नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू खरेच विमान अपघातात झाला?
लालबहादूर शास्त्री यांची विष देऊन हत्या करण्यात आली होती काय?
दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येत काही जनसंघी नेत्यांचा हात होता काय?
राजीव गांधी यांच्या हत्येमागे मोसाद होती काय?
होमी भाभा यांची हत्या सीआयएने केली काय?
आपल्याकडे पद्धत अशी आहे की, असे प्रश्न मोठय़ाने विचारायचे नसतात. त्यांची चर्चा खासगीत करायची असते. तरीही कोणी त्यांची जाहीर वाच्यता केलीच तर त्यास अशिष्ट म्हणायचे असते. कारण आपल्याकडे बहु-जनसंमत गोष्टींनाच सत्य मानून चालण्याची प्रथा आहे आणि त्यांना जर सत्तामान्यता असेल तर मग विचारायलाच नको! एकंदर बहुजनसंमत आणि सत्तामान्य हे आपण सत्याचे निकष मानून चालत आलेलो आहोत आणि ते न मानणाऱ्या अश्रद्धांना सिनिक, सणकी, मूर्ख असे म्हणत आलेलो आहोत. ‘षड्यंत्र सिद्धांत’पर लेखन आपल्याकडे अभावानेच पाहायला मिळते, याचे कारण आपल्या या वैचारिक परंपरेत आहे. मराठीत तर असे लिखाण जवळजवळ नाहीच. अपवाद एकच जगन फडणीस यांच्या ‘महात्म्याची अखेर’चा. भारतात अशी संशोधन वगरे करून लिहिलेली इंग्रजी पुस्तकेही दुर्मीळच आहेत. जी आहेत ती बहुतेक आत्मकथांच्या स्वरूपातली आहेत. यामुळेच अनुज धर यांचे ‘इंडियाज बिगेस्ट कव्हर-अप’ हे संशोधनपर पुस्तक लक्षणीय ठरते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ आणि त्यावर पांघरूण घालण्याचे आजवर झालेले सरकारी प्रयत्न हा या पुस्तकाचा विषय. तो तसा नवा नाही. गेली ६५ वष्रे तो सातत्याने चच्रेत आहे. त्यावर तीन सरकारी आयोग नेमण्यात आले. त्यातील पहिल्या दोन – खोसला आणि शाहनवाझ आयोगांनी नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच झाल्याचे निष्कर्ष काढून या विषयावर पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. परंतु नेताजी हे व्यक्तिमत्त्वच एवढे गूढाकर्षक आहे, की हा विषय संपवणे त्या आयोगांना शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर वाजपेयी सरकारच्या कारकीर्दीत, १९९९ मध्ये हे गूढ कायमचे निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मनोजकुमार मुखर्जी यांचा चौकशी आयोग नेमण्यात आला. पण त्यांनी नेताजींच्या मृत्यूचे गूढ आणखीच गडद केले. १७ ऑगस्ट १९४५ रोजी सायगाव येथे झालेल्या विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला, हे तद्दन खोटे असल्याचे मुखर्जी आयोगाने स्पष्ट केले.
आता प्रश्न असा येतो, की नेताजींचा अपघाती मृत्यू झाला नाही, तर मग त्यांचे काय झाले? ते – अनेकांच्या मतानुसार – रशियाला गेले की आणखी कुठे? मुखर्जी आयोग यावर मात्र गप्प आहे. पुराव्यांअभावी या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, असे आयोगाने म्हटले आहे. नेमक्या याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न अनुज धर यांनी केला आहे.
एखाद्या थरारक हेरकथेसारख्या, परंतु अत्यंत जबाबदारीने आणि संशोधनाची शिस्त (बऱ्यापकी) बाळगून लिहिलेल्या या पुस्तकात धर यांनी नेहरूंपासून वाजपेयी ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्वच सरकारांनी हा विषय दडपण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याविरोधातील नेताजीप्रेमींनी दिलेले लढे यांची कथा तपशिलाने सांगितली आहे. नेताजींच्या मृत्यूबाबतच्या षड्यंत्र सिद्धांतास कायमची तिलांजली देण्यासाठी इंटेलिजन्स ब्युरोच्या मदतीने उभ्या करण्यात आलेल्या शालमारी साधू नामक तोतयाची कहाणी हेही या पुस्तकातील एक रंजक प्रकरण आहे.
परंतु यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो फैजाबाद येथील भगवानजी ऊर्फ गुमनामी बाबा यांच्याविषयीचा. गुमनामी बाबा हेच नेताजी होते. १९८५च्या सप्टेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. ते नेहमी पडद्याआड असत. मात्र त्यांना ज्यांनी पाहिले, जे त्यांच्याशी बोलले (यात नेताजींच्या भावाची, सुरेश बोस यांची मुलगी ललिता बोस यांचाही समावेश आहे) त्यांच्या मते ते नेताजीच होते. लेखकाने याबाबतचे सर्व पुरावे, कागदपत्रे सादर करून गुमनामी बाबा हेच नेताजी असल्याचे मत व्यक्त केले आहे.
हे वाचल्यानंतर कुणालाही असे वाटेल, की हे काहीतरीच सनसनाटी वगरे आहे. पण या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे यात कोठेही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत नाही. जे काही आहे ते पुराव्यांनिशी मांडलेले आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय आपणांस गत्यंतर उरत नाही. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झालाच नाही, ते त्यानंतरही हयात होते, भारतात गुमनामी बाबा म्हणून वावरत होते असे सांगून याविषयीचे सर्व प्रश्न मिटवण्याचा यशस्वी प्रयत्न या पुस्तकाने केला आहे.
असे असले तरी मस्तकाला अक्षरश: झिणझिण्या आणणारे पुस्तक आहे. सगळेच काही आपण समजतो तितके साधे-सरळ नसते. आपण जे सत्य समजतो ते सत्य असतेच असे नाही. याचे साक्षात भान देणारे असे हे पुस्तक आहे. या उपरही त्यावर कोणी किती विश्वास ठेवायचा, हा मात्र ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.
इंडियाज बिगेस्ट कव्हर – अप :
अनुज धर,
वितस्त पब्लिशिंग, नवी दिल्ली,
पाने – ४४३, मूल्य – ६०० रुपये.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2013 रोजी प्रकाशित
एका गूढकथेचा पर्दाफाश
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू खरेच विमान अपघातात झाला? लालबहादूर शास्त्री यांची विष देऊन हत्या करण्यात आली होती काय? दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येत काही जनसंघी नेत्यांचा हात होता काय? राजीव गांधी यांच्या हत्येमागे मोसाद होती काय? होमी भाभा यांची हत्या सीआयएने केली काय?
First published on: 16-02-2013 at 12:45 IST
मराठीतील सर्व बुक - वर्म बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secret opened of one mysterious story