भारतीय नौदलातील पाणबुडी व युद्धनौका यांच्या सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेची नैतिक जबाबदारी स्वीकारीत नौदल प्रमुखपदाचा राजीनामा देणारे अॅडमिरल देवेंद्रकुमार तथा डी. के. जोशी हे असा निर्णय घेणारे पहिलेच नौदल अधिकारी होत. ‘आयएनएस सिंधुरत्न’ दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर पाणबुडीविरोधी युद्धकलेत निपुण असणाऱ्या जोशी यांना नौदल प्रमुखपद सोडावे लागले, हा विरोधाभास म्हणावा लागेल. बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणाऱ्या नौदलास मागील सात महिन्यांत दहा दुर्घटनांना सामोरे जावे लागले. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोशी यांनी प्रयत्न केले. आपला प्रदीर्घ अनुभवही कामी लावला. पण अपघातांची शृंखला काही थांबली नाही. भारतीय नौदलाचे जोशी हे एकविसावे प्रमुख. जवळपास १८ महिने त्यांना या पदावर काम करता आले.
तब्बल ३८ वर्षांच्या कार्यकाळात नौदलातील अनेक महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या जोशी यांना २०१६ पर्यंत या पदावर राहता आले असते. ४ जुलै १९५४ रोजी जन्म झालेल्या जोशी यांनी नवी दिल्लीच्या ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’, मुंबईतील ‘कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर’ आणि अमेरिकेच्या नेव्हल वॉर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. नौदलात दाखल झाल्यानंतर वेगवेगळे विभाग तसेच प्रशासकीय कामांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. नौदलप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारण्याआधी ते पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. आयएनएस रणवीर, आयएनएस विराट, आयएनएस कुठार यांसारख्या विनाशिका, युद्धनौका समाविष्ट असलेल्या सागरी विभागाची धुरा त्यांनी सांभाळली. नौदलाच्या अंदमान व निकोबार विभागीय मुख्यालयाच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले.
प्रदीर्घ सेवेच्या माध्यमातून जोशी यांनी ‘पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात वाकबगार’ अशी स्वत:ची खास ओळख निर्माण केली. याशिवाय  तीन वर्षे सिंगापूरमधील भारतीय दूतावासात संरक्षण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. युद्धनौका उत्पादन व खरेदी प्रक्रियेत सहायक नियंत्रक, मनुष्यबळ विकास तसेच माहिती युद्धतंत्र व मोहीम या कामांतही त्यांचा सहभाग राहिला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल जोशी यांना परमविशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा, युद्ध सेवा, नौसेना आदी पदकांनी गौरविण्यात आले आहे. प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यावर जोशी यांनी सागरी सीमांच्या संरक्षणासाठी अहोरात्र सज्ज राहताना नौदलाने कोणतीही त्रुटी ठेवू नये, असे सूचित केले होते. नौदलाची क्षमता विस्तारण्याचा मनोदय व्यक्त करीत त्यांनी यंत्रे व मानव यांचे संबंध महत्त्वपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यांचे हे आवाहन आगामी काळातही भारतीय नौदलासाठी महत्त्वाचेच ठरणार आहे.