शाळेतच कृषी-शिक्षणाची रुजवण

महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विद्यापीठांनी कृषी शिक्षणाच्या सुविधा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत.

डॉ. विश्वजीत कदम : राज्यमंत्री-  सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा – महाराष्ट्र
कृषी विद्यापीठांकडे अवघ्या ०.१३ टक्के विद्यार्थ्यांचा कल आणि दुसरीकडे, कृषी-आधारित उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा! ही स्थिती तर शालेय शिक्षणात कृषी विषयाच्या समावेशाने दूर होऊ शकतेच; पण कृषी-स्वयंरोजगारांना चालना, ग्रामीण-शहरी दरीत घट असे सुपरिणामही दिसू शकतील..

महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विद्यापीठांनी कृषी शिक्षणाच्या सुविधा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण तरुणांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल याची मला खात्री आहे. याचा पुढला टप्पा म्हणून, शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळावे यासाठी गेल्या महिन्यात, २५ ऑगस्ट रोजी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षांताई गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे तसेच कृषी राज्यमंत्री म्हणून मीही उपस्थित होतो. या बैठकीत कृषी हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रासारख्या कृषी तसेच कृषीपूरक व्यवसाय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या राज्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हे सरकार लोकहिताच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी येणाऱ्या काळात निश्चितच स्वरूपात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.

शालेय व माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषय अनिवार्य करण्यात यावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे हेही अत्यंत महत्त्वाचे होते. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल; शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल. शेती क्षेत्राला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक आहे. यासाठी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्यावर अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारत हा कृषिप्रधान देश असूनदेखील शालेय व माध्यमिक शिक्षणामध्ये कृषी विषय नाही याची खंत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१७ च्या अहवालात व्यक्त केली होती. या अहवालानुसार, अन्य विद्याशाखांच्या तुलनेत कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ०.१३ टक्के आहे. राज्यात सूक्ष्म सिंचन, कीटकनाशके, खते-बियाणे, पीक पोषण, सेंद्रिय जैविक उत्पादने या क्षेत्रांतील विविध कंपन्या व उद्योगांत मनुष्यबळाची गरज आहे. मात्र या संस्थांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण महत्त्वाचे

शिक्षकांना कृषी विषयांसंदर्भात प्रशिक्षण देणे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. शिक्षकांची मानसिकता यासाठी बदलण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांची सकारात्मक मानसिकता घडवण्याचा अधिक प्रभावी प्रयत्न सरकारने करणे महत्त्वाचे आहेच, पण याविषयीची एक चळवळ हाती घ्यावी लागणार आहे. शिक्षण प्रक्रियेत प्रत्येक गोष्टींचा आत्मा शिक्षक हाच असतो. त्यामुळे शिक्षकांना जर कार्यरत केले तर माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी विषयांची किमान ओळख होण्यासाठी निश्चितच मदत होईल. आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती होईल, गळती कमी होईल आणि एक सक्षम पिढी तयार करणे आपल्याला शक्य होईल.

सध्याची जागतिक स्पर्धा व माहिती युगामध्ये आजही ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे दहावी नंतरचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षणात शेती विषयाचे ज्ञान मिळाल्यास शेती व शेतीशी संलग्न व्यवसाय अधिक कुशलतेने करून त्याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते. दहावीनंतरचे शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रामध्ये कुशलतेने काम करणे तसेच ग्रामीण भागात राहून उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती, मत्स्यशेती, आळिंबी संवर्धन, मधुमक्षिका पालन, व्यापारी तत्त्वावरील फळबाग व भाजीपाला यासारख्या शेतीसंबंधित स्वयंरोजगार करणे शक्य होईल.

आज शहरी भागातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाशी क्वचितच संबंध राहिलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कृषी विषयाचे ज्ञान मिळाल्याने त्यांच्या मनावर शेती विषयाचे महत्त्व ठसविले जाऊन शेती विषयाची जाण असणारी उद्याची उज्ज्वल व जागरूक पिढी निर्माण होऊन ग्रामीण समाजाशी त्यांची नाळ जोडली जाईल. पर्यायाने यातूनच राष्ट्रप्रेम निर्माण होऊन शेती व शेतीवर आधारित व्यवसाय अथवा उद्योगधंदे अधिक कुशलतेने केले जातील.

कृषी व संलग्न विषयातील अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित करणे तसेच या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा निश्चित करण्यासाठी आधी कृतिगट नेमला गेला. कृषी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीने मुख्यत्वे दोन बाबी ठरविण्यात आल्या :

(अ) इयत्ता १ ली ते ७ वी च्या एकात्मिक अभ्यासक्रमाचा अभ्यास करून त्यामध्ये विषयानुरूप नवीन घटकांचा समावेश करणे.

(ब) इयत्ता ८ वी ते १० वी साठी कृषी शास्त्र हा स्वतंत्र विषय करून कृती गटाच्या विषयतज्ज्ञांकडून यासाठीचा अभ्यासक्रम तयार करणे.

या अभ्यासक्रमाचा तपशील ठरविण्यासाठी कृषी महाविद्यालयातील ११ विषयांच्या प्राध्यापकांची कार्यकारी समिती गठित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. अभ्यासक्रमाची रूपरेषा कशी असावी, याविषयी काहीएक स्पष्टता सध्या आहे. त्यासाठी इयत्ता पहिली ते १० वी पर्यंतचे इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास, माणसाची गोष्ट, कार्यानुभव या विषयांची पुस्तके तसेच कृषी पदविका अभ्यासक्रमांच्या विषयांचा संदर्भ घेण्यात आला. अभ्यासक्रम तयार करताना वेगवेगळ्या कृषी विषयांमधील अभ्यासक्रमात सुसूत्रता ठेवण्यासाठी विषयांचा क्रम- मृदशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कृषी विद्या, उद्यानविद्या, अभियांत्रिकी, हवामान, कीटकशास्त्र, रोगशास्त्र, पशुसंवर्धन, कृषी विस्तार व अर्थशास्त्र असा ठेवण्यात आला. तसेच इयत्ता पहिली व दुसरीकरिता कृषी विषय चित्ररूपाने देण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात सध्या जो कृषीविषयक अभ्यासक्रम आहे त्याच्याच अनुषंगाने आणखी सविस्तर अभ्यासक्रम अधिक मार्मिकतेने समाविष्ट केलेला आहे. याचबरोबर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विषयानुरूप अभ्यासक्रम तयार करण्यात आला. इयत्ता आठवीकरिता नैसर्गिक साधनसंपत्ती, मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र, पाणी व्यवस्थापन व आधुनिक सिंचन पद्धती, हवामान व वनस्पतीशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आला. इयत्ता नववीकरिता पिकांचे महत्त्व, पीक संवर्धन, पीक लागवड तंत्रज्ञान, पाणी तसेच खत व्यवस्थापन, उद्यानविद्या, औषधी व सुगंधी वनस्पती, पीक पद्धती, यंत्रे अवजारे, सर्वेक्षण, रोपे पैदास, राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था या घटकांचा समावेश केला आहे तसेच पिकांची लागवड ते काढणीनंतरचे तंत्रज्ञानपर्यंतच्या सुधारित शिफारसीचा तसेच कीड व रोग यांचे प्रकार, नियंत्रण पद्धती, साधने यांचा समावेश करण्यात आला आहे.

इयत्ता दहावीकरिता शेतीआधारित उद्योगधंदे व्यवस्थापन अभ्यासक्रम घेण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने पशुसंवर्धन व दुग्धव्यावसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, रोपवाटिका व बागकाम व्यवस्थापन, हरितगृह तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला प्रक्रिया, बीजोत्पादन तंत्रज्ञान, जैविक कीडनाशके व मित्रकिडींचे उत्पादन, रेशीम कीटक उत्पादन, मधमाशीपालन, गांडूळ खत उत्पादन, मत्स्यशेती, जैविक खते, शेतमाल हिशेब व विक्री कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, शासनाच्या योजनांची माहिती, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचे व त्यांचे विस्तारकार्य या विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे.

कृषी अभ्यासक्रमाचा उद्देश लक्षात घेऊन इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करावयाच्या विषयघटकांची रचना अशा प्रकारे केली आहे की, ज्यामुळे विषय समजण्यास सोपा, सुलभ व एकसंध होईल तसेच हा विषय समजण्यास योग्य होऊन विद्यार्थ्यांमध्ये त्याविषयीचा पुढील अभ्यास करण्याची उत्कंठा निर्माण होईल. शिवाय विद्यार्थ्यांना जीवनाशी निगडित व्यवसायोपयोगी ज्ञान मिळाल्याचाही आनंद मिळेल.

कृषी-ज्ञानातून अनेक उच्चशिक्षित लोक आपले भविष्य उज्ज्वल करत आहेत. इस्रायल तंत्रज्ञाने वाळवंटामध्ये शेतीमाल पिकून त्याचा जगभरात पुरवठा होतो हे आपल्याला माहीत आहे. शालेय विद्यार्थ्यांना भविष्यकाळात सुजलाम्-सुफलाम् अशा महाराष्ट्रासाठी शेती उत्पादन व संशोधनात इस्रायलपेक्षा कणभर अधिक प्रगती करता येईल, अशी आशा मी बाळगतो.

 

‘समोरच्या बाकावरून’ हे सदर या आठवडय़ापुरते गुरुवारी प्रकाशित होईल

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Introduction of agricultural education in schools akp

ताज्या बातम्या