रोसेटा यानाने धूमकेतूवर स्वारी केली. त्यातील लँडर धूमकेतूच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा सात तासांचा थरार ज्या ब्रिटिश वैज्ञानिकाने घडवून आणला त्याचे नाव आहे मॅट टेलर. त्याच्यासाठी तो आनंदाचाच क्षण होता व त्या वेळी कोण काय करील, याचा नेम नाही. हा अवलिया अर्धनग्न बायकांची चित्रे असलेला शर्ट घालून सर्वाना सामोरा गेला. पण ते अतिशय विचित्रच वागणे होते.  वैज्ञानिक विक्षिप्त असतात, आत्ममग्न असतात, तसाच हा ट्विटरच्या भाषेत ‘शर्ट गेट’ नावाचा प्रकार होता. पाश्चिमात्य जगाने त्याला स्त्रीवादाच्या धोपटण्याने झोडपून काढले, पण आपण केले ते चुकलेच हे त्याच्या लक्षात येऊन त्याच पत्रकार परिषदेत त्याने माफी मागितली व लहान मुलासारखा ढसाढसा रडला. त्याने त्याच्या पायांवर रोसेटा यानातील ऑर्बिटर व लँडर या दोन्हींचे टॅटू गोंदवून घेतले.
टेलर हा युरोपीय अवकाश संस्थेच्या रोसेटा प्रकल्पाचा प्रकल्प वैज्ञानिक आहे. त्याचा जन्म व शिक्षण लंडनमध्ये झाले. लिव्हरपूल विद्यापीठातून त्याने भौतिकशास्त्राची पदवी घेतली. वैज्ञानिकांची पंढरी असलेल्या इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमधून तो पीएच.डी. झाला. २००५ पासून तो युरोपीय अवकाश संस्थेत काम करीत आहे. सौरवाताचे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतात यावर त्याने शोधनिबंध लिहिला होता. प्रचंड ऊर्जाभारित कण हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. युरोपीय अवकाश संस्थेत काम करताना रोसेटा या धूमकेतूवर स्वारी करणाऱ्या मोहिमेची संधी चालून आली, त्याचे प्रकल्प संचालकपद टेलरला मिळाले. यापूर्वीची अनेक याने धूमकेतूच्या जवळून गेली होती, पण आता तर यान धूमकेतूवर उतरवायचे होते. पण त्याने हे आव्हान आनंदाने स्वीकारले व रोसेटा यान दहा वर्षांनी धूमकेतूच्या कक्षेत गेले. त्याच्या लँडरच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला तरी ते नियोजित स्थानापेक्षा १ कि.मी. दूर उतरले. पण तोपर्यंत लँडरच्या कॅमेऱ्याने बरीच माहिती पृथ्वीला पाठवली होती. धूमकेतूचे संगीत (आवाज) टिपले. अतिशय अविश्वसनीय अशी ही गोष्ट होती. त्यामुळे टेलर आनंदाने बेहोष झाला नसता तरच नवल होते.
वेडी माणसे काहीही करू शकतात, फक्त त्यांच्या वेडाला दिशा मिळावी लागते. टेलरची बहीण मॅक्सिन हिच्या मते आपला भाऊ हा विसराळू आहे व रोजच्या आयुष्यात त्याचा काही उपयोग नाही. एखाद्या गोष्टीत तो इतका वाहत जातो की तो शहाणपण हरवून बसतो. त्याने जे शर्ट गेट प्रकरण केले त्याचा उलगडा येथे होतो. त्याने त्याचा आनंद चमत्कारिक पद्धतीने व्यक्त केला, पण या वेडय़ाला अवकाश संशोधनात एवढा मोठा इतिहास रचल्याबद्दल आपण माफ करून टाकू या. तुम्हाला काय वाटते?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rosetta mission scientist dr matt taylor
First published on: 17-11-2014 at 02:37 IST