लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना, त्यांची मुले बसने शाळेत जायची. या गोष्टीचा त्या काळातही केवढा बोलबाला झाला होता. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने आपल्या मुलांना सरकारी मोटारीने शाळेत न पाठवण्याची ही गोष्ट जेव्हा सत्तेचा मद सार्वत्रिकरीत्या अनुभवायला मिळत नव्हता, तेव्हाही अप्रूपाची होती. जम्मू-काश्मीरमधील पोलीस उपमहानिरीक्षक शकील बेग यांनी मात्र आपल्या तरुण मुलाला आपल्या सत्तेची जी चव चाखवली आहे, ती कुणाच्याही डोक्यात तिडीक आणणारी आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी असल्याने सारे खाते आपले गुलाम आहे, असे या बेग महाशयांना वाटते. त्यांचे वर्तन तरी तसेच सांगते. टोनी बेग नावाच्या त्यांच्या उनाड मुलाने इन्स्टाग्राम या सार्वजनिक संकेतस्थळावर आपल्या मदांध वडिलांचे हे कर्तृत्व मोठय़ा गर्वानेच विविध छायाचित्रांद्वारे दाखवले आहे, त्यावरून या बेग यांना या वर्षी देण्यात आलेले राष्ट्रपती पदक काढून का घेण्यात येऊ नये, असा प्रश्न समाजातून विचारला जाऊ लागला आहे. सत्ता कुणालाही भ्रष्ट करते, हे वाक्य केवळ सुविचाराचे नसून तो आजवरच्या सार्वजनिक जीवनातील अशा सत्ताधाऱ्यांच्या वर्तनाचाच दाखला आहे, हे शकील बेग यांच्या छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसते. खात्यातील पोलीस हवालदार त्यांच्या बुटाची नाडी बांधतानाच्या छायाचित्राखाली, या चिरंजीवांनी लिहिलेली ओळ अशी की, ‘खरेखुरे राजे. त्यांनी स्वत: आपल्या बुटाची नाडी बांधल्यास आता पंधरा वर्षे होतील.’ अगदी अलीकडे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना मायावती यांच्या पायात एक वरिष्ठ अधिकारी जोडा सरकवत असतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अवतीभोवतीही अशा खुशमस्कऱ्यांची कशी गर्दी असायची. ही सारी उबग आणणारी स्थिती सत्तेचा मद चढलेल्यांमुळेच निर्माण होते, यावर जनसामान्यांचा विश्वासही बसतो. जम्मू-काश्मीरमधील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आपल्या सत्तेचा असा गैरवापर करू शकतो, याचे कारण सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा दशकांत असे अनेक पायंडे रुजवले आहेत. ज्या राज्याच्या एका माजी केंद्रीय मंत्र्याने अपहरण झालेल्या आपल्या कन्येची सुटका करण्यासाठी सरकारवर दबाव आणून अतिरेक्यांची सुटका करवली होती, त्या राज्यातील सरकारी अधिकारी अशांचेच अनुकरण करणार हे उघड आहे. अतिरेकी कारवायांनी पछाडलेल्या या राज्यातील पोलीस उपमहानिरीक्षकच जाहीरपणे आपल्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याच्या या उदाहरणावरून तेथील शासकीय यंत्रणा किती पिचलेली आहे, हे लक्षात येऊ शकते. आपल्या पिताश्रींच्या मोटारीला वाट करून देण्यासाठी सगळे पोलीस खाते कसे दक्ष असते, याचेच कौतुक ज्या मुलाला वाटते, त्याला शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या कर्तव्याची जाणीव असण्याचेही काही कारण नाही. असे वडील, हीच जर त्याची प्रेरणा असेल, तर मोठय़ा व्यक्तींच्या साध्या राहणीचे गुणगान करणारी पाठय़पुस्तके त्याला विनोदीच वाटणार. या मुलाला आपले वडील हे जगज्जेते अलेक्झांडर वाटत असतील एक वेळ; परंतु त्याच्या वडिलांनी त्याची कानउघाडणी तरी करायला हवी होती. महात्मा गांधींचा साधेपणा हा बावळटपणा ठरावा, असे हे कृत्य केवळ निषेधार्ह नाही, तर शिक्षेस पात्र असायला हवे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत अशा व्यक्तींना मानमरातब बहाल करण्याची पद्धत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने वाहतुकीचे नियम मोडले, म्हणून तिचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द होतो, याचे कौतुक करण्याची भारतीय मानसिकता आपलेच सत्ताधारी व नोकरशहा यांच्या मदांध वर्तनामुळेच वाढीस लागते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakeel baig pictures on social media
First published on: 30-10-2014 at 01:06 IST