साधकाला सहृदयतेचा, उपासनेचा, दानाचा आणि व्रताचा मोह असतो, हे ऐकताना आपल्याला वाटेल की सहृदयता, उपासना, दान आणि व्रत या साधकासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी नाहीत का? उपासना आणि व्रताशिवाय साधक कसा काय राहू शकेल? मग या गोष्टींचाही मोह असतो आणि तो साधकाच्या प्रगतीत बाधा निर्माण करू शकतो, म्हणजे काय? तर याचा थोडा विचार करू. इथे जो मोह आहे तो उपासना वा व्रत एकांतात करण्याचा नव्हे, तर आपली उपासना, आपली व्रतवैकल्ये लोकांना दाखविण्याचा आहे! थोडक्यात ती लोकेषणाच आहे. साधक जीवनातील शिस्तीसाठी आपण काही गोष्टी आचरणात आणतो आणि त्या आवश्यकही असतात. उदाहरणार्थ काहीजण अमुक वारी उपवास करतात, अमुक गोष्ट केल्याशिवाय अन्नाचा घासही घेत नाहीत, वगैरे. या गोष्टी आचरणात आणण्यापेक्षा त्यांची प्रसिद्धी करण्याचा मोह आपल्याला जास्त असतो. उपासना, व्रत यांचा मूळ हेतू ‘मी’ नष्ट करणं आहे, अहंकाराचा निरास आहे. त्यांचंच मी अवडंबर माजवतो आणि त्यातून इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, असा समज आपल्याच मनात सुप्तपणे जोपासू लागतो. तर उपासनेचा मोह हा असा आहे. सहृदयता आणि दानाचा मोह कसा आहे? साधना जसजशी खऱ्या अर्थानं खोलवर साधू लागेल तसतसं साधकाचं मन व्यापक होईल, इतरांविषयी प्रेम, अनुकंपा, करुणा हे भाव त्याच्या अंतरंगात सहजपणे येतील, हे खरं. पण तशी साधना खोलवर रुजली नसतानाही मोहातून दुसऱ्याविषयी सहृदयतेचा भाव उत्पन्न होऊ शकतो. आपली सवय कशी आहे? आपल्याला कोणताच भाव मनात जिरवता येत नाही. तो भाव काहीतरी कृती केल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. सहृदयतेतून मग ‘दाना’ची कृती सुरू होते. दुसऱ्यासाठी सतत काहीतरी करीत राहाण्याची सवय जडते. मग त्यासाठी ती व्यक्ती खऱ्या अर्थानं पात्र आहे का, तिला त्या गोष्टीची खरी गरज आहे का, जाण आहे का, असा कोणताही विचार आपल्या मनाला शिवत नाही. इथे पात्रतेचा अर्थ नीट लक्षात घ्या. जो खरोखरीच भुकेला आहे तोच अन्नदानासाठी खरा पात्र आहे. त्यालाच खाऊ घातलं पाहिजे. जो दिवसरात्र भरपेट खात आहे आणि नासाडी करून अन्नाचा अवमानही करीत आहे तो अन्नदानासाठी पात्र नाही. तेव्हा जे ज्याला द्यायचं त्याला त्याची खरी गरज असणं, हाच पात्रतेचा निकष आहे. ते देणंही इतपतच असावं की त्याला स्वप्रयत्नांसाठी जिद्दीनं उभं राहाता यावं आणि मग दुसऱ्याकडून काही घेण्याची गरज उरू नये. आपलं दान, आपली सहृदयता अशी नसते. आपण दुसऱ्यासाठी जे काही करतो, त्याच्या परतफेडीची अपेक्षा लगेच बाळगतो. ही अपेक्षा वस्तूची नसते तर मानाची असते. दुसऱ्यानं आपल्याला मान द्यावा, आपल्याला मोठेपणा द्यावा, अशी आपली अपेक्षा असते. तेव्हा दुसऱ्यासाठीच्या सहृदयतेतून, दुसऱ्यासाठी काही करण्यातून वा त्याला काही देण्यातून आपण मान मिळविण्याचीच अपेक्षा करीत असतो. दिखाऊ उपासना आणि व्रताचरणातूनही आपण मोठेपणाच मिळवू पाहातो. हाच मोह.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawroop chintan 113 trap
First published on: 10-06-2014 at 12:16 IST