तिसरे स्थान मिळाले होते. त्या वेळी त्याचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. या वेळी मात्र अतिशय निर्धाराने व नियोजनपूर्वक सायकलिंग करीत अजिंक्यपद मिळविले. शर्यतीच्या सुरुवातीचे टप्प्यात विशेषत: घाटातील टप्प्यात त्याने जास्त वेग घेण्याऐवजी तेथे आवश्यक असणारी ऊर्जा घाटानंतरचे अंतिम टप्प्याकरिता राखीव ठेवली. याचा फायदा त्याला शेवटच्या क्षणी झाला. वरळीत राहणारा २३ वर्षीय ओंकार मेहनती आहे. सरावाकरिता त्याने मुंबईऐवजी नवी मुंबईत खारघर येथेच राहणे पसंत केले आहे. गेली दोन वर्षे त्याला जर्मन प्रशिक्षक मासूद यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रोडरेसिंग या क्रीडाप्रकारात त्याने चार वेळा राज्य स्पर्धेतही विजेता होण्याचा मान मिळविला आहे. त्याने पाचसहा वेळा राष्ट्रीय अिजक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचेही प्रतिनिधित्व केले आहे. मात्र पदकापासून त्याला हुलकावणी मिळाली आहे. फोकस या जर्मन सायकलवर तो सराव करीत असून; मुंबई-पुणे शर्यतीकरिता गेले महिनाभर आठवडय़ातून पाच दिवस सरासरी सव्वाशे किलोमीटर सायकलिंग तसेच उर्वरित दिवशी रोलिंगचा सराव अशी त्याने तयारी केली होती. रेड अँड व्हाइट सायकलिंग क्लबचा तो खेळाडू असून त्याला जितेंद्र अडसुळे यांचेही मार्गदर्शन मिळत आहे. त्याचे वडील पोलिस खात्यात होते. नऊ वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर आई रेश्मा यांनी ओंकारला सायकलिंगच्या कारकीर्दीसाठी सतत प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ दिले आहे. ओंकारचे ध्येय आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
ओंकार जाधव
टूर-डी-फ्रान्स शर्यतीस आंतरराष्ट्रीय सायकलिंग क्षेत्रात जसे महत्त्व आहे, तद्वत भारतात मुंबई-पुणे सायकल शर्यतीस प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या शर्यतीच्या मार्गात असलेला बोरघाट हाच स्पर्धकांसाठी आव्हानात्मक असतो.
First published on: 15-01-2013 at 11:44 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onkar jadhav