गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर अनुभवी द्रुतगती किंवा फिरकी गोलंदाजांची मात्रा चालत नाही, अशा खेळपट्टीवरही मध्यमगती गोलंदाज मात करतात. याचा प्रत्यय बांगलादेश व भारत यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात आला. सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा यांच्यासह अनेक युवा परंतु अनुभवी फलंदाजांचा समावेश असूनही भारताचा डाव बांगलादेशने अवघ्या १०५ धावांत गुंडाळला. त्यातही ३ बाद ५० अशी स्थिती, म्हणजे सामना गमावल्याची भारतीयांना खात्री. तथापि स्टुअर्ट बिन्नी या मध्यमगती गोलंदाजाने केवळ ४.४ षटकांत सहा बळी घेऊन भारतास सनसनाटी विजय मिळवून दिला. हे बळी घेताना त्याने फक्त चारच धावा दिल्या. यावरून त्याच्या अचूक टप्पा व दिशा ठेवत केलेल्या गोलंदाजीचा प्रत्यय येऊ शकेल. बिन्नी हा भारतासाठी ‘मॅचविनर’ गोलंदाज ठरला. त्याच्याकडे झहीर खान वा भुवनेश्वरकुमार यांच्यासारखी भेदकता नाही, मात्र फलंदाजांची शैली ओळखून त्यांना फटकेबाजीपासून कसे रोखता येईल या तंत्रात स्टुअर्ट प्रवीण आहे. फलंदाजीतही तो उपयुक्त खेळाडू मानला जातो. ट्वेन्टी-२० किंवा वन डे सामन्यात फलंदाजीत त्याला सहाव्या-सातव्या स्थानावर पाठविले जाते. अशा वेळीही शेवटच्या तीनचार षटकांत भरपूर धावा कशा वसूल करता येतील ही शैली त्याने चांगली विकसित केली आहे. क्षेत्ररक्षणातही अनेक वेळा त्याने अवघड असलेले झेल घेत आपल्या संघास विजय मिळवून दिला आहे. २०१३-१४ च्या रणजी स्पर्धेत कर्नाटकला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठीही तो अनेकदा ‘मॅचविनर’ अष्टपैलू खेळाडू ठरला होता. त्याला हा वारसा त्याचे वडील रॉजर यांच्याकडून आला आहे. रॉजर यांनी भारतीय संघाकडून खेळताना अनेक वेळा संघास विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण याबाबतची सर्व शैली स्टुअर्टने आपल्या वडिलांकडून उचलली आहे असे म्हटल्यास ते फारसे वावगे ठरणार नाही. भारतीय संघात स्थान मिळविण्याबाबतही त्याला वडिलांसारखाच अनुभव आला. उशिरा मिळालेल्या संधीचाही रॉजर यांनी योग्य उपयोग केला. स्टुअर्ट यालाही जरा उशिराच संधी मिळाली. मध्यमगती गोलंदाजही ‘मॅचविनर’ असू शकतात हे भारतीय निवड समितीला जरा उशिराच लक्षात आले असावे. १९८३मध्ये भारताने पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला. त्या विजेतेपदात मोहिंदर अमरनाथ याच्या मध्यमगती गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. इंग्लंडच्या दौऱ्यावर पुढील महिन्यात भारतीय संघ जाणार आहे. तेथील वातावरण व खेळपट्टय़ा याचा फायदा घेण्याची क्षमता स्टुअर्टकडे निश्चित आहे. अर्थात, भारतीय निवड समितीने त्याची निवड केली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality observation stuart binny
First published on: 19-06-2014 at 12:17 IST