scorecardresearch

२२३. ज्ञानचक्षु

‘मी’ संकुचित असताना, मोह आणि भ्रमापायी अनंत संकल्पांनी माझं मन झाकोळलं असताना व्यापक होणं आणि मन संकल्परहित होणं आणि त्याद्वारे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ची अनुभूती होणं शक्य तरी आहे का, असा प्रश्न आपल्या मनात सहज उत्पन्न होतो.

‘मी’ संकुचित असताना, मोह आणि भ्रमापायी अनंत संकल्पांनी माझं मन झाकोळलं असताना व्यापक होणं आणि मन संकल्परहित होणं आणि त्याद्वारे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ची अनुभूती होणं शक्य तरी आहे का, असा प्रश्न आपल्या मनात सहज उत्पन्न होतो. तू कसाही असलास तरी तुझ्यात पालट घडवून तुला त्या अनुभवापर्यंत पोहोचवायला सद्गुरू समर्थ आहेत, असं स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५२ ते ५४ या तीन ओव्या सांगतात. या ओव्या आणि त्यांचा ज्ञानेश्वरीतील अनुक्रम व प्रचलितार्थ असा :
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल। तैं मोहांधकारू जाईल। जैं गुरुकृपा होईल। पार्था गा ।। ५२।। (अ. ४ / १७१). जरी कल्मषाचा आगरू। तूं भ्रांतीचा सागरू। व्यामोहाचा डोंगरू। होऊनि अससी।। ५३।। (अ. ४ / १७२). तरी ज्ञानशक्तिचेनि पाडें। हें आघवें चि गा थोकडें। ऐसें सामथ्र्य असे चोखडें। ज्ञानीं इये।। ५४।। (अ.४/ १७३)
प्रचलितार्थ :  अरे पार्था, ज्या वेळी श्रीगुरूंची कृपा होईल त्या वेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्या त्या वेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल (५२). तू पापांचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा (मनातील घोटाळ्यांचा) डोंगर जरी असलास (५३) तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा, हे सगळे किरकोळ आहे, असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामथ्र्य आहे (५४).
विशेषार्थ  विवरण :  या ओव्यांचा प्रचलित अर्थ आणि विशेषार्थ वेगळा नाही, तरी थोडं विवरण आवश्यक आहे. तन, मन आणि जिवासकट जो सद्गुरूचरणी लीन आहे आणि अहंकाररहित होऊन त्यांच्या सेवेतही मग्न आहे त्याला सद्गुरूऐक्यता हवी आहे. त्याला हा बोध सुरू असताना आता संकुचित ‘मी’चा प्रश्न उरला कुठे, असं काहींना वाटेल. थोडा खोल विचार केला तर जाणवेल, हा ‘मी’ मरता मरत नाही! सद्गुरूंचा एकनिष्ठ भक्त ‘मी’ म्हणून तरी तो तग धरू पाहातो आणि एकदा हा ‘मी’ काही वाईट नाही, असं वाटलं तर मग ‘सद्गुरूंचा मीच काय तो एकमेव एकनिष्ठ भक्त’ अशा अहंकारात तो रूपांतरित होऊ लागतो! आता जिथे अन्य भक्तांमधलेही दोष दिसत असतात आणि आपणच एकमेव सद्गुरूशरण भक्त आहोत, असा भाव रूजत असतो तेव्हा ‘ते वेळी आपणपेयां सहितें। इये अशेषेंही भूतें। माझ्या स्वरूपीं अखंडितें। देखसी तूं।।’ असं सर्वत्र सद्गुरूदर्शन शक्य आहे का हो? मग अशाच तन-मन-जीव सद्गुरूचरणी अर्पित करूनही सात्त्विक ‘मी’ शिल्लक असलेल्या साधकाच्या मनात प्रामाणिक शंका येतेच की मी तर मोहानं भरलो आहे, माझ्या मनात उलटसुलट विचारांचा झंझावातही येतोच, मी पापाचे आगर आणि भ्रांतीचा सागर आहे, मग मला हे दिव्य ज्ञान  होणं शक्य आहे का? त्याला सद्गुरू सांगत आहेत की बाबा ज्ञानप्रकाशात पाहिलंस तरच मोहाचा अंधार सरेल आणि हे केवळ गुरुकृपेनंच सहजसाध्य आहे. तू कसाही का असेनास, गुरुकृपेनं जेव्हा तुझ्यात ज्ञानशक्ती निर्माण होईल तिचं असं अद्भुत सामथ्र्य आहे की तुझ्या अंतरंगातून ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरू लागेल! पुढची ओवी हेच सांगते.

मराठीतील सर्व विचारमंच ( Sampadkiya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या