साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देहावसान झाले होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत ‘बंद’ पुकारण्यात आला होता. त्याविरोधात पालघरच्या दोन मुलींनी फेसबुकवर आपली मते व्यक्त केली आणि जणू रानच पेटले. शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. पोलिसांनी त्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६-अ कलमाखाली अटक केली. ही बातमी बाचून दिल्लीतील श्रेया सिंघल ही महाविद्यालयीन तरुणी अस्वस्थ झाली होती. नुकतेच अण्णा हजारे यांचे आंदोलन झाले होते. दिल्लीतील तरुणाईच्या मनात अजूनही ती विरोधाची ज्योत तेवत होती. सत्तेचा गैरवापर, निरंकुशत्व प्राप्त करण्यासाठी चाललेली सत्ताधाऱ्यांची धडपड हे सगळे अनुभवलेली ही तरुणाई. समाजमाध्यम हे तिच्या हातातील लढय़ाचे हत्यार होते. तेच बोथट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे श्रेयाला जाणवत होते. तिच्या घरातील वातावरण तसे कायद्याचे. आई मनाली सिंग सर्वोच्च न्यायालयातील वकील आणि आजी म्हणजे न्या. सुजाता भंडारे. श्रेयादेखील, ब्रिस्टल विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन आल्यानंतर आता कायद्याचाच अभ्यास करीत होती. म्हणूनच ज्या कलमाद्वारे त्या दोन तरुणींना आणि त्यांच्यासारख्या अनेकांना गजांआड पाठविण्यात येत आहे ते घटनेच्या १४, १९ आणि २१ या कलमांना विसंगत आहे हे तिच्या लक्षात येत होते. या देशात कोणी सभ्य भाषेत आपली मते व्यक्त करू शकत नाही का, हा प्रश्न तिला सलत होता. याला विरोध करायलाच हवा, पण कसा? त्या रात्री जेवता जेवता तिने आपली सल आईजवळ व्यक्त केली. आईने न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आणि श्रेया ही या प्रकरणातील एक जनहित याचिकाकर्ती बनली.
सत्तेच्या मग्रुरीला हे आव्हान होते. श्रेयाने एक पाऊल उचलले होते. पण आता ती एकटी नव्हती. याच कलमाविरोधात याचिका दाखल होत होत्या. लोक एकत्र येत होते आणि सहकार्यही करत होते. तरी लढाई सोपी नव्हती. सत्ता आपली हत्यारे सहजी टाकत नसते. आधी काँग्रेस आणि नंतर भाजपच्या सरकारने या कलमाची कसून पाठराखण केली. पण अखेर विजय घटनेचा झाला. ही लढाई अर्थातच एकटय़ा श्रेयाची नव्हती की पालघरच्या त्या मुलींसाठीचीही नव्हती. ही इंटरनेट वापरू पाहणाऱ्या, काही बोलू पाहणाऱ्या प्रत्येक सुजाण नागरिकाची होती.
श्रेयाला स्वतला याची जाणीव आहे आणि म्हणूनच भविष्यातही याच संघर्षांच्या अग्निपथावरून चालण्याची प्रतिज्ञा ती करते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreya singhal
First published on: 26-03-2015 at 12:13 IST