जाणता राजा कधीच अजाणतेपणे बोलत नाही. खरं तर निवडणुका आल्या की ‘तळ्यात की मळ्यात’ हा पवार साहेबांचा आवडता खेळ. पण आता काँग्रेसच्या तळ्यात पाणी नाही, तर भाजपच्या मळ्यात ऊस नाही. भूमिका तरी कुठली घेणार? हल्ली पूर्वीसारखी (तिसऱ्या) आघाडीकडून (खासगी) चच्रेची आमंत्रणे पण येत नाहीत. मग ‘निदान व्होट बँक तरी वाढवूया’ एवढाच हेतू त्यामागे असावा. तुम्हाला ‘पटेल’ तर आम्हालाही वेगळा विदर्भ मान्य हा खेळ खेळून झाला. आता राष्ट्रीय पातळीवरील व्होट बँकसाठी स्वत: राजेच मदानात उतरले.
हिंजवडीतील पवारसाहेबांचे भाषण म्हणजे आशयगर्भ चिंतनच! ‘मुसलमान शुक्रवारी मशिदीत स्फोट करणार नाहीत’ हे वाक्य तर अर्थहीनच. मग काय इतरवारी इतर ठिकाणी झालेल्या सगळ्याच स्फोटांचे बिल त्यांच्या नावावर फाडायचे का? आणि पाकिस्तानात तर रोजच, शुक्रवारीसुद्धा स्फोट होतात आणि त्यासाठी अजून तरी इतर धर्माना दोषी धरलेले नाही. अनुनय करतानादेखील आत्मभान सोडू नये. हे भाषण कार्यकर्त्यांसमोर होते, पण उद्देशून होते आर. आर. आणि त्यांच्या पूर्वसुरींना. कारण मालेगाव स्फोटात जे १९ मुसलमान संशयित म्हणून पकडले ते गृह खात्याच्याच पोलीस दलाने; नंतर पुरावा मिळत नाही म्हणून ३ वर्षांनी सुटले ते पण त्याच खात्यामुळे! यात सामान्यांचा आणि देशाचा संबंध येतोच कुठे?
सामान्य िहदू आणि मुसलमान गुण्यागोविंदानेच नांदताहेत, पण पवारसाहेब, प्रोफेशनल राजकारणी आणि धर्मकारणी (दोन्ही धर्मातले) यांना हे बघवत नाही. कारण असे झाले तर त्यांची रोजीरोटीच काय, पण पुढच्या पिढय़ांसाठी करावयाची बेगमीच संपुष्टात येईल. त्या १९ जणांवर जो अन्याय झाला त्याबद्दल नक्राश्रू ढाळण्यापेक्षा जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाहीत? अजून वेळ गेलेली नाही. मग ‘त्यांच्या’ नजरेतला देशदेखील स्वच्छ होईल. आहे का हे धारिष्टय़ तुमच्या गृहमंत्र्यात? पवारसाहेब, तुम्हीपण या किडलेल्या सिस्टीमचे एक भाग आहात हे प्रथम मान्य करा आणि घरापासून सुरुवात करा. गृहमंत्री बदला. कार्यक्षम गृहमंत्री आणा, मग भले तो तुमचा नावडता का असेना! एवढे जरी केलेत तरी तुम्हाला खरी उपरती झाली असे मानता येईल, अन्यथा आले वारे, गेले वारे..
तुमच्या व्यासपीठापासून काही किलोमीटर असलेल्या मावळ खोऱ्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या निर्थक गोळीबाराची आणि नाहक प्राण गमावलेल्यांची भाषणात आठवण काढली असतीत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सूड कोणावर उगवायचा, पोलिसांवर की गृहमंत्र्यावर की पालकमंत्र्यावर, याचेही जाता-जाता मार्गदर्शन केले असतेत तर आपल्या जाणतेपणात भरच पडली असती.
सुहास शिवलकर, पुणे

शरद पवारांना भलताच लळा
मालेगावच्या मशिदीतील बॉम्बस्फोटामागे िहदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाले, पण त्या प्रकरणी मुस्लीम समाजाची १९ मुले ३ वष्रे तुरुंगात पडली होती, त्यांच्या आयुष्याचे काय? काय म्हणून त्यांनी बघायचे या देशाकडे?. आपल्या कुटुंबातील मुला-मुलींवर अत्याचार झाल्याचा राग मुस्लीम तरुणांच्या डोक्यात शिरला, तर त्याला दोष देता येणार नाही, या केंद्रीयमंत्री शरद पवारांच्या बेताल विधानात काहीच अर्थ नाही. त्यांच्या डोक्यात राग जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? जगात नाहीत इतक्या सुविधांची खैरात त्यांच्यावर वर्षांचे बाराही महिने भारतात होतच असते. तरीही ते जर चुकीचे कृत्य करत असतील त्यात या देशाचा काय दोष? राहिला या देशाकडे बघण्याचा प्रश्न. गेल्या ११ ऑगस्ट रोजी डोक्यात राग शिरलेल्यांनी जवानांच्या स्मृती स्तंभास लाथाडले. त्यावरून देशाला कळले कोणाला देशाप्रती किती प्रेम आहे, पण ते कदाचित पवारसाहेबांना कळले नाही. जातीयवादाचा चष्मा काढून ठेवल्यास दहशतवादाचे रंगही व्यवस्थित कळतील.  
जयेश राणे, भांडुप, मुंबई

न्यायाधीश पवार
मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत शरद पवारांचे वक्तव्य वाचले आणि शरद पवार न्यायाधीश झाले हे कळले. पवारसाहेब ज्या दोन घटनांचा उल्लेख करून मुस्लिमांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात नवीन काही वाटले नाही. मालेगावमधील स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेली मुस्लीम मुले ही २००६च्या स्फोटासाठी अटक केली होती, त्यांना जामीन मिळाला आहे. ते निर्दोष आहेत हे सिद्ध झाले नाही. त्यामुळे त्यांना निर्दोष म्हणून न्यायाधीशाची भूमिका बजावू नये. तसेच साध्वी प्रज्ञा सिंगला अटक झाली २००८ ला, पण अजून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे.
प्रकाश  मेटे, औरंगाबाद</strong>

राज्यभाषेच्या संवर्धनाकडे डोळेझाक
सध्याच्या नियमांप्रमाणे ज्यांना बी.एड.च्या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा असतो, अशा सर्वानाच प्रथम सर्वसामान्य-प्रवेश-परीक्षा (सीईटी) द्यावी लागते. इंग्रजी माध्यमाच्या वर्गाना शिकवायचे असेल तर या सामान्य परीक्षेव्यतिरिक्त आणखी एक इंग्रजीची विशेष परीक्षा द्यावी लागते. म्हणजे महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमात शिकवू इच्छिणाऱ्यांना इंग्रजी भाषेचे आवश्यक तेवढे ज्ञान आहे की नाही याची खातरजमा करून घेतली पाहिजे, मात्र मराठी माध्यमात शिकवण्यासाठी मराठी भाषेचे फारसे ज्ञान नसले तरी चालेल असा राज्य शासनाचा दृष्टिकोन असावा. त्यामुळेच मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत विविध इंग्रजी माध्यमांच्या शाळांत (जिथे मराठी हा विषय सातवीपर्यंत केवळ कायद्याखातर मनाविरुद्धच शिकवला जातो.) एरवी इंग्रजी, भूगोल, शारीरिक शिक्षण, चित्रकला असे इतर विषय शिकवणारे सिंधी, मद्रासी, बंगाली असे अमराठी शिक्षक मराठी विषय शिकवण्याचा उपचार कसाबसा पार पाडतात. फारसे काहीही शिकवले गेले नाही तरी सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्यामुळे सामान्यत: कोणाचीही तक्रार नसते. उलट एका विषयाची कटकट कमी झाल्याबद्दल सर्वच पालक आनंद मानतात! शिवाय स्वभाषेबद्दल उदासीन असणाऱ्या आमच्या राज्य शासनाच्या अति-उदार धोरणानुसार महाराष्ट्रात राज्यभाषेचा अभ्यास हा भारतातील इतर राज्यांप्रमाणे शालान्त परीक्षेपर्यंत अनिवार्य नसतो, त्यामुळे महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मराठी विषय कितपत व्यवस्थित शिकवला जातो, हे कधीच उघडकीला येत नाही. महाराष्ट्रातील अशा शिक्षण व्यवस्थेमधून बाहेर पडणारी नवीन पिढीतील मुले राज्यातील बहुसंख्यांच्या भाषेपासून दूर राहिल्यामुळे राज्यातील इतर सर्वसामान्य लोकांशी कधीच जवळीक आणि आत्मीयता साधू शकत नाहीत. त्यांच्यातून पुढे येणाऱ्या राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांतील नेत्यांना सामान्यांचे प्रश्न, अडचणी आणि दु:खे समजतच नाहीत. असे होणे हे समाजशास्त्राच्या किंवा लोकशाहीच्या कुठल्याच तत्त्वाला धरून नाही, म्हणून राज्यातील प्रत्येक शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत मराठीचे शिक्षण अनिवार्यच असायला हवे (या धोरणाला सर्वोच्च न्यायालयानेही भक्कम पािठबा दिलेला आहे.) आणि असे शिक्षण देण्यासाठी मराठी भाषा व्यवस्थितपणे जाणणाऱ्या मराठी शिक्षकांचीच नेमणूक व्हायला हवी. राज्यभाषेच्या संवर्धनाकडे सातत्याने डोळेझाक करणाऱ्या राज्य शासनाचे डोळे कधी उघडतील?   
सलील कुळकर्णी, पुणे</strong>

त्यांच्या भावनांत आम्हीही सहभागी
वाचक प्रतिक्रियांमध्ये शहीद कुटुंबीयाच्या भावना वाचून मन फार हेलावले. थोर शहिदांचे हे माता-पिता, पुत्र वियोगाचे दु:ख न मानता ,वेगवेगळ्या उपक्रमांतून आजही देशाची सेवा करीत आहेत, पण राजकारणी माणसे मात्र काहीही विधाने करून शहिदांच्या बलिदानाचा जणू अपमानच करत आहेत. आता स्वातंत्र्य दिन जवळ आला आहे. कित्येकांना असे वाटते की स्वातंत्र्य दिन म्हणजे झेंडा फडकविणे,भाषणे करणे, खाऊ वाटणे, फोटो काढणे. शहिदांची आठवण काहीनाच होते, तर काहीना वाटते एक सुटी मिळाली. अनेक क्षेत्रांत निर्लज्जपणाचा, उदासीनतेचा कळस पाहता, नतिकतेची पायमल्ली पहाता शहीद कुटुंबीयांच्या भावनामध्ये आम्हीही सहभागी आहोत, गरज पडली तर आत्मसमर्पण करायलाही.
शरयू घाडी  

मराठी निघाली संस्कृतच्या भेटीला?
‘नवीन शाळांचे पेव फुटले.. मराठी शाळांना धोक्याची घंटा’ ही ‘लोकसत्ता’च्या मुखपृष्ठावरची बातमी वाचली. एकीकडे शहरी तसेच ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा धडाधड बंद पडत असताना, दुसरीकडे फार मोठय़ा प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळा सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. आपल्याच पाल्यांना आपण मायमराठीपासून कायमचे तोडतो आहोत, हे आमच्या लक्षात का येत नाही? आधीच आम्ही आमच्या ‘संस्कृत’ आजीला गमावून बसलो आहोत. आम्ही वेळीच डोळे नाही उघडले तर उद्या ‘मायमराठी’लाही पोरके होऊन जाऊ. मायमराठी बोलीभाषा म्हणून अस्तित्वासाठी दीनवाणा प्रयत्न काही दिवस करील व निराश होऊन एक दिवस तिच्या संस्कृत मातेच्या भेटीला निघून जाईल. आपल्या दिवटय़ा नातवांनी स्वत:च्या मायमराठीला हालअपेष्टा करून हाकलून दिले हे पाहून संस्कृत आजीला वाईट वाटेलच, परंतु त्याहीपेक्षा तिला अधिक वेदना तेव्हा होतील, जेव्हा तिला कळेल की आपल्या नातवांनी पूतनामावशी ‘इंग्रजी’च्या प्रेमात पडून तिची लाडकी लेक ‘मराठी’ला हद्दपार केले आहे. संस्कृत आजी आम्हाला शाप वगरे देईल की नाही हे सांगणे कठीण असले तरी भावी मराठी पिढय़ांना आमचा अभिमान नक्कीच वाटणार नाही. कदाचित ते आमचा द्वेषच करतील. ज्यांचा आपल्या मातेवर विश्वास नाही, त्यांना प्रेम मिळणार कुठून?
सोमनाथ देशमाने, अहमदनगर</strong>