आपण परमात्म्याचाच अंश आहोत, आपलं खरं स्वरूप नित्य, चैतन्य आहे. आपण हे ऐकतो, बोलतो, पण ते अनुभवसिद्ध मात्र नसतं. देहालाच आपण सर्वस्व मानतो. मग यावर उपाय काय? स्वामी स्वरूपानंद सांगतात की, ‘‘साधुसंत आत्मतत्त्वांत दंग असतात आणि आपण मात्र देहच मी असे मानून राहिलो आहोत. देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला। देहातीत ते हीत सांडीत गेला।।  देहच मी अशी आपली ठाम समजूत आहे. त्यामुळे देहातीत, देहाच्या पलीकडे जे स्व-हित, आत्महित आहे त्याला आपण पारखे झालो आहोत. आपण कोण, आपले मूळ स्वरूप काय, याची जाणीवच आपल्याला नाही. मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण?। असे देह मी, मन, बुद्धी वा प्राण, पहा निरखोन।। देह म्हणजे का मी? मन म्हणजे का मी? बुद्धी म्हणजे का मी? आपण म्हणतो, ही माझी छत्री आहे. छत्री हवी तेव्हा घेतो. नको तेव्हा दूर ठेवून देतो. माझा आंगरखा, असे म्हणतो. हवा तेव्हा वापरतो. नको तेव्हा दूर ठेवतो. त्याप्रमाणे माझा देह, माझे मन, माझी बुद्धी असं आपण म्हणतो. माझ्या मनात असं आलं, माझी बुद्धी काही चालत नाही.. हे माझी, माझी म्हणणारा हा कोण? जसं मी काही छत्री नव्हे, आंगरखा नव्हे. छत्रीहून, आंगरख्याहून मी निराळा आहे. तसा माझा देह, माझी बुद्धी, माझं मन असं म्हणणारा जो मी, तो मी देहाहून निराळा आहे, मनाहून निराळा आहे, बुद्धीहून निराळा आहे, हे आपलं स्व-रूप जाणलं पाहिजे. ओळखलं पाहिजे. देहाचे, मनाचे, बुद्धीचे सगळे व्यवहार, सगळे खेळ तटस्थपणे पाहता आले पाहिजेत. हे जे मी, मी असं स्फुरण होतं हे कुठून होतं, कसं होतं याचा शोध घेतला पाहिजे. या मीची ओळख व्हायची कशी? देहेबुद्धि ते आत्म-बुद्धी करावी। सदा संगती सज्जनांची धरावी।।  देहच मी असं आपण घोकत आलो आहोत, आत्माच मी, परमात्मा हेच माझं मूळचं रूप अशी घोकणी आता व्हायला पाहिजे. देहेबुद्धि ते आत्म-बुद्धी करावी। आत्माच मी, तो परमात्माच मी, स: अहं, स: अहं, सोऽहं, सोऽहम् असा सारखा ध्यास लागून राहिला पाहिजे. अंतरी संतत करी सोऽहं ध्यान। न जाई गुंतून संसारात।। सोऽहं सोऽहम् असं सारखं चिंतन असू दे. संसारात गुंतू नको म्हणजे झालं. धन, सुत, दारा असूं दे पसारा। धन आहे, बायकामुलं आहेत, संसार आहे, असेना का.. नको देऊ थारा आसक्तीते।। त्यात गुंतू नको म्हणजे झालं, त्याचं स्वरूप ओळख म्हणजे झालं. संसार त्याग न करितां। प्रपंच उपाधि न सांडितां। जनामाजीं सार्थकता। विचारेंचि होय।। तस्मात् विचार करावा। देव कोण तो ओळखावा। आपुला आपण शोध घ्यावा। अंतर्यामी।। अशा तऱ्हेने देहाचे, मनाचे, बुद्धीचे सर्व व्यवहार साक्षित्वाने पहायला शिका. न सोडी विवेक साक्षित्वाचा। कधी हानी होईल, कधी लाभ होईल, कधी सुख प्राप्त होईल, कधी दु:ख होईल. तरी, न सोडी विवेक साक्षित्वाचा! स्वामी म्हणे राहें देहीं उदासीन। पाहें रात्रंदिन आत्म रूप।। (तीन प्रवचने, १९६९). आता या बोधाचा थोडा विचार करू आणि त्याची जोडणी पुढील ओवीशीही कशी आहे, ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swarup chintan self understanding
First published on: 10-03-2014 at 12:10 IST