१९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या ऊर्मीने जेव्हा मी पहिल्यांदा डौलाने फडकलो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या आनंदात दिसली ती खरी देशभक्ती. तेव्हा माझी उंची किती, याची मोजमापे कुणी काढत नव्हते. आताशा देशभक्ती ‘सिद्ध’ करण्याची स्पर्धा वाढू लागली, तशी साऱ्यांना माझ्या उंचीचीच काळजी वाटू लागलेली दिसते. त्या केजरीवालांना मी २०७ फूट उंच हवा आहे. जास्तीत जास्त लोकांना दिसावा म्हणून. पण आज कमी उंचीवरून मी रोज काय बघतो तर नियम मोडणारे लोक, क्षुल्लक कारणातून भांडणारी माणसे, लाच खाणारे व देणारे, बेशिस्तांचे थवे, देशभक्तीच्या नावावर वाहतूक कोंडी करणारे कार्यकर्ते. आता उंची वाढल्यावर माझ्या दृष्टीचा परीघ मोठा झाल्याने मी हेच व्यापक प्रमाणात बघायचे का? जसजशी वर्षे सरत गेली तसतशी माझी आठवण वर्षातल्या दोन दिवसांपुरती मर्यादित होत गेली. बदलायचीच असेल तर लोकांची ही मानसिकता बदला ना! माझ्या उंचीत कशाला बदल करता? मी दिसलो म्हणून काय लोक नियम मोडायचे थांबणार आहेत? असल्या खुळचट कल्पनांनी कृत्रिमरीत्या उभी केलेली देशभक्ती नको मला. काय तर म्हणे, मला बघितल्याने नियमभंगाची भावना गळून पडेल. ७५ वर्षांत मला बघतच आले लोक. तरीही ती भावना वाढलीच ना! स्वातंत्र्य हे कष्टाने मिळवले आहे याचाच विसर पडला अनेकांना या काळात. स्वराज्यासाठी जीव द्याायला तयार असलेल्या शेकडोंच्या हातात मी होतो पण त्यापैकी कुणालाही माझ्या उंचीचा प्रश्न भेडसावला नाही. माझी उंची वाढवली तर ब्रिटिश आपसूकच पळून जातील असा विचार करणारे कोणी त्या पिढीत नव्हते… माझे हातात असणे त्यांना लढण्याची प्रेरणा देण्यासाठी पुरसे होते. ‘झंडा ऊँचा रहे हमारा’ या गाण्याचे कवी शामलाल गुप्तांनीही माझ्या उंचीचे नव्हे, तर प्रेरणेचेच वर्णन केले. आता या प्रेरणेची जागा संधिसाधूपणाने घेतलेली दिसते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आपणच कसे पुढे अशी स्पर्धाच आता निर्माण होणार आहे. खरे सांगा केजरीवाल, त्यासाठीच ना हा माझ्या उंचीचा खटाटोप? उंचीशी स्पर्धा करायची असेल तर ती कार्यकर्तृत्वाने होते. माझ्यातले रंग निवडले गेले ते एकात्मतेचे प्रतीक म्हणून. नंतर त्यातला एकेक रंग निवडत प्रत्येकाने आपले स्वतंत्र निशाण फडकवणे सुरू केले. माणसांना, समूहांना एका चौकटीत बंदिस्त करणाऱ्या या निशाणांचा सुळसुळाट झालाय सध्या सगळीकडे. अशा गर्दीत केवळ माझीच उंची वाढवून नेमके साध्य काय करायचे आहे तुम्हाला? प्रतीकाचे हे खेळ पुरे आता. देशासमोर घोंघावणाऱ्या धार्मिक कट्टरतेचा सामना कसा करता ते सांगा आधी. ती संपवण्यासाठी माझी गरज लागेल तर मी केव्हाही तयार आहे. हनुमानचालीसा म्हणून, योगा करून अथवा माझी उंची वाढवून हा प्रश्न मिटणारा नाही. समाजात एकोपा नांदेल तेव्हाच देशभक्ती रुजेल. माझ्याकडे माना वर करून बघितल्याने नाही. सारा देश माझा आहे. माझी केवळ उंची वाढवण्याच्या स्पर्धेने तुम्हा साऱ्यांचे खुजेपणच तेवढे समोर येईल, हे लक्षात घ्या.