राजधानी दिल्लीत महाराष्ट्राच्या कर्तबगारीची खूण ठरलेल्या व्यक्तींचा ठाव घेणाऱ्या सदराचा हा दुसरा लेखांक. आजचे मानकरी आहेत राममनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर  ए. के. गडपायले
डॉ. आदेश किसनजी गडपायले हे नाव महाराष्ट्राला ठाऊक असण्याची शक्यता तशी कमीच आहे, पण तेवढय़ामुळे डॉक्टर गडपायले ‘अपरिचित’ ठरत नाहीत, कारण मराठी माणसाला माहितीनसलेली ही व्यक्ती दिल्लीतील व्हीव्हीआयपींना चांगलीच परिचित आहे. विशेषत: संसदेचे ७९० सदस्य, दिल्लीतील बडे नोकरशहा आणि अन्य महत्त्वाच्या लोकांना. केंद्राच्या आरोग्य खात्यात संयुक्त सचिवपदी असलेले डॉ. गडपायले दिल्लीतील प्रसिद्ध डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या नर्सिग होम विभागाचे प्रमुख आहेत. केंद्र सरकारने सर्व संसद सदस्यांच्या तब्येतीची देखभाल करण्याची टाकलेली जबाबदारी गेल्या पंधरा वर्षांपासून ते तत्परतेने पार पाडत आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यांतून संसदेत पोहोचणाऱ्या खासदारांना केवळ त्यांचे नावच माहीत आहे असे नव्हे, तर त्यांच्याकडून मिळणारी शुश्रूषा आणि उपचार यांबद्दल विश्वासही आहे.
डॉ. गडपायले मूळचे भंडारा जिल्ह्य़ातील साकोली तालुक्यातले. तिथले, कुणाच्या खिजगिणतीतही नसलेले खंडाळा हे त्यांचे जन्मगाव. दिल्लीत पोहोचून देशातील तमाम राजकीय नेत्यांसाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती ठरण्याचे कर्तृत्व गडपायलेंनी बजावले असले तरी त्यांच्या गावाने अजून डांबरी रस्ता पाहिलेला नाही. जेमतेम आठ वर्षांपूर्वी त्यांच्या गावात पहिल्यांदा विजेचा दिवा लागला. प्रगत महाराष्ट्रातील अशा मागास गावचा हा प्रतिनिधी  निरपेक्ष भावनेने आणि निगर्वीपणाने दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. देशातील अव्वल राजकारण्यांसाठी सर्वात संवेदनशील गोष्ट म्हणजे त्यांची प्रकृती. राम मनोहर लोहिया रुग्णालयात खास राखीव असलेल्या व्हीव्हीआयपींच्या कक्षामध्ये होणाऱ्या उपचारांच्या खबरीने आयसीयूचा उंबरठाही ओलांडू नये, असाच त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्या विश्वासाला डॉ. गडपायलेंनी कधी तडा जाऊ दिलेला नाही. या जबाबदारीच्या ओझ्यामुळेही असेल कदाचित, पण ते प्रसिद्धीच्या झोतापासून शक्यतोवर दूर राहणेच पसंत करतात. अनेक बडे मंत्री व नेत्यांशी जवळीक तसेच स्वत: मोठय़ा हुद्दय़ावर असूनही त्यांचा साधेपणा टिकून आहे.
गरीब घरात जन्मलेल्या डॉ. गडपायलेंनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि औषधशास्त्रात एम.डी. करेपर्यंत विद्यार्थिदशेत अनेक खस्ता खाल्ल्या. १९७० साली दहावी बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत ते अठरावे आले तेव्हा पुढील शिक्षणास नागपूरला पाठविण्यासाठी त्यांच्या वडिलांना पाचशे रुपये एकर भावाने दोन एकर जमीन विकून पैसा उभा करावा लागला. नागपुरात तीन महिने दारोदार फिरण्याची वेळ आल्यावर गडपायले चोखामेळा वसतिगृहात स्थिरावले. मेरिटमधल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या जोरावर नेटाने शिक्षण पूर्ण करीत, सतत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत शैक्षणिक यशाबरोबर जिद्दीचेही एक एक शिखर सर करीत ते गेले. नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीत असताना अन्न व औषधांविना १५ नोव्हेंबर १९८२ रोजी देहत्याग करणारे विनोबा भावे यांना मृत घोषित करून मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले. त्याच दिवशी घरी परतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारे गडपायलेंच्या हाती केंद्रीय आरोग्य खात्यात वर्ग-१ चे अधिकारी म्हणून नोकरीची ऑर्डर हाती पडली.

कर्तव्य आणि रागरंग..
 नागपुरात तेरा वर्षे राहिलेल्या गडपायलेंनी या नोकरीतील पहिली सहा वर्षे : १९८३ ते १९८९ काढली ती दादरा नगर हवेलीत  महाराष्ट्रात राहण्याची पुढे कधीही संधी मिळणार नाही, याची कल्पना आल्याने त्यांनी नागपुरात विनंतीवरून बदली करून घेऊन सीजीएचएसमध्ये पाच वर्षे काम केले. तिथून १९९४ त्यांची बदली झाली ती दिल्लीला. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दोन वर्षे सामान्य वॉर्डात काम केल्यानंतर १९९७ पासून ते व्हीव्हीआयपींच्या सेवेत गुंतले आहेत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला होणारे सरकारी सोहळे, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा ताफा जाणार असेल, परदेशी पाहुणे येणार असतील, तर वैद्यकीय सुविधेची सर्व व्यवस्था त्यांना करावी लागते.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सान्निध्यात ते दहा वर्षे होते. या काळात व्हीआयपींवर कशी ट्रीटमेंट करावी लागते, याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. व्हीआयपी रुग्णांना स्पेशल प्रोटेक्शन, पॉवरफुल कव्हरेज मिळते. ते इच्छा करतील त्या सुविधा मिळतात. व्हीआयपींची सेवा कशी आणि कधी करावी लागेल, हे सांगता येत नाही. त्यांना समजावून सांगणे आणि समजून घेणे अतिशय कठीण असते. ९९ टक्के खासदार, मंत्री, ज्येष्ठ अधिकारी, विदेशी पाहुणे अत्यंत चांगले असतात. उपचार येथेच केले पाहिजेत, असे बंधन त्यांच्यावर नसते. डॉक्टरांचे म्हणणे ते संयमाने ऐकून घेतात, पण कोणते उपचार करणार हे त्यांना नीट समजावून सांगणे आवश्यक असते.. हे सारे रागरंग डॉक्टर सांभाळतात.
निराळय़ा जबाबदाऱ्या
व्हीआयपींच्या उपचारांमध्ये ते जेवढी तत्परता दाखवतात, तेवढीच त्यांच्या मनात गोरगरीब रुग्णांविषयी सहानुभूती असते. गरीब रुग्णांसाठी अनेकदा सांत्वनाची फुंकरही पुरेशी असते, याची त्यांना जाणीव आहे. रुग्णालयाच्या नर्सिग होमचे प्रमुख म्हणून भरती झालेल्या रुग्णांचे रोगनिदान आणि उपचारांची पुढील दिशा ठरविण्यासाठी रात्रपाळीतील डॉक्टरांकडून रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रोज सकाळी सव्वा आठ वाजता ते रुग्णालयात दाखल होतात. सहकाऱ्यांकडून घेतलेली ही माहिती (ब्रीफिंग) म्हणजे गडपायलेंचा सकाळचा ब्रेकफास्ट. त्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जातच नाही. गरीब आणि व्हीआयपी अशा परस्परभिन्न रुग्णांची देखभाल करताना वेगळ्याच प्रकारचे अनुभव येतात, पण दोघांचेही उपचार करताना पूर्ण समाधान मिळते. गरीब रुग्णांवरील उपचार तांत्रिकदृष्टय़ा अवघड असू शकतात, पण व्हीआयपींवरील उपचार प्रशासकीयदृष्टय़ा अवघड.. या अनुभवाला आता ते सरावले असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
रुग्णालयाच्या औषध विभागाचे प्रमुख, सफदरजंग आणि राम मनोहर लोहियासाठी औषधांची खरेदी करणाऱ्या संयुक्त खरेदी समितीचे अध्यक्ष, केंद्रीय लोकसेवा आयोग, लष्कर, निमलष्करी दल, देशभरातील राज्यसेवा आयोगांसह अनेक मंडळांवर सल्लागार व निवड समितीचे सदस्य, एमडी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे पर्यवेक्षक, खासगी व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी निरीक्षक, दिल्लीच्या गोल मार्केट भागातील केंद्रीय विद्यालयाचे अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्यांमुळे ते सतत व्यग्र असतात. या जबाबदाऱ्यांमध्ये माणूस अडकून जातो किंवा ‘फसतो’, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. दिल्ली त्यांना व्यक्तिश: बरी वाटत नाही, कारण कोण कधी टोपी घालेल याची शाश्वती नसते, असा त्यांचा अनुभव आहे. नर्सिग होमच्या प्रशासनात सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि सहभाग असल्याशिवाय साधे कामही होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनातील सहभागावर ते विशेष भर देतात. प्रशासकीय कामात फार गुंतून पडल्यास वैद्यकीय कौशल्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, असे त्यांचे मत आहे. प्रशासकीय कामांसाठी अतिरिक्त वेळ काढून वैद्यकीय कौशल्याचा दर्जा जपण्याचा प्रयत्न  ते करतात.
भारताचे वेगळेपण
भारतातील आरोग्यसेवा जगातील कुठल्याही देशापेक्षा खूप चांगली आहे. अमेरिकेत तुमचा विमा नसेल, तर तुम्ही मृत्युमुखी पडाल, पण कुठेच उपचार मिळणार नाहीत. ब्रिटनमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसाठी किमान सहा महिने वाट बघावी लागते. तसे भारतात होत नाही. आपल्याकडे इतकी सरकारी रुग्णालये आहेत. गरीब रुग्ण गेल्यावर तिथे त्यांच्यावर काही ना काही उपचार होतोच. आरोग्यसेवेच्या बाबतीत असंख्य कमतरता असतील, पण सहानुभूती आणि मोफत उपचारांच्या बाबतीत आम्ही खूप पुढे आहोत, याचा त्यांना अभिमान वाटतो.
साने गुरुजी, विनोबा भावे आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रभाव असलेले गडपायले धार्मिक पुस्तके, मराठी व हिंदूी कादंबऱ्यांमध्ये रमतात. विद्यार्थिदशेत छोटय़ामोठय़ा गोष्टींसाठी धक्के खावे लागल्याचे अनुभव स्मरणात ठेवून वंचित-उपेक्षितांना दिलासा देण्याचे ते प्रयत्न करतात. आयुष्याविषयी फार अपेक्षा नसाव्यात. निरपेक्षपणे जितके देता येईल तेवढे द्यावे. देण्यात जेवढे सुख आहे ते घेण्यात नाही, असा त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे.
 सतत तणावाखाली वावरत असल्याने व्हीव्हीआयपींमध्ये त्यांना रक्तदाबाचा त्रास आणि मधुमेह हे दोन विकार प्रामुख्याने आढळतात. मॉर्निग वॉक, संतुलित आहार, मन व क्रोधावर नियंत्रण आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना संतुलन साधता येऊ शकते, असे त्यांना वाटते. रुग्ण व्हीआयपी असो की गरीब, तो बरा होणे हेच अंतिम उद्दिष्ट बाळगणारे डॉ. गडपायले डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात रोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या रुग्णांच्या सेवेतून समाधानाचे कण वेचण्यात मग्न आहेत.