स्वामी स्वरूपानंद यांनी १९३१मध्ये आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात धर्म, आचारधर्म आणि त्याचं समाजातलं दृश्यस्वरूप याबाबत बरीच मतं मांडली आहेत. ती आजही कालसंगत आहेत तसेच ‘अनुक्रमाधारे’ म्हणजे चातुर्वण्र्यानुसार, का नाही, यालाही पुष्टी देणारी आहेत. ती मते आता जाणून घेऊ. स्वामी लिहितात, ‘‘अब्रू आणि लौकिक यासंबंधीच्या बहुतेक सर्व लोकांच्या अगदी खुळ्या कल्पना असतात. चारचौघे वागतात त्याप्रमाणे वागणे, बोलतात त्याप्रमाणे बोलणे, जगतात त्याप्रमाणे जगणे, व्यवहार करतात त्याप्रमाणे व्यवहार करणे आणि देह ठेवतात त्याप्रमाणे देह ठेवणे, एवढीच ‘अब्रू सांभाळणे’ या शब्दांत सर्वसामान्य कल्पना असते. पण त्यांना हे समजू शकत नाही की आज आपल्याला जगात अब्रू नाही, मान नाही, लौकिक नाही, महत्त्व नाही. आम्ही आर्याचे वंशज. ब्राह्मण म्हटला तरी तो ‘तिन्हीं लोकीं श्रेष्ठ’. आमची संस्कृती उच्च दर्जाची, आमची वेदविद्या, आमची ब्रह्मविद्या, आमचे तत्त्वज्ञान, आमचा वेदान्त, आमचा हिंदुधर्म आणि आमची श्रुतिस्मृतीविहित अशी समाजरचना ही सर्व ईश्वरप्रणीत अत:एव सर्वोत्तम अशी शेखी आम्ही मिरवतो, पण जगात आम्ही कोणत्या अर्थानं ओळखले जातो? ब्राह्मण अंत्यजाला हीन म्हणून दूर लोटतो, त्याची सावलीही त्याला सहन होत नाही. त्याच ब्राह्मणाला अगर भटाला साहेब लोक (अर्थात ब्रिटिश, कारण तेव्हा देशात ब्रिटिश राजवट होती) गुलाम, काळा आदमी, अडाणीच समजतात. आपण सर्व नरकयातना भोगत असताही आम्ही हिंदू श्रेष्ठ, आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ अशी पोकळ प्रौढी मिरवणे व त्यातच आनंद मानणे ही किडय़ांचीच वृत्ती नव्हे काय? आमचा वेदान्त पुस्तकात-ग्रंथात राहिला आणि व्यवहारात आम्ही नादान बनलो. ‘हे विश्वची माझे घर’ अशा प्रकारची विश्वबंधुत्वाची घोषणा आमच्या संतांनी केली पण आमचे आचरण पाहावे तर एका घराचे तीन तुकडे करून आपण एका घरातच त्रलोक्य निर्माण केले आहे. किती विपरीत व्यवहार हा! धर्माचे संरक्षण करण्यासाठी सरसावलेले धर्ममरतड, धाबळीला धरणारे आणि जानव्याला जपणारे ब्रह्मोनारायण, व्यवहारात बेशरमपणे बिनदिक्कत एखाद्याची मान मुरगळतात, बेधडकपणे विश्वासघात करतात, पावलोपावली मिथ्या भाषण करतात, अंत्यजाला- माणसासारख्या माणसाला कुत्र्यामांजराहूनही तुच्छ लेखतात.. हाच धर्म असेल आणि असाच व्यवहार असेल तर त्या धर्माला आणि त्या व्यवहाराला दुरूनच नमस्कार असो. असला धर्म आणि असला व्यवहार करून लौकिक मिळविण्याची माझी इच्छा नाही! धर्म जर व्यवहारात आणावयाचा नाही तर काय तो दूर आकाशात ठेवून त्याच्याकडे वर डोळे करून पाहात बसायचे? आपली प्रत्येक कृती, प्रत्येक व्यवहार, आपला प्रत्येक आचार धर्माला अनुसरूनच झाला पाहिजे. धर्माची आणि व्यवहाराची फारकत करून कसे होणार? धर्माची प्रत्येक आज्ञा कृतीत उतरण्यासाठी मनुष्याने प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.’’ आता व्यवहारात आणला पाहिजे, असा खरा धर्म कोणता? याबाबत स्वामी काय म्हणतात ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop darshan
First published on: 20-05-2014 at 01:01 IST