मुंबईतील प्रो. बी. आर. देवधर यांचे ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ हे संगीताचे शिक्षण देणारे नुसते विद्यालय नव्हते. संगीताचे ते एक मुक्त विद्यापीठ होते. अभिजात संगीतातील घराणेदार गायकी समजावून घेण्यासाठी सगळ्या घराण्यांच्या कलावंतांना तेथे गाण्याची मुक्तता असे. त्या संस्थेत शिकणाऱ्या सगळ्या चुणूकदार विद्यार्थ्यांना ही वेगवेगळ्या कलावंतांची गाणी म्हणजे केवळ पर्वणीच नसे, तर तो त्यांच्या अभ्यासाचाच भाग असे. पंढरीनाथ कोल्हापुरे यांना या संस्थेत जायला मिळणे, ही त्यांच्यासाठी तर भाग्याची गोष्ट होतीच, परंतु तेथे त्यांना मिळालेल्या एका सुहृद सख्याने त्यांचे जगणे अधिक स्वरमय होऊन गेले. कुमार गंधर्व नावाचे वादळ तेव्हा या देवधर मास्तरांच्या शाळेत आपल्या भविष्याची चुणूक दाखवत होते आणि पंढरीनाथ, बाबुराव रेळे यांच्यासारखे संगीतमय झालेले अनेक जण कुमार गंधर्व नावाचे वादळ प्रत्यक्ष अनुभवत होते. कोल्हापुरे यांनी नंतर कुमारांनाच आपले संगीतगुरू केले आणि आयुष्यभर त्यांचे शिष्यत्व पत्करले. कुमारजींनी देवासला प्रस्थान ठेवल्यानंतरही पंढरीनाथ त्यांचे एकलव्य शिष्य राहिले. अत्यंत ओढगस्तीतून संगीतसाधना करणारे कोल्हापुरे यांनी तशाही स्थितीत संगीताला अंतर दिले नाही. त्यांचे वडील संपन्न अशा बलवंत संगीत मंडळीतील भागीदारी अध्र्यावर सोडून बीनकार मुराद खाँ यांचे शागीर्द बनले. त्याचप्रमाणे पंढरीनाथांनीही ‘गुजराथी सनरिच सिनेमा कंपनी’तील १९४७च्या काळातील दोनशे रुपयांची नोकरी कुमार गंधर्वाचे शिष्यत्व मिळविण्याकरिता सोडली. त्याच काळात मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाटय़निकेतन’कडूनही त्यांना बोलावणे आले होते. पण कुमारांसाठी या सगळ्या संधींवर पाणी सोडून कोल्हापुरे यांनी आपले आयुष्य ‘कुमार संगीता’ला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. १०-१५ रुपयांच्या शिकवण्या करत संसाराचा गाडा हाकताना रीवा संस्थानच्या राणीची शिकवणी त्यांना मिळाली. स्वत: मैफली गवई म्हणून क्षमता असल्याने कोल्हापुरे यांनी आपले स्थान पक्के केलेच होते. नंतर त्यांनी संगीताचे अध्यापन करण्याचे ठरवल्याने ते याच क्षेत्रात गुरू होऊन राहिले. ‘गानयोगी शिवपुत्र’ हे त्यांनी लिहिलेले कुमार गंधर्वाच्या आठवणींचे पुस्तक वाचकप्रिय झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हिचे वडील म्हणून पंढरीनाथांना आणखी एक ओळखही मिळाली, पण संगीत हाच त्यांचा प्राणवायू राहिला. मा. दीनानाथ यांच्या नावाचा पुरस्कार पंढरीनाथ यांना मिळणे हा एका अर्थाने काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे. दीनानाथ यांच्या संगीत नाटक कंपनीत भागीदार म्हणून काम करणाऱ्या वडिलांच्या संगीतप्रेमाचे पांग या पुरस्काराने अंशत: तरी फिटले आहेत, अशीच पंढरीनाथ कोल्हापुरे यांची भावना असणार!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharinath kolhapure
First published on: 15-04-2014 at 12:46 IST