आपला संघ संकटात असताना, जायबंदी असूनही दुखापतीची पर्वा न करता मैदानात उतरणारे लढवय्ये काय क्रिकेटमध्ये कमी दिसून आलेत? माल्कम मार्शल आठवा.. एक हात प्लास्टरमध्ये असूनही खेळायला उतरला. रिचर्ड हॅडली आठवा.. अंगात ताप असूनही आपल्याकडे एका सामन्यात शेवटचा फलंदाजीसाठी उतरलाच. ग्रॅमी स्मिथ आठवा.. त्याचाही हात जायबंदी, तरी ऑस्ट्रेलियन तोफखान्यासमोर ऑस्ट्रेलियातच उतरला होता. आणि आमचा अनिल कुंबळे? आठवतो त्याचा तो बॅण्डेजमध्ये गुंडाळलेला चेहरा? जबडा सांधूनही गोलंदाजी करत होता. कोणाविरुद्ध? वेस्ट इंडिजविरुद्ध. तेही त्यांच्याच रणभूमीत. तेव्हा अशा लढवय्या क्रिकेटपटूंची देदीप्यमान परंपरा आम्हाला लाभलेली असताना, शतकवीरांप्रमाणे, विकेटवीरांप्रमाणे या मांदियाळीतही आपले नाव समाविष्ट व्हावेसे एखाद्याला वाटले तर त्यात इतका संशय येण्यासारखे किंवा थट्टा करण्यासारखे काय म्हणतो आम्ही?

आता आमच्या रोहित शर्माचेच उदाहरण घ्या. टाळेबंदीकाळात व्यायाम करायला मिळाला नाही हा काय त्याचा दोष? उगीच त्याच्या (वाढीव) क्षेत्रफळाविषयी चर्चा झाली. तरीदेखील घरगुती जोर-बैठकांच्या चित्रफिती तो आवर्जून प्रसृत करत होताच. निष्कारण संशय नको म्हणून. आणि अतिरिक्त क्षेत्रफळ नि घनफळ विराट कोहली वगळता साऱ्यांचेच – अगदी महेंद्रसिंग धोनीचेही – वाढलेले होतेच ना! अशा आमच्या रोहितची मैदानावरील कामगिरी काय जबरदस्त झाली. मुंबई इंडियन्सचा संघ सगळ्यांच्या आधीच सुपर फायनल की काय ती – की क्वालिफायर? एलिमिनेटर, फायनल, सेमीफायनल?.. जाऊंदे झालं – तिथपर्यंत जाऊन पोहोचलाच. त्याच्या डाव्या पायाची शीर दुखावली.. किंवा उजव्या पायाचा अस्थिरज्जू दुखावला.. (यासंबंधी खात्रीलायक माहिती लवकरच उपलब्ध होईल) ते जे काय दुखावलं, त्याचा इतका बोभाटा होण्याचं कारण काय? २५ तारखेला रोहित जायबंदी झाल्याचं कळालं आणि आमच्या क्रिकेट मंडळानं त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी संघनिवड जाहीरही करून टाकली. त्यात आमच्या रोहितला कुठेच स्थान नाही, याला काय म्हणावं?

नक्कीच यामागे आणखी एका मुंबईकर क्रिकेटपटूला संधी डावलण्याचं कारस्थान असलं पाहिजे, हे आमच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ते बहुधा रोहितच्या आणि मुंबई इंडियन्सच्याही लक्षात आलं असावंच. कारण रोहित सहजपणे नेटमध्ये सराव करत असल्याची चित्रफीत आमच्या फ्रँचायझीवाल्यांनी लगोलग समाजमाध्यमांवर प्रसृत केली. समाजमाध्यमांवर बोर्डानं संघ जाहीर केला होता, त्याला हे सणसणीत प्रत्युत्तर. पण.. त्याचाही परिणाम झाला नाही. साधा खुलासाही झाला नाही बोर्डाकडून. उलट रवी शास्त्री, सौरव गांगुली ही मंडळी त्याला पोक्त सल्ले देत राहिली. एका होतकरू क्रिकेटपटूची कारकीर्द अशा रीतीने दावणीला लावली जाते, म्हटल्यावर आम्ही चिंतित झालो. मुंबई इंडियन्स चिंतित झाले. पण रोहित पेटून उठला. त्यानं शिरस्त्राण, चिलखत चढवलं नि एखाद्या योद्धय़ासारखा (तलवारीऐवजी बॅट फिरवत) तो प्रतिकूल परिस्थितीला सामोरा गेला. रनभूमीचं रूपांतर रणभूमीत झालं! धावा करायचा उद्देश नव्हता (७ चेंडूंत ४), सामना जिंकायचा उद्देशही नव्हता (१० विकेटनी आम्ही पराभूत झालो).. उद्देश होता, निग्रहविधान करायचा! याचसाठी झाला हा खटाटोप..