सकाळची रपेट आणि कवायतीचा सराव झाल्यावर हँडलर्सनी आपापल्या ताब्यातील श्वानांची पाठ थोपटली, त्यांना शाबासकी दिली आणि कान पाडून पुढचे पाय ताणत हँडलरसमोर नम्रपणे झुकून त्यांचे आभार मानत तमाम श्वानपथकाने शिस्तीत हिरवळीवर धाव घेतली. आता तासभर मनसोक्त हुंदडायचे होते. दररोजच्या कवायतीनंतर हा मोकळा वेळ मिळत असल्याने, एकूण एक श्वान इमानेइतबारे कवायत पार पाडत असे. कठोर कवायतीच्या काळात कुणी जमिनीत पेरून ठेवलेली स्फोटके अचूक हुडकून काढी, कुणी चोराचा पाठलाग करून त्याला जेरबंद करण्यासाठी धाव घेई, कुणी केवळ पहाऱ्याला.. ही कामे ठरल्याप्रमाणे पार पाडल्यावर आपण काहीच विशेष केले नाही अशा भाबडय़ा आविर्भावात सारे श्वान आपापल्या हँडलरशेजारी शिस्तीत उभे राहात, आणि शाबासकीची थाप पाठीवर पडली की झुकून आभार मानून हिरवळीकडे धाव घेत असत. आजही तसेच झाले. सारे श्वानपथक हिरवळीवर गेल्यानंतर मोकळे झाल्याच्या भावनेने सारे हँडलर्सही एकत्र गोळा झाले. काही वेळ कामाच्या, सुखदु:खाच्या गप्पा मारण्याचा त्यांचाही रोजचा शिरस्ता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण आज सगळ्यांच्याच चेहऱ्यावर काळजीची रेषा उमटली होती. काही वेळ कुणीच काही बोलले नाही, तरीही एकमेकांच्या मनात काय चालले आहे, ते प्रत्येकासच माहीत होते. आता आपापल्या श्वानाची दर महिन्याला परीक्षा होणार, त्याची कामगिरी तपासली जाणार आणि त्यानुसार त्याची गुणवत्ता ठरवून त्याचा अहवाल थेट पथकप्रमुखाला पाठविला जाणार या बातमीमुळे सारे धास्तावले होते. परीक्षा श्वानाची असली, तरी ती आपल्या कामगिरीचीच आहे हे प्रत्येकास माहीत होते. आपापल्या ताब्यातील श्वानामधील कमतरता हुडकून काढणे, त्या दूर करणे, त्यांचा सराव वाढविणे आणि कठोर शिस्त शिकविण्याचे काम अधिक कठोरपणे केले नाही, तर श्वानासोबत आपलाही ‘सीआर’ खराब होणार आणि आपल्या कामगिरीची नोंद करणाऱ्या फाइलवरही ‘लाल शेरा’ पडणार या काळजीची काजळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. आज हास्यविनोदाचे फवारे उडालेच नाहीत. तिकडे हिरवळीवर बागडणाऱ्या साऱ्या श्वानांनी हँडसर्लचा हा मूड ओळखला. प्रशिक्षणामुळे माणसाचे मानसशास्त्रही त्यांना चांगलेच माहीत झालेले होते. ‘आज काही तरी बिनसलंय’ हे त्यांनी ओळखल्यासारखे, बागडणे थांबवून सारे जण हँडलर्सच्या दिशेने पाहात हिरवळीवर रांगेत बसून राहिले. आता अधिक कठोर सराव करावा लागणार हे जणू त्यांनी हँडलर्सच्या चेहऱ्यावरील चिंतावाचूनच ओळखले होते.

शाळकरी मुलांच्या परीक्षेचा तणाव त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर उमटतो, तेच चित्र हिरवळीवर पसरले होते. कामगिरीचे मूल्यमापन म्हणजे काय, हे त्या श्वानांना माहीत नसले तरी आजचा दिवस काही तरी वेगळा आहे, हे मात्र त्यााा जाणवले होते. कदाचित पुढचा प्रत्येक दिवस वेगळा असेल, हे त्या प्रशिक्षित श्वानांनी ओळखले आणि सारे जण शिस्तीत आपापल्या हँडलरसमोर उभे राहिले. त्यांच्या पायाशी झुकून त्यांनी हँडलर्सकडे आश्वासक नजरेने पाहिले. श्वानांची ती मूक भाषा नेमकी ओळखता येत असल्याने हँडलर्सच्या चेहऱ्यावरील काळजी कुठल्या कुठे पळाली. आपापल्या श्वानाच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांनी इशारा केला आणि नव्या जोमाने नवी कवायत सुरू झाली!

Web Title: Article ultha chasma akp 94
First published on: 28-02-2020 at 00:03 IST