स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणवून घेत भाजप स्वत:चीच पाठ का थोपटून घेत असे याचे उत्तर हळूहळू मिळू लागले आहे. पार्टी विथ डिफरन्स हे केवळ भाजपचेच लक्षण नसते. विरोधी पक्षात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांचे हे विशेषण असते. विरोधक हेच सत्तेवर असणाऱ्या पक्षाहून वेगळे असतात आणि जनतेच्या हिताची सर्वाधिक काळजी विरोधी पक्षांनाच असते, हे सत्य ज्यांना उमगले, त्यांना आता काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्षच ‘पार्टी विथ डिफरन्स’ वाटू लागतील यात शंका नाही. सत्तेवर असताना, एके काळी स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना ‘टगेगिरी’चा बेधडक संदेश देणारे अजितदादा पवार, भाजप हा ‘गुंडांचा पक्ष’ असल्याचा ठपका ठेवणारे नारायण राणे आणि सरकारवर नाकत्रेपणाचा आरोप करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणजे, ‘विरोधी पक्ष म्हणजेच खरा पार्टी विथ डिफरन्स असतो’, याचा पुरावाच आहे. तेव्हा भाजप हा विरोधी पक्ष होता, म्हणून पार्टी विथ डिफरन्स होता. आता ती मक्तेदारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आहे. विरोधी पक्षात बसण्याची सवय नसतानाही हे पक्ष ही नवी भूमिका चोखपणे बजावतात, हे कौतुकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या ताज्या भूमिकांकडे पाहिले की याचा साक्षात्कार होतो. ‘वाचाळवीर मंत्र्यांना आवरा’ असा सल्ला काल अजितदादांनी दिला, तेव्हा सत्तेवर असताना टगेगिरीचा मंत्र देणारे, वाचाळपणामुळे प्रायश्चित्त घेणारे अजितदादा अनेकांना आठवले असतील. भाजपवर ‘गुंडांचा पक्ष’ असा आरोप नारायण राणे यांनी केला, तेव्हा सत्तेवर असतानाचे आणि त्याआधीचेही राणेदेखील अनेकांना आठवले असतील आणि विरोधात असताना सत्ताधारी पक्षाची पिसे काढणारा भाजपही अनेकांना आठवला असेल. सत्ताधारी पक्ष कोणता आणि विरोधी पक्ष कोणता हे महत्त्वाचे नसते. सत्तारूढ पक्ष हा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हा विरोधी पक्ष असतो, हेच शाश्वत सत्य समजून घेतले पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे राजकीय विरोधक होते, तेव्हा ठाकरे यांनी शरद पवारांची जाहीरपणे उडविलेली खिल्लीही अनेकांना आठवत असेल. ‘शरद पवारांना मी आता तेल लावलेला पलवान असे म्हणणार नाही’ असे जाहीर करणारे बाळासाहेब आज हयात असते, तर त्यांना हेच विशेषण पुन्हा आठवले असते. निवडणुकीतील घोडेबाजार हा कालपर्यंत केवळ कुजबुजीचा विषय होता. त्यावर उघडपणे बोलणे हा विशेषाधिकार भंगाचा गुन्हा होऊ शकतो, असा त्याचा धसका होता. त्या घोडेबाजाराचे िबग जाहीरपणे फोडून अजितदादांनी या गुन्ह्य़ाचा धसका कमी केला, हे बरे झाले. ‘पूर्वी आमदार पन्नास लाखांत फुटायचा, आता तेवढय़ात नगरसेवकही फुटणार नाही’ या त्यांच्या विधानाकडे नीट पाहिले, तर योग्य तो गौप्यस्फोट होत असला, तरी त्यासाठी हक्कभंगाचे कलम शोधूनही सापडणार नाही. नुसते तेल लावून निसटता येत नाही. त्यासाठी अंगात कसबही असावे लागते, ते असे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Ajit pawar
First published on: 20-10-2016 at 03:16 IST