अतुल सुलाखे

साम्ययोग आणि साम्यवाद अशी जोडी चटकन डोक्यात येते. नंतर नेमकी कोणती विचारधारा आजही सुसंगत आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न दिसतो. साम्यवाद आणि साम्ययोग या परस्परविरोधी विचारधारा आहेत याची जाणीव दोन्ही गटांना कायम होती.

विनोबांनी तर ‘नाशी फाशी आणि रुसी’ या शब्दांचा आधार घेत नाझी, फॅसिस्ट, साम्यवादी या तिन्ही विचारसरणींना नकार दिला. चौथी साम्राज्यवादी रचना होती. या विचारसरणी देशासाठी घातक असून गांधीजींचा विचार देशासाठी तारक आहे असा निर्वाळाही त्यांनी दिला.

विनोबांनी साम्यवादाचे सतत आणि कठोर परीक्षण केले. ते ज्या काळात समाजकारणात सक्रिय होते त्या काळाची ती गरजही होती. दुसरीकडे भूदान आंदोलनाला जमिनींचा प्रश्न सोडवायचा होता, पण त्यांची रीत चुकीची होती. पर्यायाने योग्य परिणाम दिसले नाहीत अशी साम्यवाद्यांची भूमिका होती. विनोबांचे अध्यात्म, त्यातून समोर आलेले साम्ययोगासारखे चिंतन साम्यवाद्यांना मान्य होणे अशक्य होते. असे असले तरी दोन्ही गटांनी वैचारिक विरोध कायम ठेवून परस्परांविषयी आदराची भूमिका घेतली होती.

समता आणि करुणा हे साम्यवादाचे गुण विनोबांनी मान्य केले आणि ते वेळोवेळी उद्धृतही केले. त्याच वेळी साम्यवादी मंडळींनी विनोबांची सर्वहारा जनतेविषयी असणारी निष्ठा आणि कळकळ मान्य केली.

सर्वोदय, साम्ययोग, गांधीजी आणि विनोबा यांचे अध्यात्म, त्यांनी केलेले रचनात्मक आणि सत्याग्रहाचे कार्य, भूदान यज्ञ, गांधीजींच्या निकटवर्तीयांचे साम्यवादाविषयीचे चिंतन या व्यापक पटलावर साम्ययोग आणि साम्यवाद यांचा विचार झाला नसेल तर होऊ शकतो.

साम्यवाद आणि साम्ययोग ही तुलना महत्त्वाची असली तरी तिला मर्यादा आहेत. त्यापेक्षा सर्वोदय आणि साम्ययोग यांचे नाते पाहायला हवे. कारण त्या तुलनेत परिवर्तनाची बीजे आहेत.

खरे तर सर्वोदय आणि साम्ययोग हे परस्परांशी निगडित दोन तत्त्व-विचार आहेत. ‘सर्वोदय’ हे गांधीजींनी स्वीकारलेले तथापि तत्पूर्वी प्रचलित असलेले तत्त्वज्ञान आहे. सर्वोदयाचे मूळ, रस्किनच्या लिखाणात आहे. ‘अन टु धिस लास्ट’. त्या पुस्तकाचा अनुवाद करताना बापूंनी ‘सर्वोदय’ शब्द वापरला.

सर्वोदय आणि गांधी-विचार या शब्दांची सांगड अर्थातच विनोबांनी घातली. गांधीजींच्या नंतर त्यांचा विचार कोणत्या शब्दाने ओळखला जावा असा पेच होता. तेव्हाही ‘गांधीवाद’ हा शब्द पुढे आला होता पण विनोबांनी तो नाकारला. आपल्याकडे व्यक्तीच्या नावाने विचार ओळखण्याची परंपरा नाही, असे त्यांनी सांगितले.

रस्किनकडे अन्य अभ्यासकांनी कसे पाहिले? जावडेकर आणि भागवत या आचार्य द्वयीने रस्किनचा विचार ‘अर्थशास्त्र की अर्थशास्त्र’ असा सांगितला तर गांधी विनोबांनी त्यासाठी ‘सर्वोदय’ या अधिक व्यापक शब्दाची निवड केली.

विनोबा सर्वोदयाचे भाष्यकार आणि साम्ययोगाचे प्रतिष्ठापक होते. त्यामुळे त्यांची या दोन्ही विचारसरणींची मांडणी महत्त्वाची ठरते. याशिवाय भूदान यज्ञाचे त्यांचे कार्य हे ‘अ‍ॅप्लाइड’ सर्वोदय आणि साम्ययोगाचे रूप होते. यामुळे विनोबांचे या दोन्ही विचारसरणींचे चिंतन महत्त्वाचे आहे. jayjagat24 @gmail.com