‘ऐका हो ऐका, शासनाने जाहीर केलेल्या मदतीचे पॅकेज घेऊन येणारा ट्रक येथे पोहोचत आहे. पारदर्शी कारभारासाठी वचनबद्ध असलेल्या प्रशासनाने या पॅकेजचे खोके सर्वांसमक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व पूरग्रस्तांनी उद्या सकाळी १० वाजता जिल्हा कचेरीत हजर राहावे हो…’ ही दवंडी ऐकताच सारे आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी कचेरीत उभारलेल्या  शामियान्यात प्रचंड गर्दी झालेली. अनेक अधिकारी सुटाबुटात वावरत होते. पॅकेज म्हणजे ‘खाण्याची’ पर्वणीच असा हेतू मनात ठेवणारे जरा जास्तच धावपळीत होते. त्यांच्या दिमतीला अनेक कंत्राटदारही होते. तेवढ्यात ‘ट्रक आला’ असा गलका झाला. मंडपाच्या प्रवेशद्वारी काही पूरग्रस्तांनी उत्साहात चालकाचे हार घालून स्वागत केले. मग एकेक खोका उतरवायला सुरुवात झाली. त्या कामात लागलेल्या चपराशांना पूरग्रस्त स्वत:हून मदत करत होते. ट्रक रिकामा झाल्यावर सर्व खोकी मंडपाच्या मध्यभागी आणण्यात आली. तिथे गर्दी करणाऱ्या पूरग्रस्तांना एका अधिकाऱ्याने माईकवरून दरडावत मागे पिटाळले. सर्वात मोठ्या खोक्यावर ‘सात हजार कोटी’ असे मोठ्या अक्षरात लिहिले होते. आधी तोच उघडण्याचा निर्णय झाला. त्याचा आकार मोठा असल्याने उपस्थितांच्या आशा पल्लवित होत होत्या. कात्री, चाकूचा वापर करून एकेक वेष्टन तोडत तो उघडला गेला… साऱ्यांची उत्सुकता ताणली गेली. चपराशांनी आत बघितले तर त्यात आणखी एक खोका. तो बाहेर काढून उघडला तर पुन्हा त्यात एक लहान खोका. तोही उघडल्यावर आणखी एक असे करत करत पाच बाय पाच इंचीच्या दहाव्या खोक्यातून एक फाइल चपराशांनी बाहेर काढली तेव्हा ते घामाघूम झाले होते तर अधिकारी जांभया देऊ लागले होते. एका वरिष्ठाने वाचण्यासाठी ती हातात घेतली तेव्हा साऱ्यांचे कान टवकारले. ‘यात नमूद केलेली रक्कम दीर्घकालीन उपायांसाठी आहे. आधी त्याचे प्रस्ताव तयार करावे लागतील’ असे त्यांनी सांगताच साऱ्यांचे चेहरे कोमेजले. कंत्राटदारांनी लगेच काढता पाय घेतला. मग तीन हजार कोटीचा खोका उघडायला सुरुवात झाली. त्यातूनही एकामागोमाग एक लहान खोके निघू लागले. सर्वात शेवटी एक प्लास्टिकचे फोल्डर निघाले. त्यात पुनर्बांधणीचा निधी- पण प्रस्ताव तयार केला तरच- मिळेल असे नमूद होते. हे बघून पूरग्रस्तांमध्ये चुळबूळ सुरू झाली. एव्हाना दुपार झाली होती. आता काय होणार याची कल्पना येताच एका वरिष्ठाने ओळखीतल्या एका स्वयंसेवी संस्थेला फोन करून सर्वांसाठी जेवण मागवले. तसे जाहीर होताच पुन्हा शांतता पसरली. मग उर्वरित खोके उघडणे सुरू राहिले. त्यातल्या एका मोठ्या खोक्यातून मदत वाटप करताना काय करावे व काय करू नये हे सांगणाऱ्या नियम, अटी, शर्तीचे मोठ्ठे बाड निघाले. ते रेकॉर्डरूममध्ये ठेवण्यासाठी पूरग्रस्तांची मदत घेण्यात आली. सर्वात शेवटचा छोटा खोका उघडला गेला. त्यात पंधराशे कोटीच्या प्रत्यक्ष मदतीचा तपशील होता तसेच कोषागारासाठी बीडीएसची माहिती होती. ती वाचल्यावर वरिष्ठांनी ‘सर्वांनी आता घरी परतावे व अमूक कागदपत्रे घेऊन महसुली कार्यालयात उद्यापासून नोंदणीसाठी रांगेत लागावे’ असे जाहीर केले. उदास चेहऱ्याने पूरग्रस्त परतू लागले. त्यातल्या काहींना बाहेर ट्रकचालक भेटला. ‘कुछ मिला क्या?’ असे त्याने विचारताच ‘नाही’ असे उत्तर सर्वांनी दिले. तो हसत म्हणाला, ‘काही न मिळूनही तुम्ही शांत आहात. तिकडे विदर्भात तर मी पॅकेजचा माल घेऊन जाणे बंदच केलेले. ट्रक आला हे कळताच लोक मारायला धावतात’ हे ऐकताच त्यातल्या एकाने हापूसच्या निमित्ताने ओळख झालेल्या विदर्भातील एका मित्राला फोन करण्याचा बेत रद्द केला.