द्वैतातूनच प्रपंच उत्पन्न झाला असल्याने त्यात एकसमान स्थिती राहूच शकत नाही. संयोग आहे तिथे वियोगही आहे. सुख आहे तिथे दुखही आहे. मान आहे तिथे अपमानही आहे. लाभ आहे तिथे हानीही आहे. यश आहे तिथे अपयशही आहे. मग अशा प्रपंचात मला कायम सुखच लाभेल, मला कायम मानच मिळेल, मला कायम लाभच होईल, मला कायम यशच मिळेल, आवडत्या व्यक्तिंशी माझा कायमचा संयोगच राहील, ही दुराशाच दुखाचं कारण आहे. प्रपंच सुखही देत नाही म्हणूनच तो खरं तर दुखही देत नाही. पण प्रपंचाचं हे खरं स्वरूप न जाणता आपण मोह आणि भ्रमाने त्यात अडकतो आणि त्यातच आयुष्यभरासाठी टिकणारा आधारही शोधत राहातो. आपण स्वत: अशाश्वत असताना अशाश्वत प्रपंचात शाश्वत आधार आपल्याला हवा असतो. प्रपंच अर्थात दुनियेची ही क्षणभंगूरता संतांनी सांगितली, प्राचीन ग्रंथातही ती नमूद आहे. इतकंच कशाला आपल्यालाही पदोपदी तिचा अनुभव येतो. इतके असूनही आपण जागे होत नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘प्रचीति तीन आहेत. पहिल्या दोन प्रचीतीने वागेल तो तरेलच. पण माणूस आत्मप्रचीतीने शहाणा होत नाही हे नवल आहे. आपण जागे होत नाही. डोळे असून पहात नाही. म्हणून अंधश्रद्धा प्रपंचातच आहे’’ (बोधवचने, क्र. ३१३). तीन प्रचीती आहेत. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि तिसरी आत्मप्रचीती. प्रपंचातील नश्वरतेची, अनिश्चिततेची, स्वार्थजन्य व्यवहाराची प्रचीती आपल्याला येतेच. तरीही दुनियेचा आधार टिकविण्याची आपली धडपड संपत नाही. प्रपंच सुख देईल, हीच आपली एकमेव घातक श्रद्धा आहे. त्यातूनच अशाश्वत प्रपंचात आपण कायम टिकणारा आधार शोधत आहोत. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आधाराशिवाय कोणी जगू शकत नाही यातच माणसाची अपूर्णता आहे.. आधार हा देहापेक्षा मनाचाच आहे’’ (बोधवचने, क्र. २३९). आपल्याला प्रपंचात आधार हवा आहे तो खरा मानसिकच आहे. आई जवळ आहे, या भावनेनंच मूल शांत झोपी जातं. आईचा मानसिक आधारच त्याला हवा असतो. तसंच आहे हे. प्रत्यक्षात अनेक अपूर्ण वस्तू गोळा करून पूर्ण समाधान मिळवता येणार नाही. त्यामुळे अपूर्ण वस्तूंनी, व्यक्तिंनी भरलेला प्रपंच कधीही पूर्ण समाधान देऊ शकत नाही. या वास्तवाचं भान टिकवणं, हाच अभ्यास आहे. आता याचा अर्थ प्रपंच रूक्षपणे करायचा नाही. प्रपंच भले काळाच्या आधीन असेना का, त्यातील वस्तू आणि व्यक्तींमध्ये बदल, घट आणि नाश अटळ असेना का, वास्तवाचं भान ठेवून आपण त्यातही आनंद निर्माण करू शकतो. प्रपंचाचं वास्तविक स्वरूप जाणण्याच्या आणि ते मनात ठसविण्याच्या अभ्यासानं जाण आली पाहिजे. ती सूक्ष्म आहे. ती जाण आतमध्ये टिकून व्यवहार मात्र चारचौघांसारखा करता आला पाहिजे. श्रीमहाराज सांगतात, ‘‘जितकी ज्याची पायरी तितका व्यवहार पाळलाच पाहिजे. नाहीतर देव अंतरतो आणि व्यवहार तुटतो. व्यवहार सुटावा लागतो, तो सोडून चालत नाही. आपण तो सोडतो तोपर्यंत खरे नाही’’ (बोधवचने, क्र. १२६).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realisation
First published on: 02-04-2013 at 12:45 IST