माझ्या ठाईं अनन्यत्वें भक्ति निष्काम निश्चळ

एकांताविषयीं प्रीति जन-संगांत नावड

                                      – गीताई अ. १३

बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती ।

जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥

                        – ज्ञानेश्वरी अ. १३ – ६१४॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।

न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सूखसंवाद जो ऊगमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

                          – दासबोध

केवळ काशी नगरीमधील वास्तव्याच्या दृष्टीनेच नव्हे तर विनोबांची तपश्चर्या आणि त्यांचे गीतेची सेवा या दोन्ही संदर्भात वरील तिन्ही उक्ती अतोनात महत्त्वाच्या आहेत. गांधीजींच्याकडे येण्यापूर्वी विनोबांनी अक्षरश: या शिकवणीनुसार साधना केली. विनोबांच्या आयुष्याचा भविष्यातील  जो पट आहे त्याचा आरंभ अशा रीतीने झाला.

खरे तर ब्रह्मजिज्ञासा, मोक्ष, मुक्ती असे शब्द ऐकले की हे काही तरी गूढ असावे अशी कुणाचीही धारणा होते. ती स्वाभाविकही आहे. तथापि विनोबांच्या बाबतीत तो साधनेप्रमाणेच रंजनाचाही भाग होता. त्यांना ‘ब्रह्मजिज्ञासा’ अशी कादंबरी लिहायची होती. थेट कादंबरीच. कोणताही ‘ग्रंथ’ नाही. विनोबांची गद्यशैली, त्यांची साधना आणि विषय वस्तू रसाळ रीतीने सांगण्याची हातोटी हे पाहता ही कादंबरी नक्कीच अद्भूत झाली असती. त्याचप्रमाणे त्यांना ‘आई’वर महाकाव्यही लिहायचे होते. तेही राहून गेले.

त्यांनी या वास्तव्यात काव्यनिर्मितीही केली. काव्य करावे आणि ते अग्नीला समर्पण करावे असा त्यांचा कार्यक्रम असे. या अग्निसमर्पणातून तीन चार कविता बचावल्या आणि त्या ‘विचार पोथी’मधे सामावल्या. उरलेली काव्य साधना गीताईमधून प्रकट झाली.

काशीमधे विनोबांचा नित्यक्रम कसा याचे नेमके वर्णन शिवाजीरावांनी ‘विनोबा जीवन दर्शन’मधे केले आहे. ‘.. कोठे तरी दुपारचे जेवण जेवावें, संध्याकाळीं पैशाचीं रताळीं व दही घेऊन खावें, आणि दिवसभर अध्यात्मचिंतनांत, ब्रह्मसूत्रादि ग्रंथ वाचनांत, गंगाकाठी ध्यान करण्यांत, अथवा काव्यें रचण्यांत मग्न असावे असा कार्यक्रम असे. वर्तमानपत्रें वाचावीं; आपापसांत चर्चा करावी. असेंहि घडें. काशींतल्या कित्येक पंडितांची हि गांठ पडे. परंतु न्यायव्याकरणावर बारा बारा वर्षे फुकट घालविण्याला हा ब्रह्मनिष्ट पुरुष कधींच तयार नव्हता. तेव्हां त्यांचे यांचे जमावें कसें? शब्दजालाच्या महारण्यांत आंधळय़ा हत्तीप्रमाणें भ्रमण करणाऱ्या त्या पंडितांच्या अर्थशून्य घटपटाच्या वादविवादांत चित्त तल्लीन होण्याची मुळींच शक्यता नव्हती.. ’

‘.. ज्यावेळीं कोणी चिटपांखरूंसुद्धां नसावयाचे अशा वेळीं, रात्रीं तीन वाजतांच ह्याने गंगेवर येऊन बसावें, तिच्या थंडगार पाण्यांत किती तरी वेळ स्नान करावें आणि बिंदुमाधव घाटावर ध्यान करावें. तेथें कोणीं नाही-दुसरे कोणीं नाहीं-एक हा बालक आणि ती माता! अथवा हे दोघे तरी कशाचे? तेथें केवळ निरामय एकताच असे..’

(उतारा मुळाबरहुकूम आणि व्याकरणाच्या जुन्या नियमांनुसार).

विनोबांची ही साधना रामदास स्वामींच्या साधनेचे स्मरण करून देते. शिवाय गीतेतील ज्ञानी पुरुषाची चर्याही सांगते. विनोबांच्या प्रखर सामाजिक दृष्टीचे सूचन करणारे हे वर्णन आहे.

– अतुल सुलाखे

j