मराठी भाषा दिन साजरा होता होता एरवी आपल्या भाषाभगिनींची आठवण कुणाला होण्याचे कारण नाही. परंतु हल्ली आपण कोणत्याही एका भाषेचे राहिलेलो नाही, हेच खरे. वृत्तपत्रे भाषेची बंधने सहसा पाळतात, पण समाजमाध्यमांमध्ये कोणत्याही भाषेतील नोंदी खपून जातात. बरे, नोंद मराठी आणि त्यासोबतची लघु-चित्रफीत अथवा ‘क्लिप’ भलत्याच भाषेतील, असेही समाजमाध्यमांत चालून जाते. हे ‘खपून जाणे’, ‘चालणे’ ही बदलत्या काळानुसार झालेली प्रक्रिया होय.  आपल्या अनेक भाषाभगिनींपैकी एक जी कन्नड, त्या भाषेतील एक क्लिप नेमकी मराठी भाषा दिनी ‘व्हायरल’ झाली. इतकी की, वृत्तपत्रांनाही या कन्नड क्लिपमधील घडामोडीची दखल घ्यावी लागली. कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद तीनदा भूषविलेले आणि रा. स्व. संघाच्या संस्कारांत वाढलेले कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या विधानाची ती क्लिप होती. ‘आदल्या ४० वर्षांत जे झाले नाही, ते पंतप्रधान मोदी यांनी करून दाखविले. आता कर्नाटकात लोकसभेच्या २२ जागा भाजपला मिळू शकतात’ अशी वाक्ये येडियुरप्पा कन्नडमध्ये उच्चारत असल्याची ही चित्रफीत. त्यातील ‘नालवत्तु’ म्हणजे कन्नडमध्ये ४० आणि ‘इप्पतयेरडु’ म्हणजे २२.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या क्लिपचे- आणि त्यामधील आकडय़ांचे- निमित्त करून, समाजमाध्यमांवरील जल्पकांनी येडियुरप्पा आणि त्यांचा पक्ष या दोहोंवर टीका सुरू केली. जणू येडियुरप्पा एकटेच राजकारणाबद्दल बोलत होते. नाजूक प्रसंगांमध्ये ‘राजकारण करू नका’ असे म्हणणे हासुद्धा राजकीय डावपेच असतो, तो फासा आता भाजपविरोधकांच्या हाती लागला. त्यावर ‘आमच्या राज्यात भाजप २२ जागा मिळवणार हे तर मी दोन-तीन महिन्यांपूर्वीपासून बोलतो आहे’ असा खुलासाही येडियुरप्पांनी केला, पण तो कुणीच ऐकला नाही.. भाजपमधील अन्य कुणाहीपेक्षा अधिक राजकारण केले ते फक्त येडियुरप्पांनीच, हा समज कायम राहिला.

येडियुरप्पा जेव्हा जेव्हा १० च्या पुढील आकडय़ांचे- दोन अंकी संख्यांचे- गणित मांडतात, तेव्हा तेव्हा हे असेच होते. सुमारे दशकभरापूर्वी, २००७ च्या ऑक्टोबरात तेव्हाच्या मित्रपक्षाचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपद निम्मा-निम्मा काळ वाटून घेण्यास ऐनवेळी नकार दिला, तेव्हा येडियुरप्पा यांना राज्यातील सत्तेसाठी ३३ जागा कमी पडत होत्या. या मूहत्तमूरु- म्हणजे ३३- जागांपायी विनाकारण कुमारस्वामी यांच्याशीच पुन्हा जुळवून घ्यावे लागले आणि कुमारस्वामींनी पुन्हा ऐन विश्वासदर्शक ठरावावेळी तोंडघशी पाडले. पुढे २००८ मध्ये दहापेक्षा कमी, तीनचारच आमदार जमवावे लागले. ते येडियुरप्पांनी लीलया जमवले.  पुन्हा २०१८ च्या निवडणुकीत नऊच जागा कमी पडत असताना त्यांनी मुख्यमंत्री होऊन पाहिले. ते टिकले नाही म्हणून पुन्हा नऊ नव्हे तर दहाच्या वर- ११ म्हणजे कन्नडमध्ये हज्ञोन्दु आमदारांशी दोनतीन महिन्यांपूर्वीच येडियुरप्पांच्या गोटाने ‘संपर्क’ केला, ते कार्यही सिद्धीस गेलेले नाही. दहा म्हणजे कन्नडमध्ये हत्तू. या हत्तूच्या वरचे राजकीय हिशेब येडियुरप्पांनी केंद्रीय नेतृत्वाकडे किंवा अनंतकुमार आदी केंद्रीय नेतृत्वाच्या प्रतिनिधींकडे सोपविल्यास भाजपची वाटचाल सुकर होऊ शकते.

Web Title: Bs yeddyurappa says air strike will help bjp win 22 seats in karnataka
First published on: 01-03-2019 at 01:28 IST