‘ग्लोबल’गाव!

मी तुम्हाला लोकलचे ग्लोबल कसे झालो ते थोडक्यात सांगतो.

‘नमस्ते, हॅल्लो, मी सरपंच अजाबराव पाटील, कांद्री खुर्द या आमच्या गावाच्या वतीने पाहणीसाठी आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या चमूचे स्वागत करतो. आमच्या लाडक्या विश्वगुरूंनी ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून आमची निवड के ल्याची बातमी आम्ही मोबाइलवरच्या पेपरात वाचली. कारण आमच्या गावात पेपर येत नाही. आता मी तुम्हाला लोकलचे ग्लोबल कसे झालो ते थोडक्यात सांगतो. आमच्या गावात दोन हापशी आहेत. त्यातून येणारे फ्लोराइडयुक्त पाणी शुद्ध करायला गावातल्या पोरांनी गूगलवर शोधाशोध के ली तेव्हा युगांडात त्यांना औषध सापडले. ते बोलावताच लोकांची हाडे ठिसूळ होणे थांबले. दात अजूनही पिवळे पडतात; पण त्याने आमच्या आरोग्यावर काही फरक पडत नाही. ते घासण्यासाठी आम्ही कडुलिंबाची काडी वापरतो. सध्याच्या काळात सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची. त्यात गावातील शौचालयांची संख्या के वळ दहा. मग पोरांनी सर्वांना समान संधी या तत्त्वावर एक अ‍ॅप तयार के ले. त्यानुसार दिवसभरात प्रत्येकाचा नंबर लावला जातो. यात भांडण होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. त्यामुळे पांदण रस्ते आपसूकच स्वच्छ झाले. हे आमचे ‘वेलनेस सेंटर’. म्हणजे पूर्वीचे आरोग्य केंद्र. येथील झाडेझुडपे बघून बिचकण्याचे काही कारण नाही. या केंद्रात एक परिचारिका कधीमधी असते. करोनापासून तिची ड्युटी शहरात लागली आहे. त्यामुळे येथील सामानाच्या देखरेखीसाठी आम्ही दोन कु त्रे ठेवले आहेत. आपण जवळ गेलो तर ते भुंकतील म्हणून दुरूनच हे केंद्र पाहून घ्या. आता आपण आमराई रुग्णालयाकडे जाऊ. गावाच्या बाहेर असलेल्या या गर्द आंब्याच्या बनात आम्ही साठ खाटा ठेवल्या आहेत. बघा, प्रत्येक खाटेवर एक सलाइनची पिशवी झाडाला टांगली आहे. गावात करोनाचा शिरकाव होताच पोरांनी जगभरातील परिचारकांशी संवाद साधून औषधे कशी घ्यायची, सलाइन कसे लावावे, सारे शिकून घेतले. मी स्वत: तालुक्याला बैलगाडीने जाऊन आरोग्य अधिकाऱ्याला मिनतवारी करून सलाइनचे खोके  घेऊन आलो. त्यामुळे वेळीच उपचार सुरू झाले. आता मृत्यूचे म्हणाल तर आमच्याकडे पटकी, डायरियाने लोक मरतातच की. त्यामुळे या वेळच्या आकड्याचे फार काही वाटले नाही. भरला पंचविसेक. पोरे म्हणाली, एवढ्या कलेवरांना जाळले तर लाकूडफाटा संपेल. प्रदूषण वाढेल. त्यातल्या काहींनी जागतिक प्रदूषणाचे दाखले दिले. म्हणून मग साऱ्यांना गावाशेजारच्या नदीत सोडून दिले. यावर काहींनी टीका केली तर धर्मपंडितांनी मात्र स्वागत के ले. आमराईत शुद्ध हवा सातत्याने मिळत असल्याने प्राणवायूची आम्हाला गरजच पडली नाही. पोरांनी गूगलवरून उत्तर आफ्रि का खंडातील काही देशांतील नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती घेऊन त्याच्याशी साधम्र्य असलेली जडीबुटी इथे शोधली व रुग्णांना दिली. त्याचा फायदा किती झाला हे विचारू नका, पण आहे त्या परिस्थितीत जगाशी संपर्क साधत आम्ही प्रत्येकाला उपचाराचे समाधान देऊ शकलो एवढे नक्की. यामुळे आम्हाला ग्लोबलसोबतच आत्मनिर्भर झाल्यासारखे आता वाटू लागले आहे. आता बक्षिसापोटी मिळणाऱ्या रकमेतून आम्ही पंचायतीत नादुरुस्त असलेला संगणक आधी ठीक करणार आहोत.’

सरपंचाशी बोलून खडकाळ रस्त्यावरून परतणाऱ्या संघटनेच्या चमूला, ‘भारतात ग्लोबल काय नि लोकल काय’ हाच प्रश्न पडल्याचे साऱ्यांच्या चेहऱ्यांवर वाचता येत होते!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Global village akp

ताज्या बातम्या