माझ्या प्रिय मूळ मुधोळवंशीय श्वानमित्रहो, एवढय़ा तातडीने आणि एवढय़ा प्रचंड बहुसंख्येने आपण या सत्कारसभेस आलात याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो. सारमेयांच्या मौखिक इतिहासात सुवर्ण भूभूत्काराने नोंदवून ठेवावा असा हा आजचा दिवस आहे. आम्ही कोणताही जातिभेद मानत नाही. श्वानत्व हाच आपला धर्म आहे असे आम्ही मानतो. त्यामुळे श्वानधर्मातील सर्व जाती नष्ट व्हाव्यात अशी आमची भूमिका आहे. पण तरीही आज येथे आपणांस हे सांगताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे, की भारतीय लष्कराला जेव्हा कोणाला सेवेत दाखल करून घ्यावे वाटले तेव्हा त्यांच्यासमोर आपल्याच जातबंधूंचे नाव आले. आमच्या पंतप्रधानांना स्मरून हे सांगतो, की आजवर कोणत्याही श्वानकुळाला न मिळालेला मान आम्हाला मिळाला आहे. आणि पुन्हा पंतप्रधानांना स्मरूनच सांगतो, की हे त्यांच्या आरोपांइतकेच खरे आहे. ही संपूर्ण मुधोळवंशीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज या क्षणी आम्हांला राजेसाहेबांची खूप आठवण येत आहे. आज आमचे श्रीमंत राजेसाहेब मालोजीराव घोरपडे असते, तर त्यांना किती आनंद झाला असता! आमचे श्वानकुल हे केलेल्या उपकारांची जाण ठेवणारे आहे मित्रहो. भटक्या कुत्र्यांप्रमाणे ते खायला देणाऱ्या हातालाच चावणारे नाही. त्या उपकारांच्या जाणिवेतूनच आम्ही जाहीर करतो आहोत, की राजेसाहेब होते म्हणूनच आपण आहोत. नाही तर कोण कुठले आपण? हिंदुस्थानात आर्य आले, तसेच आपण येथे आलो. मध्य आशियातून काही टोळ्या आल्या. काही अरबस्थानातून आल्या. अरेबियन सालुकी किंवा ताझीचे रक्त आहे आपल्या अंगात. पण खऱ्या अर्थाने आपला उद्धार केला तो मुधोळच्या राजेसाहेबांनी. थेट विलायतेत पंचम जॉर्ज यांच्या दरबारात पाठविले त्यांनी आपल्या वंशातील दोन बहाद्दरांना. तेथून आपले मुधोळ हाऊंड हे नाव जगभरात गाजले. आणि आज सालुकी, ताझीशी रक्ताचे नाते सांगणारे आपण देशभक्तीचे प्रतीक बनलो आहोत. खुद्द पंतप्रधानांनी हे प्रमाणपत्र दिले आहे आम्हांला. आपण सर्वानी प्रचंड आवाजात भू भू करून त्यांचे आभार मानले पाहिजेत. आमच्या धमन्यांतून ही देशभक्ती वाहते आहे, कारण आमच्या रक्तामध्येच स्वामिनिष्ठा आहे. अखेर देश म्हणजे तरी काय असतो? देश म्हणजे स्वामी! स्वामी म्हणजे देश! या जगात सत्य काय असेल, तर केवळ स्वामिभक्ती. स्वामींनी छू म्हणावे, आपण भुंकावे. या भुंकण्यावर अल्सेशियन, लॅब्रॅडॉर, बुलडॉग अशी विदेश श्वानकुळे टीका करतात. येथील काही भटकी कुत्रीही त्यांच्या भुंकण्यात भुंकणे मिळवतात. त्यांना वाटते, की तेही देशभक्त आहेत. परंतु त्यांना आम्ही सांगू इच्छितो, की येथे आम्ही म्हणू तेच देशभक्त आहेत. आणि आम्ही सरकारमान्य देशभक्त असल्याने यापुढे कोणालाही फाडून खाण्याचा परवाना आम्हांला मिळालेला आहे. जे स्वामींवर चालून येतील त्यांना फाडून खाणे हीच तर आपल्या भक्तीची परिसीमा आहे मित्रहो. अशा स्वामिनिष्ठ श्वानवीरांचा आज येथे गौरव होत आहे, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. भू भूचा गजर करून आपण या सत्कारमूर्तीचे स्वागत करू या. यानिमित्ताने आम्ही येथे अशी घोषणा करीत आहोत, की आपल्या या राष्ट्रभक्तीच्या प्रकाराचा प्रसार करण्यासाठी आपल्या श्वानज्ञातीच्या वतीने येथे लवकरच ‘एमडी स्कूल ऑफ नॅशनॅलिझम’ म्हणजेच मुधोळ डॉग राष्ट्रवाद विद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यापुढे सर्वाना या विद्यालयात प्रवेश घेण्याची सक्ती सरकारने करावी, अशी नम्र विनंती करून आम्ही आमचे चार शब्द संपवतो. जय सारमेय!