एका गजबजलेल्या गावात, चौकातल्या मोक्याच्या जागेवर एक माणूस खांद्यावरली पोतडी उघडतो आणि जाहिरातबाजी सुरू करतो. भराभरा माणसं गोळा होतात. रस्त्याकडेला गर्दीचं कोंडाळं तयार होतं आणि हा माणूस सोबतच्या तरुणाला नजरेनंच खुणावतो. तो तरुण गर्दीतच मिसळून उभा राहतो. मग पोतडीतली एक एक बाटली बाहेर येते. त्याची जाहिरात सुरू होते आणि गर्दीचे हात खिशात जातात. कुणी चिरतारुण्याचं औषध घेतो, कुणी शक्तिवर्धक चूर्णासाठी पैसे मोजतो. गर्दी आता पुरती कहय़ात असल्याचं जाणवताच, हा माणूस आपल्या पोतडीतून एक वस्तू बाहेर काढतो. ते एक दिव्य चूर्ण असते. मृत्युंजय चूर्ण.. ते सेवन केल्यास कधीच मृत्यू येत नाही असा त्याचा दावा असतो. हेच चूर्ण खात असल्याने तीन हजार र्वष उलटूनही आपण जिवंतच आहोत, असं तो सांगतो आणि भारावलेल्या गर्दीची बोटं तोंडात जातात. पण गर्दीतला एक जागरूक ग्राहक यावर विश्वास ठेवण्यास तयार नसतो. झपाटय़ानं तो या विक्रेत्याच्या तरुण सहकाऱ्यासमोर उभा राहतो आणि त्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्याला विचारतो, ‘‘खरंच, त्या माणसाचं वय तीन हजार वर्षांहून जास्त आहे?’’ त्या विक्रेत्याचा सहकारी चेहऱ्यावरची रेषदेखील न बदलता उत्तर देतो, ‘‘मला माहीत नाही. याच्याकडे नोकरीला लागून मला फक्त तीनशे र्वष झालीत..’’ ग्राहकाचा आनंद मावळतो, तो गर्दीतून निघून जातो. इकडे त्याच्या मृत्युंजय चूर्णाच्या बाटल्या हातोहात संपलेल्या असतात.. व्याधी, आजारपण, व्यंग, नैराश्य आदी असंख्य समस्यांनी ग्रासलेल्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हवा असतो. ते अधाशासारखे या मार्गाच्या शोधात असतात आणि अशा अवस्थेत असा कुणी भेटला की, फसवणुकीच्या जाळ्यात सापडतात. याच प्रकारात शोभणाऱ्या आणि इतक्याच फसव्या जाहिराती देऊन व्याधिग्रस्त, निराश लोकांना फसविण्याचे पेव सध्या फुटले आहे. लठ्ठपणा कमी करणे, वजन वाढविणे, टकलावर केस मिळविणे, हरवलेले तारुण्य पुन्हा मिळविणे, नितळ, गोरी कांती मिळवून देणे आदी असंख्य रामबाण उपाय केवळ आपल्याकडेच आहेत, असे भासवून ग्राहकांची फसवणूक करणारे विक्रेते आजकाल रस्त्याकडेला गर्दी जमवून धंदा करीत नाहीत. प्रसारमाध्यमांतून जाहिराती करून ते आपली विश्वासार्हता वाढविण्याचा प्रयत्न करतात आणि बिचारे ग्राहक त्या जाहिरातींना बळी पडतात. मग सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था होते. ग्राहकांना संरक्षण देणाऱ्या अन्न व औषध प्रशासन, पोलीस, ग्राहक पंचायती वा अन्य सरकारी यंत्रणांनी प्रसंगी अशा जाहिरातबाजीविरुद्ध कठोर पावले वेळीच उचलली, तर फसवणूक टळू शकते, पण अशा कारवाया वेळकाढू असतात. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात प्रसारमाध्यमांना अशा जाहिरातींविरुद्ध १२७६ नोटिसा पाठवल्या. त्यावर वृत्तपत्रांनी वा छापील माध्यमांनी अशा जाहिरातींना नोटिशीआधारे नकार देणे सुरू केले. परंतु चित्रवाणी वाहिन्यांवरची जाहिरातबाजी थांबणे हा काही उत्पादकांना पोटावर पाय वाटला. त्यांनी ‘वाहिन्या केवळ वेळ विकतात’ अशी कारणे देऊन न्यायालयाची स्थगितीही मिळवली होती. अखेर  ही स्थगिती उठली असल्याने अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी वाढणार आहे. संशयास्पद रामबाण औषधे बनवणाऱ्या कंपन्यांवर एकंदर १३८ एफआयआर गेल्या वर्षभरात दाखल असले, तरी तेवढय़ाने हे दुखणे थांबणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onऔषधेMedicine
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tele shopping advertisement of medicine on television
First published on: 22-05-2013 at 12:40 IST