‘भारत आणि चीनने जे निर्णय घेऊन अर्थव्यवस्थापुढे नेली, तेच मीही केले असते’अशा दिलखुलास शब्दांत आशियाई देशांतील खासगीकरणाचे समर्थन करणारे गॅरी बेकर हे अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे खरे; परंतु ते काही केवळ अर्थशास्त्रज्ञ नव्हते. समाजविज्ञान हाही त्यांचा विषय. समाजामध्ये द्वेषभावना का असते, गुन्हेगारी का वाढते, कुटुंबसंस्था कशी टिकते, यांसारखे सामाजिक समजले जाणारे प्रश्न मूलत: आर्थिक असतात तेकसे, हे साधार अभ्यासण्याचे मोठे काम बेकर यांनी केले आणि अर्थशास्त्रात एक नवी अभ्यास पद्धत आणल्याबद्दल ते नोबेलचे मानकरी ठरले. त्याआधी मार्क्सने सामाजिक प्रश्नांचे मूळ आर्थिक असल्याची जी सैद्धान्तिक बैठक तयार केली होती, तिचा वापर मार्क्सवादी मंडळी काहीशा सश्रद्ध भाबडेपणानेच करत असताना बेकर यांच्या कामाचे निराळेपण उठून दिसणारे आहे. बेकर अजिबात मार्क्सवादी नव्हते. हा विचारवंत त्यांनी अभ्यासला, पण पुरस्कार मात्र मुक्त अर्थव्यवस्थेचाच केला. भांडवलशाहीला नकार तर देता येत नाही, पण तिचा चेहरा अधिकाधिक मानवी असलाच पाहिजे, ही बेकर यांची भूमिका होती, किंबहुना अशा मानवी चेहऱ्यासाठी अभ्यासकांनी काम केले पाहिजे, हीच बेकर यांच्या कार्याची प्रेरणा.
त्यातूनच त्यांचे चार प्रमुख अभ्यासविषय (अल्पसंख्याक, गुन्हेगारी, कुटुंबसंस्था आणि अवयवांचा बाजार यांचा अभ्यास) फुलत गेले.
अमेरिकेतील नाना प्रकारच्या ‘अल्पसंख्याकां’ना (वांशिक, भाषिक आणि वर्णीय) सापत्नभावाची वागणूक का मिळते? या सापत्नभावामुळेच अल्पसंख्याकांना चांगल्या नोकऱ्या नाहीत अशी स्थिती येते, ती पालटणे शक्य आहे का? याविषयीचा त्यांचा
अभ्यास काही ‘बंद दरवाजां’पर्यंत त्यांना घेऊन गेला. त्यानंतर मात्र ‘माणूस हा स्वहितासाठी काम करणारा प्राणी होय. सर्व माणसे स्वार्थी असतात, स्वहित पाहतात’ हे अर्थशास्त्राचे गृहीतकच मानवी आणि सामाजिक धारणांमुळे कसकसे चुकत जाते, हे
तपासण्यात त्यांनी रस घेतला. जातिद्वेष, सामाजिक मत्सर किंवा अभिमान या प्रेरणा व्यक्तीमध्येही उतरतात आणि त्याचा परिणाम अर्थविश्वात दिसू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. एखाद्या कारखान्याने अल्पसंख्याकांनाच अधिक प्रमाणात नोकऱ्या दिल्यास
ते अधिक स्वाभिमानासाठी व्यवस्थित काम करतील आणि हे लाभकारकच ठरेल. पण तसे होत नाही, याचे कारण मालकांचा दंभ.. असे- सर्वाना माहीत असूनही चर्चेत न येणारे निष्कर्ष या अर्थशास्त्रज्ञस माज वैज्ञानिकामुळे ऐरणीवर आले. या बेकर यांनी शनिवारी, वयाच्या ८३व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. भारतासारख्या देशांकडून शिकण्याची तयारी अमेरिकी मंदीच्या काळात ठेवणारा
हा अभ्यासक, भारतापर्यंत न पोहोचताच निवर्तला.