‘महाराजांचा विजय असो’ या घोषणांच्या निनादात महाराजांचे दरबारात आगमन झाले. सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करून स्थानापन्न होताच त्यांनी अपेक्षेप्रमाणे प्रधानांकडे नजर वळवली. तसे प्रधान लगबगीने उठले. ‘महाराज, आपल्या दूरदृष्टीचे राज्यभरात स्वागत होतेय. किराणा दुकान, बेकरी व शिधावाटप केंद्रातून जनतेला मुबलक प्रमाणात मिळू लागल्याने वाईनच्या खपात ३०० टक्क्यांनी वाढ झालीय. शिवाय द्राक्ष उत्पादकांनी अन्य पिकांसाठी ठेवलेली जमीन नव्या मळ्यासाठी वापरण्याची तयारी सुरू केलीय. संत्री उत्पादकसुद्धा वाईन तयार करण्याच्या प्रयोगात गुंतले आहेत. ऑनलाइन विक्रीमुळे अडचणीत आलेले किराणा दुकानदार एकदम खूश आहेत. रिकाम्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने भंगारविक्रीचा व्यवसाय तेजीत आला आहे. त्यांमुळे दहा हजार तरुणांना रोजगार मिळालाय. रेशनवर वाईनचा दर थोडा कमी केल्याने या तीन महिन्यांत नव्या कार्डासाठी एक लाख अर्ज दरबारी प्राप्त झालेत. वाईन व शीतपेयांच्या दरात फार फरक न ठेवल्याने विदेशी पेयांचा खप कमी झालाय. शिवाय पाण्याऐवजी लोक वाईनला प्राधान्य देऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर थोडा कमी झालाय. वाईनचा खप वाढण्यासाठी काही दुकानदारांनी ‘हजाराच्या खरेदीवर दोन बाटल्या मोफत’ अशा योजना सुरू केल्याने राज्याच्या विक्रीदरात व  महसुलात वाढ झालीय. काहींनी कुपन्स व लॉटरीसारख्या योजना ग्राहकांसाठी आणल्यात. करोनामुळे थंडावलेल्या माल वाहतुकीच्या व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली आहे. आधी राज्यात छोट्या छोट्या मागण्यांवरून मोर्चे निघायचे. आता वाईनच्या नशेत असणाऱ्यांची संख्या वाढल्याने हे प्रमाणसुद्धा फारच कमी झाले. त्यामुळे ऊठसूट विरोध करणाऱ्यांना शुद्धीतले कार्यकर्ते किंवा भाड्याची माणसे मिळत नसल्याने चांगलाच फटका बसलाय. वाईन प्राशन करून चौकाचौकात गप्पा मारणारे लोक ‘राजा की जय हो’ असे नारे अधूनमधून देताहेत. एकूणच जनता सुखी, समाधानी व आनंदात असल्याचे चित्र आहे.’ हे ऐकून महाराज सुखावले. काही क्षण शांततेत गेल्यावर प्रधानांना म्हणाले, ‘ही झाली चांगली बाजू, पण या निर्णयामुळे काही वाईटही घडत असेल ना. तेही सांगा.’ हे ऐकताच मग प्रधान हळू आवाजात सांगायला लागले, ‘महाराज, या निर्णयामुळे शेतातील भाजी विकणारे संतापलेत. आम्हालाही भाजीसोबत वाईनविक्रीची परवानगी द्या असे त्यांचे म्हणणे आहे. विदेशी व देशी दारूचा खप एकदम कमी झाल्याने परवानाधारकांनी आमच्या धंद्याचे काय अशी विचारणा सुरू केलीय. काही संस्कृतीरक्षक ग्राहकांनी वाईन ठेवणाऱ्या किराणा दुकानांवर बहिष्कार घातलाय. आमच्यासाठी वाईनमुक्त दुकानांची सोय करा अशी त्यांची मागणी आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूरही दुपारी जेवणासोबत वाईनची बाटली रिचवू लागल्याने मजुरी देऊनही दुपारनंतर कामे होत नाहीत अशा तक्रारी वाढल्यात. वाईन विकणाऱ्या किराणा दुकानदारांनी देशी व विदेशी दारूही विकू द्या अशी मागणी केलीय. काहींनी तर लपूनछपून विक्रीही सुरू केल्याचे गुप्तहेरांचे म्हणणे आहे. शिधावाटप केंद्रातून वाईनची अवैध विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात आणि सतत भरपूर वाईन प्राशन केलेल्यांकडून वाटेल तिथे लघुशंका करणाऱ्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालीय. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आलीय.’ हे ऐकताच महाराजांनी बांधकाममंत्र्यांना आदेश दिला ‘स्वच्छतागृहांची संख्या  वाढवा.’

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर