– अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com

समाधान चर्चेने नव्हे तर आचरणाने होईल.

– गांधीजी, विनोबांना लिहिलेल्या पत्रातून.

गांधीजींच्या (फेब्रुवारी १९१६ मधील) त्या भाषणाची चर्चा काशीमध्ये महिनाभर सुरू होती. विनोबांपर्यंत ती पोहोचली. त्यातील मुद्दा त्यांच्या मनावर ठसला. ‘निर्भयतेशिवाय अहिंसा असूच शकत नाही.’ मनात हिंसा ठेवून अहिंसेचे पालन ही गोष्ट प्रत्यक्ष हिंसेहून अधिक वाईट असते. विनोबा क्रांतिकारकही होते. त्यामुळे हा मुद्दा त्यांना पटणे साहजिक होते.

त्या व्याख्यानाची नीट माहिती घेतल्यावर त्यांनी गांधीजींना पत्र लिहिले. त्यात मनातील शंका बऱ्याच मांडल्या होत्या. गांधीजींनी त्या पत्राचे सविस्तर उत्तर दिले. पाठोपाठ विनोबांनी अहिंसेच्या अनुषंगाने प्रश्न विचारणारे दुसरे पत्र पाठवले.

त्याच्या उत्तरात बापूंनी लिहिले, ‘अहिंसेविषयी जे प्रश्न विचारले आहेत त्यांचे समाधान पत्र-व्यवहारातून होऊ शकत नाही. त्यासाठी जीवनालाच स्पर्श झाला पाहिजे. म्हणून काही दिवस माझ्याजवळ आश्रमात येऊन राहिलात तर गोष्टी होऊ शकतील.’ या पत्रातील ‘समाधान चर्चेने नव्हे तर जीवनाने होते.’ विनोबांना हे वाक्य मनापासून पटले.

गांधीजींनी पत्रासोबत आश्रमाची नियमावलीही पाठवली होती. विनोबा ते पत्रक पाहून चकित झाले. तोवर एखाद्या संस्थेची अशी नियमावली त्यांच्या पाहण्यात नव्हती. शिवाय ते नियम आगळे आणि सखोल होते. तिच्यात म्हटले होते, ‘या आश्रमाचे ध्येय आहे विश्वहित-अविरोधी देशसेवा आणि त्यासाठी आम्ही खाली लिहिलेली व्रते आवश्यक मानतो.’ त्यानंतर सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शरीरश्रम, आदी अकरा व्रतांचे पालन आवश्यक मानले होते.

एखाद्या संस्थेच्या नियमावलीत व्रतांचे पालन अत्यावश्यक मानण्याचे एकही उदाहरण त्यांच्या पाहण्यात तोवर नव्हते. या सर्व गोष्टी त्यांनी धर्मग्रंथ आणि योगशास्त्रात पाहिल्या होत्या. तथापि त्या देशसेवेसाठी आवश्यक आहेत हे मानणाऱ्या गांधीजींबद्दल त्यांच्या मनात ओढ निर्माण झाली. हा माणूस (गांधीजी) देशाचा आध्यात्मिक विकास आणि स्वातंत्र्य दोन्ही एकाच वेळी साधू पाहात होता आणि विनोबांना ते पसंत पडले. कारण त्यांची हीच भूमिका होती.

‘तू इकडे निघून ये,’ या गांधीजींच्या सूचनेनुसार ते कोचरब आश्रमाकडे रवाना झाले.

एका अनोख्या पर्वाचा जन्म झाला. गांधी परिवारात किमान नऊ दशके अध्यात्म आणि रचनात्मक कार्य यांचा अत्यंत मनोज्ञ आविष्कार समोर आला. विनोबा ते शिवबा अशी ही नऊ दशके आहेत. या अध्यात्माने जीवनाचा कोणताही पैलू अलक्षित ठेवला नाही.

रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या जोडीने अध्यात्माला मानवसेवेची जोड दिली तर गांधीजींनी शरीर परिश्रमाची, असे विनोबा म्हणत. खरे तर गांधीजींच्या जोडीने त्यांचेही नाव घ्यावे लागेल इतके त्यांचे कार्य मोठे आहे. एका न ऐकलेल्या भाषणामुळे आणि एक कार्यक्रम पत्रिका वाचून विनोबा, गांधीजींकडे आकृष्ट झाले कारण संतगण आणि आईकडून त्यांना ही प्रेरणा लाभली आणि गांधीजींमुळे ती व्यापक झाली. विनोबांना तिचे दर्शन जीवनात घेता आले.