scorecardresearch

बिनपाण्याने..

तोंड बंद ठेवण्याच्या शिक्षेविषयी तर काही विचारूच नका.

बिनपाण्याने..
संग्रहित छायाचित्र

 

गेले तीन महिने फार कष्टात गेले राव! धारदार कैची व तेवढाच धारदार वस्तरा चालवण्याची सवय असलेले हात झोपेतही तांडवनृत्य करायला लागायचे. घरासमोरून केस-दाढी वाढलेला इसम जाताना दिसला की हात शिवशिवायचे. तोंड बंद ठेवण्याच्या शिक्षेविषयी तर काही विचारूच नका. ती व्यवसायबंदीपेक्षा अधिक वाईट. तसा आमचा हा व्यवसाय पुरातन. त्याचे संदर्भ ग्रीक इतिहासात सापडतात असे ऐकलेले. आम्ही साऱ्या गावाची खबर ठेवतो म्हणून आद्य पत्रकार अशी पदवीही समाजाने सहजगत्या बहाल केलेली. तरीही या काळात आम्हावर बंदी व पोटभरू पत्रकारांना मात्र मुभा! हे कसे, या प्रश्नाने खूप छळले. अलीकडच्या काळात एक प्रश्न सारखा पडतो. हे नव्याने येणारे आजार आमच्याच मुळावर का उठतात? आधी एड्स आला. त्याचा संसर्ग आमच्या व्यवसायातून होतो अशी आवई उठवली गेली अन् काही काळ धंदाच बसला. मग आम्ही ग्राहकागणिक ब्लेड बदलणे सुरू केले. सारी साधने स्वच्छ करण्याची प्रथा तेव्हापासूनच पडलेली. त्यातून बाहेर येत नाही तर या करोनाने ग्रासले. आमच्यातल्या काहींनी प्राणाची आहुती दिल्यावर सरकारला जाग आली व व्यवसाय प्रारंभाची संधी मिळाली पण ती अर्धवटच. अंगात किट घाला, तोंडाला पट्टी बांधा. आता अशा अवस्थेत ग्राहकांशी बोलायचे तरी कसे? न बोलता केलेल्या कटिंगचे ग्राहकाला तरी समाधान मिळते का? पाच रुपये कमी मिळाले तरी चालतील पण बोलू द्या हो! म्हणे कटिंग करा पण दाढी नाही. कारण त्यात वस्तरा वापरला जातो म्हणून. कटिंगसाठी तो वापरला जात नाही हे सरकारला कुणी सांगितले? कानावर वस्तरा लागतोच. आम्ही आजवर हा व्यवसाय अतिशय प्रतिष्ठेने केला. पण आता ग्राहकाच्या दाढीसाठी सरकारची दाढी धरावी लागेल असे दिसते. केसांच्या वजनामुळे सामान्यांच्या शिरावरचा भार हलका करून देणे हे खरे तर पुण्यकर्मच. ही कृती केल्यावर आम्हाला जे कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळते ते शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. दाढी कटिंगनंतर स्वत:ला हलके वाटू लागणारा ग्राहकसुद्धा आमच्याकडे ज्या तृप्त नजरेने बघतो त्याचे मोल पैशात होऊ शकत नाही. बंदीकाळात चोरून लपून सारे काही सुरू होते. अपवाद फक्त आमचा. इतिहास चाळून बघा..  कर्तनाचे कर्तव्य बजावताना आम्ही कधीही भेदाभेद केला नाही. आमच्यासमोर येणारे डोके कुणाचेही असो ते सारखेच, याच उदात्त भावनेने आम्ही आजवर केसांमध्ये हात घातला. या काळात मात्र हा भेदाभेद नाइलाजाने सहन करावा लागला, तोही व्यवस्थेला दुय्यम समजणाऱ्या वजनदारांनी आम्हाला बोलावणे सुरूच ठेवले म्हणून!  एवढी सारी वैशिष्टय़े जोपासूनसुद्धा आमचा विचार शेवटी झाला. किमान आता तरी रोज वाढणाऱ्या करोनासाठी आम्हाला जबाबदार धरू नका. आमच्या मेहनतीवर संसर्गाचे पाणी फिरवू नका. याशिवाय आम्ही काय बोलू शकतो? आम्ही नाही तर इतरांनी ‘बिनपाण्याने हजामत’ हा शब्द रूढ केला. आम्ही कधी असल्या शब्दच्छलाच्या भानगडीत पडलो नाही.. पण या ९० दिवसांत आमचीच ‘बिनपाण्याने हजामत’ झाली जणू!

मराठीतील सर्व उलटा चष्मा ( Ulata-chashma ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या