जीवसृष्टी असल्याची आजवर दडवून ठेवलेली माहिती पृथ्वीवरील खगोल शास्त्रज्ञांनी उघड केल्याने शुक्र ग्रहाने नाइलाजाने नागरिकत्व नोंदणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय अखेर घेतला. या नोंदणीत तिन्ही लोकांतील जीव सहभागी होऊ शकतील असे जाहीर झाल्याने सर्वत्र एकच लगबग उडाली. अवघ्या नभोमंडळात शुक्राची प्रतिमा वेगळी. सौंदर्यासक्त, पण आपल्याच तोऱ्यात वावरणारा, अशी. त्यामुळे इतर ग्रह व तारेतारकांसाठी असूयेचे केंद्र असलेल्या या ग्रहावर वसाहत करण्यासाठी अटी काय असतील याची साऱ्यांनाच उत्सुकता! सांप्रतकाळचे जग नागरिकत्वाच्या मुद्दय़ावरून अधिक दुष्टपणे वागू लागलेले असताना शुक्र काय करणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. माणूस हा समाजप्रिय प्राणी असला तरी अलीकडे तो जास्त भांडकुदळ होऊ लागल्याने शुक्राकडून कुणाच्या अर्जावर पसंतीची मोहोर उमटवली जाणार, या चर्चेला उधाण आलेले. शेवटी शुक्राकडून नियमावली जाहीर झाली. ज्यांनी प्रेम या संकल्पनेभोवती आपले अवघे आयुष्य वेचले, सौंदर्यासक्ती हा ज्यांच्या आयुष्याचा धागा राहिला अशांना प्राधान्य मिळणार हे स्पष्ट झाले. हे कळताच स्वर्गात राहून कंटाळलेले मंगेश पाडगावकर बॅग भरून तयार झाले. बा. भ. बोरकर व कुसुमाग्रज शांतचित्ताने नियमावलीचा अर्थ लावण्यात व्यग्र होते. सौंदर्यशास्त्र व गांधीवादाचा संबंध कसा जवळचा राहिला आहे याची जुळवणी त्यांच्या मनात सुरू होती. प्रेम हाच गांधी विचाराचा मूळ गाभा असल्याने शुक्रावर सहज प्रवेश मिळेल अशी या दोघांनाही खात्री होती, मात्र पाडगावकरांसारखा उतावीळपणा या दोघांनी दाखवला नाही. सायंबैठकीत पाडगावकरांना जरा ‘ऐकवले’ पाहिजे असेही या दोघांनी ठरवून टाकले. ओठावर रुमाल फिरवत सतत गात फिरणारे अरुण दाते तर फारच खुशीत होते. ‘शुक्रतारा’ हा शब्द खऱ्या अर्थाने मी अजरामर केला, त्यामुळे सर्वात आधी माझा अर्ज मंजूर होईल याची जणू खात्रीच त्यांना होती. दुबरेधतेचा शिक्का बसलेले ग्रेस अर्ज करावा की करू नये या विवंचनेत होते. स्थितप्रज्ञ असलेले विंदा काहीच हालचाल न करता साऱ्यांची धावपळ बघत होते. वा. रा. कांत, ना. घ. देशपांडे हे स्वर्गातल्या जुन्या पिढीचे प्रतिनिधी. आता थारेपालट नको अशा मताचे. तेवढय़ात चॉकलेट हिरो राजेश खन्ना या कविमंडळात डोकावला. आपण अर्ज केला तर पहिला क्रमांक आपलाच असेल असे काहीसे तो हिंदीत बरळून गेला. विद्रोहींच्या गोटात मात्र कमालीची शांतता होती. विद्रोहाच्या पलीकडे खूप खोलवर प्रेमच असते हे शुक्राला कसे पटवून द्यायचे, या विवंचनेत सुर्वे, ढसाळ बसले होते. इकडे पृथ्वीवर सध्याच्या राजवटीला कंटाळलेले अनेक जण अर्ज करण्याच्या तयारीत होते. त्यात कलासक्त संख्या भरपूर होती. डावा असलो तरी प्रेमाचा हळवा कोपरा आपण कायम जपला असे वसंत आबाजी प्रभाताईंजवळ बोलून गेले. आक्रमक अभिनय करत असलो तरी प्रेमाच्या शेकडो कविता मुखोद्गत आहेत, त्यामुळे अर्ज करायचाच. शेवटी शुक्राप्रमाणे आपणही तोऱ्यात जगतो, असा नानाचा विचार सुरू होता. तिन्ही लोकांत आदराचे स्थान मिळवून असलेले बा. सी. मर्ढेकर साऱ्यांची लगबग बघून हसत होते. मराठी माणसाला शुक्राची खरी ओळख ‘दवात आलिस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा..’ या कवितेतून मी करून दिली.. पण शुक्रावरले सध्याचे जीवन ‘मी एक जिवाणू- तू एक जिवाणू’ यापल्याड नाही, हे मर्ढेकरांनाच उमगले होते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma article on venus abn
First published on: 16-09-2020 at 00:00 IST