‘अयोध्या प्रकरणात सुनावणी घेणाऱ्या कोर्टाला नेमकं काय म्हणायचंय?’ वर्तमानपत्राची सुरनळी नेनेंच्या समोर उघडत लेलेंनी काहीशा रागानेच विचारले आणि नेने गालात हसले. अख्खी सुपारी अडकित्त्यात पकडून काडकन् फोडत एक भलेमोठे खांड तोंडात टाकून नेनेंनी लेलेंकडे पाहिले. ‘मला पण तीच शंका आहे..’ तोंडातल्या तोंडात सुपारी फिरवत नेने म्हणाले. बऱ्याच दिवसांत नेने आणि लेलेंची चर्चा अनुभवण्याची संधीच मिळाली नसल्याने, नेनेवहिनीही पदराला हात पुसत बाहेर आल्या. रामजन्मभूमीचा वाद तिकडे अयोध्येत पेटला असतानाच, राजस्थानात रामाच्या वंशजांचा वाद उफाळतोय, हे काल रात्री जेवताना नेने म्हणालेच होते. त्यांनाही आता या वादाबद्दल उत्सुकता वाटत होती. ‘आम्ही रामपुत्र लवाचे वंशज आहोत,’ असे ‘करणी सेने’ने केव्हाच जाहीर करून टाकले होते, तर ‘आपले घराणे कुशाचे वंशज आहे,’ असे भाजपच्या खासदार दियाकुमारी यांनी जाहीर करून टाकले होते. त्याचे कागदोपत्री पुरावेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितल्याने, नेनेवहिनींना तर अस्मान ठेंगणे वाटू लागले होते. पुढच्या वर्षी रामनवमीला नाशकात न जाता राजस्थानातच जावे, म्हणजे रामाच्या थेट वंशजांचे दर्शन होईल आणि तिकडचे गुलाबी राजवाडेही पाहता येतील, असा विचार कालच त्यांच्या मनात येऊन गेला होता. आता नेने आणि लेले कोणती नवी माहिती देतात, याकडे त्यांचे कान लागले. ‘नेने, मला वेगळीच भीती वाटतेय,’ वर्तमानपत्र पुन्हा गुंडाळत लेले म्हणाले, ‘अहो, तिकडे रामजन्मभूमीच्या मालकीवरून अगोदरच वाद सुरू आहे. त्यात आता नवे वंशज पुढे आले, तर तेही मालकी हक्काचा दावा ठोकतील की हो..’ खदाखदा हसत लेलेंनी टाळीसाठी हात पुढे केला; आणि लेलेंच्या हातावर जोरदार टाळी देऊन मनगटाने ओठ पुसून दुसरे वर्तमानपत्र उघडत नेने म्हणाले, ‘लेले, आणखी नवे वंशजही आता पुढे येतायत.. आम्ही कुशाचे वंशज आहोत, असे मेवाडच्या राजघराण्यातील राजपुत्राचे म्हणणे आहे. हे बघा!’ आता नेने आणि लेलेंची चर्चा रंगणार हे ओळखून नेनेवहिनींनी पटकन स्वयंपाकघरात जाऊन गॅसवर चहाचे आधण टाकले आणि त्या पुन्हा दरवाज्यात उभ्या राहिल्या. ‘इतकेच नव्हे, राजस्थानातील काँग्रेसचे एक प्रवक्ते, सत्येंद्रसिंह राघव का कोण, तेही रामाचे वंशज आहेत म्हणे.. त्यांनी तर थेट वाल्मीकी रामायणातल्या सतराशे साठाव्या पानावरचा श्लोकच पुरावा म्हणून पुढे आणलाय..’ लेलेंनी आणखी नवी माहिती दिली आणि नेनेवहिनींचे डोळे विस्फारले. राजस्थानात रामाचे एवढे सारे वंशज असताना, आपण मात्र नाशकातल्या काळ्यारामाच्या मूर्तीची पूजा करत राहिलो, असे वाटून त्या खंतावल्या; पण आपले चुकतेय असे वाटून नाशिकच्या दिशेने मान वळवून मनातल्या मनात नमस्कार करत्या झाल्या. आता काही तरी बोलले पाहिजे, असे त्यांनाही वाटू लागले. ‘पण काय हो लेले, मी म्हणते, वंशज सगळीकडे भरपूर असतील, पण रामाचे वारस कुठे आहेत?.. राम हा आदर्श राजा होता ना? मग त्याचा ‘वारसा’ सांगणारं कुणी पुढे येतंय का?’ काहीसे अडखळतच नेनेवहिनींनी प्रश्न केला आणि चहाचा कप धरलेला नेनेंचा हात जागीच थबकला.. ‘बघितलंत लेले?.. न्यायालयास ‘वंशज’ नव्हे, ‘वारस’ कोण, असंच विचारायचं असणार!.. तरी मला वाटलंच होतं. आता ‘वारसा’ सांगणारं कुणी पुढं येतं का पाहू या!’ नेने म्हणाले आणि नेनेंच्या नकळत लेलेंनी खिशातला ‘कमळा’चा बिल्ला चाचपला..